Newaworldmarathi Pune : जोधपूर–पुणे–जोधपूर दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यात याव्यात, अशी मागणी समस्त राजस्थानी समाज संघ, पुणे (महाराष्ट्र) यांच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात संघाचे संस्थापक अध्यक्ष मगराज एम. राठी यांनी मध्य रेल्वे, पुणे विभागाचे मुख्य व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांना निवेदन दिले.
सध्या जोधपूर–पुणे मार्गावर धावणाऱ्या रेल्वे क्रमांक 11089/11090 तसेच 20475/20476 या गाड्या केवळ साप्ताहिक स्वरूपात चालवल्या जात आहेत. मात्र या मार्गावर प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत असून, सध्याच्या फेऱ्या अपुऱ्या पडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. परिणामी प्रवाशांना महिन्याभर आधी तिकीट बुक करावे लागते, तरीही प्रतीक्षा यादी लांबच राहत असल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या मार्गावर प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना, व्यापाऱ्यांना तसेच रुग्णांना विशेष त्रास सहन करावा लागत असून, पर्यायी वाहतूक साधनांचा अभाव ही मोठी समस्या ठरत आहे. त्यामुळे जोधपूर–पुणे–जोधपूर या मार्गावरील रेल्वे फेऱ्या वाढवून किमान आठवड्यातून पाच दिवस किंवा रोज धावतील, अशी व्यवस्था करावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
रेल्वेच्या फेऱ्या वाढल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेलच, शिवाय रेल्वेच्या महसुलातही वाढ होईल, असा विश्वास संघाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. या मागणीवर रेल्वे प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा समस्त राजस्थानी समाज संघाने व्यक्त केली आहे.



Recent Comments