Newsworldmarathi Pune: पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन झालेल्या जमिनींसाठी शेतकऱ्यांना प्रती एकरी एक कोटी रुपये भरपाई तसेच घर, गोटा, विहीर, बोरवेल, पाईपलाईन, फळझाडे, वनझाडे इत्यादी घटकांसाठी त्याच्या मूल्याच्या दुप्पट रक्कम नुकसानभरपाई दिली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. भूसंपादन झालेल्या सात गावांतील शेतकरी प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.
जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, “शासनाने दिनांक १७ मार्च २०२५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, उचित भरपाई, पारदर्शकता आणि शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण या दृष्टीने २०१३ च्या भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत अधिनियमाच्या तरतुदींनुसार तसेच शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून शासकीय नियमांनुसार मोबदला मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
ही बैठक एखतपूर, खानवडी, कुंभारवळण, मुंजवडी, पारगाव, उदाचीवाडी व वनपुरी या सात गावांतील शेतकऱ्यांसमवेत घेण्यात आली.
बैठकीत शेतकरी प्रतिनिधींनी विविध मागण्या मांडल्या. चारपट ऐवजी पाचपट दर मिळावा अशी मागणी केली. जिल्हा नियोजन निधीतून गावांना अधिक निधी देण्याची मागणी केली. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पुन्हा गावागावात बैठक घेण्याची सूचना केली. बाजारभावानुसार एक कोटींचा दर अपुरा असल्याचे नमूद करून अधिक भरपाईची मागणी केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या भूसंपादन प्रकरणातील निर्णयाचा संदर्भ देत उच्चतम बाजारमूल्यानुसार मोबदला द्यावा, तसेच विकसित प्लॉट मालकीहक्काने देण्यात यावेत अशी मागणी केली. प्रती एकरी ज्यादा मोबदला आणि ज्यादा विकसित भूखंड मिळावा अशी मागणी केली.
या सर्व मागण्यांवर जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, “नियमांच्या चौकटीत राहून शेतकऱ्यांना अधिकाधिक न्याय मिळावा यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
संमतीने भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना मिळणारे शासननिर्धारित लाभ
1️⃣ संपादित जमिनीच्या क्षेत्राच्या 10% एवढा विकसीत भूखंड औद्योगिक/वाणिज्यिक/निवासी अथवा संमिश्र प्रयोजनाकरिता त्याच क्षेत्रात वाटप करण्यात येईल. (किमान 100 चौ.मी. भूखंडाची हमी)
2️⃣ प्रकल्पग्रस्त कुटुंबाचे घर संपादन झाले असल्यास, एरोसिटी (Aero City) मध्ये 250 चौ.मी. निवासी भूखंड मोबदला दराने दिला जाईल.
3️⃣ भूमिहीन होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना 750 दिवसांच्या किमान कृषी मजुरी इतकी रोख रक्कम त्रैमासिक हप्त्यांमध्ये दिली जाईल.
4️⃣ अल्पभूधारक ठरणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना 500 दिवसांच्या कृषी मजुरीएवढी रक्कम मिळेल.
5️⃣ घर संपादन झालेल्या कुटुंबांना 40,000 रुपयांचे स्थलांतर अनुदान दिले जाईल.
6️⃣ जनावरांच्या गोठा/शेड स्थलांतरासाठी प्रती गोठा 20,000 रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाईल.
7️⃣ प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील एका सदस्यास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये एक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येईल व पात्रतेनुसार नोकरीत प्राधान्य दिले जाईल.


Recent Comments