Newsworld Pune : हडपसर येथील भाजपचे नेते विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश सातबा वाघ यांचे फुरसुंगी फाटा येथून सोमवारी सकाळी पहाटेच्या सुमारास अपहरण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना, पुणे शहरापासून जवळपास ४५ किलो मीटर अंतर असलेल्या यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह आढळला आहे.
सतीश वाघ असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या मुलाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मोटारीतून आलेल्या चौघांनी सतीश वाघ यांचे सोमवारी सकाळच्या सुमारास अपहरण केले होते. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हडपसर आणि गुन्हे शाखेची पथके त्यांचा शोध घेत होती.
वाघ हे सोमवारी सकाळी हडपसर येथील ब्लु बेरी हॉटेलबाहेर थांबले होते. त्यावेळी अचानक गाडी त्यांच्याजवळ आली. त्यातून उतरलेल्या दोघांनी त्यांना जबरदस्तीने गाडीत घातले. आतमध्ये अगोदरच दोघे बसले होते. यानंतर त्यांना सोलापूरच्या दिशेने नेण्यात आले. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. हडपसर पोलिसांची आणि गुन्हे शाखेची पथके तपास करत होती. दरम्यान वाघ यांचा मृतदेह यवत गावाच्या हद्दीत सापडला.