Newsworld Pune : रांजणगाव सांडस (ता. शिरूर) येथे रणपिसे वस्ती येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. आज सकाळी या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आणि तालुक्यातील वडगाव रासाई नंतर याही ठिकाणी दुसराही बिबट्या जेरबंद झाला.
शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बिबट्याचा वावर वाढला आहे. मांडवगण फराटा परिसरात गेल्या दोन महिन्यापासून बिबट्याने दोन लहान मुलांवर हल्ले केल्याने दोन मुलांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर वनविभागाने सर्व लक्ष ऊस पट्ट्यात केंद्रित करत या भागात बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या होत्या.
त्या अनुषंगाने मांडवगण फराटा परिसरात सुमारे 20 हून अधिक पिंजरे लावण्यात आले होते. तसेच न्हावरे व मांडवगण फराटा या ठिकाणी बेस कॅम्प उभारण्यात आले आहेत. दरम्यान रांजणगाव सांडस येथे गेल्या पाच दिवसांपूर्वी नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यानंतर तातडीने या ठिकाणी वनविभागाने पाहणी करत पिंजरा लावला होता.
दरम्यान या लावलेल्या पिंजऱ्यात पहाटे बिबट्या भक्ष्य खाण्यासाठी आला असताना अलगद अडकला. यानंतर तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पिंजऱ्यासह बिबट्या ताब्यात घेतला. दरम्यान गेल्या दोन महिन्यांपासून वनविभाग या परिसरात सातत्याने बिबट्या जेरबंद करण्यासाठी अहोरात्र परिश्रम करीत आहे. शुक्रवारी पहाटे एक बिबट्या जेरबंद झाला, तर गेल्या आठवड्यात एक बिबट्या जेरबंद करण्यात यश आले होते. आतापर्यंत वनविभागाने एकूण तीन बिबटे जेरबंद केले आहेत.