Newsworld Pune : पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी अजित दादा पवार आणि चंद्रकांत दादा पाटील यांच्यामध्ये तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे नेमकी ही माळ कोणाच्या गळ्यामध्ये पडणार याकडे सर्व पुणेकरांचे लक्ष लागले आहे. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली असताना, पुण्याचे पालकमंत्री नक्की कोण? असा संदिग्ध प्रश्न उभा राहिला आहे. चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री असले, तरी सत्तांतरानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड या शहरांबरोबरच जिल्ह्याचा कारभार हाती घेत या पदावर कब्जा केला आहे. त्यामुळे अल्पावधीतच पाटील हे नाममात्र पालकमंत्री असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
पुणे हा अजित पवारांचा बालेकिल्ला असल्याने, पुण्यात प्रशासकीय आणि राजकीय वर्चस्व पुन्हा त्यांनी काबीज केले. त्यांच्याकडून आपल्या जवळच्या सहकाऱ्यांना कामे व टेंडर देण्यात आली असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला होता. याबाबत अनेकदा भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये खटके उडाले. त्यामुळे मंत्रीपदाचा विस्तार होण्यापूर्वीच भाजप कार्यकर्ते सतर्क झाले आहेत आणि पुण्याचा पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती व्हावी, अशी मागणी करत आहेत.
परंतु अजित पवार पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा दावा सोडतील का, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे आणि महायुतीपुढे मोठे आव्हान उभे आहे. त्यामुळे आता पुण्याचा पालकमंत्री कोण होणार हे पाहणं पुन्हा एकदा ‘इंटरेस्टींग’ होणार आहे.