Homeभारतसिंधूताईंच्या लेकरांसोबत राठी कुटुंबाची दिवाळी; अनेक वर्षांपासून ममता बालसदनसोबत अनोखं नातं

सिंधूताईंच्या लेकरांसोबत राठी कुटुंबाची दिवाळी; अनेक वर्षांपासून ममता बालसदनसोबत अनोखं नातं

Newsworldmarathi Pune: “काका, तुम्ही आलात कीच आमची खरी दिवाळी सुरू होते. तुमच्याशिवाय दिवाळीची मजा नाही,” — अशा शब्दांत कुंभारवळण (ता. पुरंदर) येथील ममता बालसदन मधील सिंधूताई सपकाळ यांच्या लेकींनी मगराज राठी यांच्याबद्दलचा आपुलकीचा भाव व्यक्त केला.

राठी उद्योग समूहाचे मगराज राठी हे मागील २३ वर्षांपासून ममता बालसदन या संस्थेशी जोडले गेले आहेत. दरवर्षी दिवाळीच्या काळात ते आपल्या परिवारासह येऊन मुलांसाठी फटाके, सुग्रास भोजन, कपडे आणि किराण्याचा साठा देतात. यंदाही भाऊबीजेच्या दिवशी त्यांनी पावभाजी, भेळ, विविध खाद्यपदार्थ आणि भेटवस्तू घेऊन बालसदनमधील मुलांसोबत दिवाळी साजरी केली.

या उपक्रमादरम्यान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. फटाके फोडत, एकत्र जेवत त्यांनी राठी कुटुंबासोबत खऱ्या अर्थाने सणाचा आनंद घेतला.

मगराज राठी म्हणाले, “व्यवसायानिमित्ताने पुरंदरमध्ये आलो, तेव्हा ममता बालसदनला भेटण्याचा योग आला. तेव्हापासून आजपर्यंत हा उपक्रम सतत सुरू आहे. सिंधूताई जिवंत असताना त्या माझ्याकडून घेतलेली साडी नेहमी हक्काने वापरत असत. त्यांना एकाच रंगाची साडी आवडायची आणि त्यांचा तो आग्रह आजही आठवतो. त्यांच्या वाढदिवशी त्यांच्या समवेत एकाच ताटात जेवण्याचं भाग्य लाभलं, हे आमच्यासाठी अमूल्य होतं.”

ममता बालसदनचे व्यवस्थापक दीपक गायकवाड म्हणाले, “माई नेहमी म्हणायच्या — ‘मी आई झाले, तुम्ही गणगोत व्हा’. पण माई गेल्यानंतरही राठी कुटुंब हे नातं जपत आहे. त्यांनी घेतलेली जबाबदारी आजही तितक्याच मनापासून निभावत आहेत.”

राठी कुटुंबामुळे या वर्षीची दिवाळी ममता बालसदनसाठी अधिक खास ठरली. आपुलकी, माया आणि समाजसेवेचा संदेश देणारे हे नाते सिंधूताईंच्या कार्याचा खरा वारसा पुढे नेत आहे. यावेळी ममता सपकाळ, महेश नागरी पतसंस्थेचे मगराज राठी, रवि अग्रवाल, कैलाश सारदा, राठी परिवार उपस्थित होते.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments