Newsworldmarathi Pune: सरकारी सेवेत कार्यरत असताना समाजसेवा करणे हे प्रत्येक कर्मचाऱ्याचे कर्तव्य असते, मात्र सेवानिवृत्तीनंतर अनेकजण सामाजिक कार्यापासून दूर जातात. पण पुणे जिल्हा परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी या परंपरेला छेद देत सेवेचा वसा कायम ठेवला आहे. सामाजिक बांधिलकी जपत या कर्मचाऱ्यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी दीड लाख रुपयांचा निधी उभारला आणि बीड जिल्ह्यातील गरजू कुटुंबांना दिवाळी साठीचे साहित्य वाटप केले.
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतमाल, जनावरे आणि संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्याने अनेक कुटुंबे संकटात सापडली आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघाने समाजासाठी काहीतरी करावे या हेतूने पुढाकार घेतला. संघाचे पदाधिकारी आणि सभासदांच्या सहकार्याने दीड लाख रुपयांचा निधी जमा करण्यात आला.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी बीड जिल्ह्यातील मौजे केळ (ता. आष्टी) येथे प्रत्यक्ष भेट देत सुमारे २०० शेतकरी कुटुंबांना दिवाळी साहित्याचे किट वाटप केले. हा कार्यक्रम रविवार, दि. १९ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडला. या कृतीमुळे शेतकरी कुटुंबांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून आला, असे संघाचे अध्यक्ष पंडित मर्डेकर यांनी सांगितले.
या उपक्रमात कार्याध्यक्ष विनायक बहिरट, सचिव जीवन गायकवाड, खजिनदार सुभाष झणझणे, सहसचिव वि. ल. पवार, कार्यकारी सदस्य टी. एन. गायकवाड, ए. बी. सैंदाणे, जी. एम. डोळे, एच. डी. जगताप, दशरथ घुले यांच्यासह अनेक सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते. तसेच गावातील सरपंच सचिन दळवी यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यात सहकार्य केले.
सेवानिवृत्तीनंतरही समाजासाठी काहीतरी करण्याची भावना जोपासत या कर्मचाऱ्यांनी खऱ्या अर्थाने “सेवेचा वसा” जपल्याचे कौतुक सर्वत्र होत आहे.


Recent Comments