Newsworldmarathi Pune: भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वाघोली येथे सकाळी ७.३० वाजता पारंपारिक भोंडला कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश साळुंखे आणि त्यांच्या पत्नी उपस्थित होते. तसेच रोटरी क्लबचे प्रमुख आणि सदस्य यांनीही आवर्जून उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
विद्यालयाच्या प्रांगणात सुंदर प्रतिष्ठापना करून आकर्षक फुलांची रांगोळी काढण्यात आली. विद्यार्थिनींनी पारंपारिक नऊवारी साडी परिधान करून “ऐलमा पैलमा गणेश देवा माझा खेळ मांडू दे” यासारखी पारंपारिक गाणी म्हणत भोंडला फेर धरला. मनोरंजनात्मक खेळ आणि विद्यार्थिनींचे नृत्य हे प्रमुख आकर्षण ठरले.
या संपूर्ण कार्यक्रमास प्राचार्य संतोष भंडारी आणि पर्यवेक्षक पांडुरंग पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.
सूत्रसंचालन, प्रास्ताविक, हत्ती पूजन, रांगोळी, बैठक व्यवस्था आणि खाऊ वाटप अशा विविध जबाबदाऱ्या शिक्षकांनी यशस्वीरित्या पार पाडल्या. शेवटी विद्यार्थिनींना खिरापत वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास शिक्षक, पालक आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments