Homeभारत‘अॅडव्हान्टेज विदर्भ २०२६’ला गडकरी-फडणवीस उपस्थित; ₹४२ हजार कोटींच्या गुंतवणुकीची नोंद

‘अॅडव्हान्टेज विदर्भ २०२६’ला गडकरी-फडणवीस उपस्थित; ₹४२ हजार कोटींच्या गुंतवणुकीची नोंद

नागपूर : ‘अॅडव्हान्टेज विदर्भ २०२६’ या आंतरराष्ट्रीय व्यवसाय परिषदेला नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभली. विदर्भाच्या औद्योगिक क्षमतेला चालना देणाऱ्या या परिषदेत तब्बल २३ देशांतील राजनैतिक प्रतिनिधी, उद्योगपती आणि धोरणकर्त्यांनी सहभाग नोंदवला. परिषदेतून ₹४२ हजार कोटींच्या सामंजस्य करारांची नोंद झाल्याची माहिती आयोजकांनी दिली.

गडकरी यांनी अशा परिषदांमुळे स्थानिक उद्योगांना जागतिक बाजारपेठेचे दार खुले होत असल्याचे नमूद केले. निर्यातवाढ आणि रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भाला ‘ग्रोथ इंजिन’ बनविण्याची क्षमता असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या गुंतवणूक धोरणांचा उल्लेख करत विदर्भ हे उदयोन्मुख गुंतवणूककेंद्र ठरत असल्याचे स्पष्ट केले. पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक्स आणि सुलभ परवानगी प्रक्रिया यांवर शासनाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.

परिषदेत उत्पादन, ऊर्जा, औद्योगिक पार्क आणि निर्यात क्षेत्रातील गुंतवणूक प्रस्तावांवर सविस्तर चर्चा झाली. ही परिषद ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली. संस्थापक डॉ. जितेंद्र जोशी यांनी जागतिक नेटवर्कची माहिती देत विदर्भासाठी आंतरराष्ट्रीय संधींचे नवे दालन उघडल्याचा दावा केला.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments