Newsworldmarathi Pune: गेल्या सात-आठ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राज्यातील महानगरपालिका निवडणुकांना अखेर वेग येणार असून, १५ डिसेंबरनंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नववर्षाच्या पहिल्या महिन्यातच, म्हणजे १४ किंवा १५ जानेवारीला मतदानाची शक्यता अधिक आहे. २०१७ मध्ये निवडणूक जाहीरनाम्यानंतर प्रत्यक्ष मतदानापर्यंत दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होता. मात्र, यावेळी दीर्घकाळ लांबलेल्या निवडणुका आणि सर्वोच्च न्यायालयाच्या ‘डेडलाईन’मुळे संपूर्ण प्रक्रिया अवघ्या ३० दिवसांत पूर्ण करण्याचा विचार राज्य निवडणूक आयोगाने सुरू केला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, १५ डिसेंबर रोजी राज्यात शंभरहून अधिक महत्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ होणार आहेत. या कार्यक्रमांनंतर लगेचच निवडणूक आचारसंहितेची घोषणा होऊ शकते. महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांपैकी नागपूर आणि चंद्रपूर येथे ओबीसी आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यामुळे निवडणूक प्रक्रिया थांबलेली आहे; परंतु उर्वरित २७ महानगरपालिकांसाठी मार्ग मोकळा झाला आहे.
विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणूक ही राज्यातील राजकीय दृष्ट्या सर्वात महत्वाची मानली जात असल्याने, जानेवारीतच ती पार पडण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग बुधवार किंवा गुरुवारी मतदान ठेवण्याचा विचार करीत आहे. सोमवारी किंवा शुक्रवारी मतदान झाल्यास सुट्ट्यांमुळे प्रतिसाद कमी मिळतो, असा मागील निवडणुकांचा अनुभव असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
नागरिकांना आपल्या शहराचे ‘स्वतःचे सरकार’ निवडण्याची संधी मिळणार असल्याने सर्वांच्या नजरा आता १५ डिसेंबरकडे लागल्या आहेत.


Recent Comments