Homeभारतपार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी?

पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी?

Newaworldmarathi Mumbai: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी त्यांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव पुढे आले असून, राज्याच्या अर्थसंकल्पी अधिवेशनापूर्वी याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षातील वरिष्ठ सूत्रांकडून यासंदर्भात हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे बुधवारी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर पक्षात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. निर्णयक्षम आणि प्रभावी नेतृत्वाची गरज व्यक्त होत असताना, आगामी २०२९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांचा विचार करून पार्थ पवार यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सोपविण्याचा विचार सुरू असल्याचे समजते. सुनेत्रा पवार यांच्यावर उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी असल्याने देशव्यापी दौरे करणे मर्यादित ठरू शकते, अशी चर्चा पक्षांतर्गत आहे.

तथापि, पार्थ पवार यांचा प्रभाव सध्या मर्यादित असल्याचेही मत व्यक्त केले जात आहे. २०१९ मध्ये त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती; मात्र त्यांना अपयश आले होते. मध्यंतरी एका बिगरमराठी नेत्याचे नाव चर्चेत आले होते; परंतु आमदार व कार्यकर्त्यांच्या नाराजीनंतर तो पर्याय मागे पडल्याचे सांगितले जाते.

सुनेत्रा पवार या सध्या राज्यसभेच्या खासदार असून त्यांचा कार्यकाळ जुलै २०२८ पर्यंत आहे. उपमुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर त्यांना सहा महिन्यांत खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांना राज्यसभेतून संधी देण्याचाही पर्याय चर्चेत आहे. मात्र, त्यांना दीर्घ कार्यकाळ असलेल्या जागेवरून राष्ट्रीय राजकारणात पाठविण्याची शक्यता अधिक असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

पक्षातील ३० ते ३५ आमदार व विविध आघाड्यांचे पदाधिकारी सुनेत्रा पवार यांनीच अध्यक्षपद स्वीकारावे, अशी भूमिका मांडत असले तरी अंतिम निर्णय लवकरच स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments