Newsworldmarathi Pune: रावसाहेब पटवर्धन विद्यालयात “प्रदूषण मुक्त दिवाळी संकल्प अभियान” मोठ्या उत्साहात राबवण्यात आले. या अभियानाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि फटाकेमुक्त, स्वच्छ व सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचा संदेश देणे हा होता.
या अभियानाअंतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी फटाके न फोडण्याची आणि प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली. दिवसेंदिवस वाढणाऱ्या वायू व ध्वनी प्रदूषणामुळे पर्यावरणावर तसेच माणसाच्या आरोग्यावर होणारे गंभीर दुष्परिणाम लक्षात घेऊन हे अभियान हाती घेण्यात आले.
या प्रसंगी शाळेचे शिक्षक पुष्पक कांदळकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत प्रदूषणाचा वाढता धोका आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्यांविषयी माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या छोट्या कृतीतूनही पर्यावरण संवर्धनात मोठा वाटा उचलता येतो, हे समजावून सांगितले. शाळेचे प्राचार्य अनिल कांबळे यांनी फटाके न फोडता आनंदी आणि सुरक्षित दिवाळी कशी साजरी करता येते, याचे महत्त्व पटवून दिले.
शाळेच्या वतीने पर्यावरणपूरक दिवे, कागदी सजावट आणि सेंद्रिय रंग वापरून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी “हरित दिवाळी, सुरक्षित दिवाळी” या घोषणांद्वारे संदेश दिला. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
या उपक्रमातून शालेय स्तरावरच पर्यावरण रक्षणाची बीजे पेरण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प सर्वांनी दृढतेने व्यक्त केला.


Recent Comments