Newsworldmarathi Team : Birthday special काटेवाडी ते दिल्ली (व्हाया बारामती-पुणे-मुंबई) हा गेल्या ७५ वर्षांचा मा. साहेबांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांच्या विद्यार्थि दशेतील महाविद्यालयीन निवडणुका, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विधनसभेतील विरोधी पक्ष नेता, केंद्रीय मंत्री, लोकसभेतील विरोधी पक्ष नेता, समाजवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हा एक व्यापक पट मा. साहेबांच्या रूपाने लोकांसमोर आहे. वारकरी संप्रदाय, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षि शाहू महाराज, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड, कर्मवीर भाऊराव पाटील, सत्यशोधक शारदाबाई पवार, मा. यशवंतराव चव्हाण या व अन्य महामानवांचा पुरोगामी विचार, शिक्षण, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, विज्ञान, कृषी, क्रीडा, साहित्य, कला, संस्कृती, इ. क्षेत्रातील मान्यवरांचे तज्ज्ञांचे पुरोगामी विचार स्वीकारुन त्यांनी आपल्या जीवनाची जीवनकार्याची दिशा ठरवली आहे.
कोणत्याही सर्वसामान्य माणसाला समाजातील असामान्य व्यक्तिमत्त्वं जवळून पाहावीत, त्यांचं जीवनचरित्र त्यांची यशोगाथा, त्यांच्या जीवनातील यश-अपयश, त्यांच्या जीवनातील चढ-उतार, त्यांच्या जीवनातील वळणवाटा समजून उमजून घ्याव्यात असे प्रकर्षाने वाटत असते. मा. श्री. शरद पवार हे सुद्धा असेच एक असामान्य व्यक्तिमत्व असल्यामुळे सर्वांनाच त्यांच्याविषयी आदर आहे, त्यामुळे त्यांचे जीवनकार्य समजून उमजून घ्यावे असे सर्वांना वाटते. मलासुद्धा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून त्यांच्याबद्दल आदर आहे, कुतूहल आहे.
१८ जुलै १९७८ रोजी अगदी तरुणपणी वयाच्या ३८ व्या वर्षी पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी शपथ घेतली. मी त्यावेळी राशिवडे बु।।, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत इ.४ थीच्या वर्गात शिकत होतो. माझ्या गावाच्या शेजारी दोन-तीन किलोमीटर अंतरावरील शाहूनगर, परिते, ता. करवीर, जि. कोल्हापूर येथील भेगावती सहकारी साखर कारखाना मर्यादित या संस्थेने आपल्या कार्यस्थळावर उभा केलेल्या ‘राजर्षि शाहू छत्रपती’ यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण त्यांच्या शुभहस्ते १७ एप्रिल १९७९ रोजी झाले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन कृषीराज्यमंत्री मा. श्रीपतराव बोंद्रे हे होते. या साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन मा. दादासाहेब कृष्णराव पाटील (कौलवकर) यांच्या पुढाकारामुळे हा पुतळा उभा करण्यात आला आहे. माझ्या वडिलांनी (श्री. यशवंत सखाराम गडकर प्राथमिक शिक्षक, हसूर दुमाला, ता. करवीर, जि. कोल्हापूर) मला सायकलच्या कॅरियरवर बसवून या कार्यक्रमासाठी नेलं होतं. मा. मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर, त्यांचा गाड्यांचा ताफा, त्या काळात त्यांना पाहण्यासाठी सर्वसामान्य लोकांची झालेली गर्दी, त्यांच्या शुभहस्ते राजर्षि शाहूंच्या पुतळयाचं अनावरण आणि त्यानंतर जाहीर सभा….. सगळं कसं मंतरलेलं-भारावलेलं होतं. मा. श्री. शरदचंद्रजी पवार यांचं माझ्या आयुष्यात पहिलं दर्शन मला असं झालं.
या घटनेनंतर मध्ये बराच कालखंड गेला. चंबुखडी (शिंगणापूर), ता. करवीर, जि. कोल्हापूर येथील राजर्षि शाहू छत्रपती विज्ञानिकेतन (Residential Public School) या शाळेतून इ. ५ वी ते इ. १० वी पर्यंतचे माध्यमिक शिक्षण पूर्ण करून कोल्हापूर येथील प्रिन्स शिवाजी मराठा बोडींग हाऊसच्या महाराष्ट्र हायस्कूलमध्ये इ. ११ वी विज्ञान या वर्गात प्रवेश घेतला. जुलै १९८५ मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या सर्वात्रिक निवडणुका होणार होत्या. या प्रचार सभांमध्ये समाजवादी कॉग्रेसच्या व पु.लो.द. च्या प्रचारसभेत महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते मा. शरद पवार यांचे कोल्हापूर येथील गांधी मैदानावर तडफदार भाषण ऐकण्याची संधी मला मिळाली होती. ते भाषण आता मला फारसं आठवत नाही. तो काळ माझं वय, माझं शिक्षण, माझा अनुभव, माझं अल्प वाचन यामुळे पुरोगामी, प्रतिगामी, RSS, सनातनी (हा लेख लिहीत असताना पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांचा मारेकरी ‘सनातन प्रभात’ या संस्थेचा कार्यकर्ता समीर गायकवाड याला सांगली येथे कोल्हापूर व सांगली पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करून १६ सप्टेंबर २०१५ रोजी पहाटे ४.३० वा. अटक केल्याची बातमी दूरचित्रवाणीच्या वृत्त वाहिन्यांवर झळकत आहे. पुरोगामी विचारांचा, विवेकवादाचा पुरस्कार करणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी, कॉ. गोविंद पानसरे यांची २० फेब्रुवारी २०१५ रोजी, प्रा. एम. एम. कलबुर्गी यांचा ३० ऑगस्ट २०१५ रोजी प्रतिगामी वृत्तींनी खून केला आहे), विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दलित पँथर, Republican Party of India, कॉंग्रेस, समाजवादी काँग्रेस, पु.लो.द. इ. बाबी माझ्या आकलनाच्या पलीकडच्या होत्या. पण मा. साहेबांचं हे भाषण ऐकल्यानंतर, महाविद्यालयीन जीवनात पुरोगामी विचारांचे वाचन झाल्यामुळे, पुरोगामी विचारांच्या प्राध्यापकांच्या महाविद्यालयाच्या वर्गातील व्याख्यानांमुळे, दलित-ग्रामीण साहित्याच्या वाचनामुळे मला पुरोगामी विचारधारा-विवेकवादाचा स्वीकार करता आला. मा. साहेबांच्या या भाषणाने माझ्या बौद्धिक वैचारिक जडणघडणीमध्ये महत्वपूर्ण योगदान दिले.
लेखन, वाचन श्रवण, मनन, भाषण, संभाषण, इ. कौशल्यं: अभ्यासाच्या सहलीच्या निमित्ताने केलेला प्रवास, १४ वर्षे वसतिगृहात राहून घेतलेलं शिक्षण, मित्र-मैत्रिणींचा मेळा, शिक्षकांचा- प्राध्यापकांचा परीस स्पर्श, राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक, इ. विद्यार्थिदशेत व्यक्तिमत्व विकासाचे अनेक पैलू असतात. कुरुकली, ता. करवीर, जि. कोल्हापूर येथील भोगवती महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत असताना या महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे तत्कालीन कार्यक्रम अधिकारी प्रा. दिनकर विष्णू पाटील (सध्या प्रा. डॉ. दिनकर विष्णू पाटील सर याच महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी कार्यरत आहेत) व प्रा. डॉ. जालंदर पाटील यांच्या सहवासात आम्ही नितीश सावंत, नेताजी डोंगळे, तानाजी सोनाळकर, कृष्णा सरनोबत, प्रसाद पोतदार, इ. काही मित्र आलो. आम्ही सर्व मित्र व्याख्यानं, व्याख्यानमाला, काव्यसंमेलनं, सांस्कृतिक उपक्रम, साहित्य संस्था इ. मध्ये आमचा सक्रिय सहभाग असायचा. पदवीचे शिक्षण घेत असताना दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन (केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर), बालकवींसाठी एक दिवस (राजर्षि शाहू स्मारक भवन), पहिले माणदेश साहित्य संमेलन, दहिवडी (अध्यक्ष मा. शंकरराव खरात, २७ व २८ ऑक्टोबर १९९०), ६४ वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, रत्नागिरी (अध्यक्ष मा.मधु मंगेश कर्णिक, २१,२२, २३ डिसेंबर १९९०) इ. ठिकाणी आम्ही मित्रमंडळी सहभागी झालो होतो.
आमचा हा उत्साह पाहून प्रा. दिनकर विष्णू पाटील हे आम्हाला उंडाळे, ता. कराड, जि. सातारा येथे दि. १७, १८ फेब्रुवारी १९९१ रोजी संपन्न झालेल्या १७ व्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या अधिवेशनासाठी व त्यालाच जोडून मा. शंकरराव खरात यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या पहिल्या समाजप्रबोधन सििहत्यसंमेलनासाठी घेऊन गेले होते. या संमेलनासाठी प्रमुख अतिथी या नात्याने महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मा. शरद पवार व तत्कालीन राज्यपाल मा.सी. सुब्रमण्यम उपस्थित होते. आम्हा विद्यार्थ्यांसाठी-मित्रांसाठी विशेषतः माझ्यासाठी हा अलभ्य लाभ होता. मुख्यमंत्री या नात्याने मा. शरद पवार यांनी स्वातंत्र्य सैनिकांचे अधिवेशन व समाजप्रबोधन साहित्य संमेलनाच्या संदर्भात खूप चांगलं भाषण केलंच पण एक विलक्षण अनुभव मा. राज्यपाल महोदयांच्या भाषणाच्यावेळी आला. मा. राज्यपाल इंग्रजीतून भाषण करत होते. या भाषणाचा मराठी अनुवाद कराड येथील एक इंग्रजीचे प्राध्यापक करत होते. समोरची गर्दी पाहून, विचारमंचावरील उपस्थित दिग्गज पाहून, नेमक्या त्यावेळी त्यांची काहीतरी व्यक्तिगत अडचण असल्यामुळे किंवा इतर काही कारणांमुळे इंग्रजीचे प्राध्यापक अनुवाद करताना गडबडून गेले. त्यांची गडबड पाहून श्रोते, संयोजक, विचारमंचावरील उपस्थित मान्यवर अस्वस्थ झाले. मा. शरद पवार हे सुद्धा अस्वस्थ झाले.
पण मा. शरद पवार यांनी संयोजकांना निरोप पाठवून अनुवाद करणाऱ्या इंग्रजीच्या प्राध्यापकांचा व्यक्तिगत, त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या प्राध्यापकीचा किंचितसाही अधिक्षेप होणार नाही यांची काळजी घेऊन, ध्वनिक्षेपकाचा ताबा घेऊन मा. राज्यपालांच्या इंग्रजी भाषणाचा व्यावसायिक भाषांतकारासारखा मराठी अनुवाद करायला प्रारंभ करुन पतिकूल परिस्थितीचे रुपांतर अनुकूल परिस्थितीमध्ये केले. मा. मुख्यमंत्र्यांच्या या नव्या अवताराचे, समयसूचकतेचे श्रोत्यांनी टाळयांच्या गजरात स्वागत केले. एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री किती प्रतिभासंपन्न असावा, बहुभाषिक असावा, अष्टावधानी असावा याचे प्रत्यंतर या प्रसंगाामुळे येते. इंग्रजीचे प्राध्यापक तांत्रिक व शब्दशः भाषांतर करत होते त्यामुळे Lexical Gap राहत होता. मा. साहेबांनी मात्र हा Lexical Gap दूर करून या भाषणाचा स्वैर अनुवाद केला. मा. राज्यपालांच्या इंग्रजी भाषणाचा अनुवाद एखाद्या राज्याचे मा. मुख्यमंत्री करत आहेत असे हे दुर्मिळ उदाहरण माझ्या माहितीप्रमाणे आपल्या देशातील एकमेव आहे. माझी साहित्यिक, सांस्कृतिक, चळवळीविषयक विद्यार्थिदशेतील धडपड पाहून माझे मामा श्री. प्रभाकर निर्मळे यांनी त्यावेळी मला त्याकाळी रोल असलेला कॅमेरा भेट म्हणून दिला होता. माझे सुदैव असे की प्रभाकर मामांनी भेट दिलेल्या कॅमेऱ्यातून मा. शरद पवार यांच्या सार्वजनिक जीवनातील हा दुर्मिळ क्षण मला टिपता आला याचा त्यावेळीही आणि आजही मनस्वी आनंद होत आहे.
जून १९९१ मध्ये माझा आमचा बी.ए. (मराठी) चा निकाल लागला अन् आम्ही पदवीधर झालो. मी, नितीश सावंत, नेताजी डोंगळे आम्ही मित्रांनी एकत्रितपणे कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेण्याचा निर्णय अतिशय उत्साहाने, विचारपूर्वक व उज्ज्वल भवितव्याचा विचार करून घेतला होता. मराठी विभागाच्या गुणवत्ता यादीत माझे चौथ्या क्रमांकाला नाव होते. विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या गुणवत्ता यादीत तर माझे पहिल्या क्रमांकावर नाव होते. माझ्या विद्यार्थिदशेतील ही इतकी चांगली पहिली-वहिली व माझ्यासाठी फार मोठी अभिमानाची बाब होती. मित्रांचीही थोडया फार फरकाने दोनही ठिकाणच्या गुणवत्ता यादीत नावं प्रसिद्ध झाली होती.
माझी मावस बहीण सौ. अरुणा निर्मळे हिची वर्गमैत्रीण विद्यापीठात कार्यरत असणाऱ्या सौ. रतन पाटील यांची विद्यापीठात भेट घेऊन, प्रवेश प्रक्रिया समजावून घेऊन माझ्या गावाकडे (राशिवडे, बु।।, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) जाण्यासाठी रंकाळा एस.टी. स्टॅडवर सायंकाळी पोहोचलो अन् माझ्या आयुष्याला फार मोठे वेगळे वळण मिळाले. माझे मामा-मामी श्री. प्रभाकर निर्मळ, सौ. अरुणा निर्मळे; माझा मावसभाऊ श्री. चंद्रशेखर पोवार हे तिघेजण मला बी.ए. (मराठी) ला मिळालेल्या खूप चांगल्या गुणांमुळे पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेण्याचा ठाम निर्णय घेऊनच आले होते. मला, माझे आई-वडील, माझी बहीण, माझे मित्र यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा करू न करता, संपर्काची साधनं नसलेल्या त्या काळात माझ्या मित्रांची समक्ष भेट घेऊ न देता, त्यांचा निरोप घेऊ न देता माझ्यावर प्रेमळ दादागिरी करुन फर्ग्यूसनसाठी माझी उचलबांगडी करण्यात आली. २४ जुलै १९९१ रोजी माझा फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मराठी विभागात पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेण्यात आला. पुण्यात आलो अन् माझं बाहय व्यक्तिमत्त्व, आंतर्व्यक्तिमत्त्व पूर्णतः बदलून गेलं.
माझी स्वप्नं मोठी झाली. बी. ए. ला असताना लेखन, वाचन, श्रवण, मननाची गोडी लागलीच होती पण पुण्यात आल्यानंतर त्याचा अधिक विस्तार झाला. माझे मामा डॉ. हरिश्चंद्र निर्मळे (वसतिगृह प्रमुख, फर्ग्युसन महाविद्यालय वसतिगृह, पुणे), मामी डॉ. सुनिता निर्मळे यांनी दिलेल्या मुलींच्या सायकलवरुन त्यावेळच्या पुण्यात दररोज सायंकाळी सांस्कृतिक उपक्रमांसाठी भटकंती करु लागलो. अशा दिनक्रमात एकेदिवशी विद्यार्थ्यांसाठीच्या आलेल्या पत्रपेटीत माझ्यासाठी माझ्या आई-वडिलांची, बहिणीची, मित्रांची पत्रं शोधत असताना नजरचुकीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मा. प्राचार्यांच्या नावे (प्राचार्य डॉ. गं. ना. जोगळेकर) आलेली ‘त्रिदल’ या संस्थेच्यावतीने डॉ. बानू कोयाजी यांना तत्कालीन केंद्रीय संरक्षण मंत्री मा. शरद पवार यांच्या शुभहस्ते दिल्या जाणाऱ्या ‘पुण्यभूषण पुरस्कार’ या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका होती. त्या निमंत्रण पत्रिकेवर कार्यक्रमाला येताना सोबत ही निमंत्रणपत्रिका प्रवेशपत्र समजून आणावी असे लिहिले होते. आता निर्णय घेण्याची व कृती करण्याची वेळ होती. त्रिदल, पुण्यभूषण, डॉ. बानू कोयाजी, मा. शरद पवार, बालगंधर्व रंगमंदिर….. सगळयांचंच जबरदस्त आकर्षण होतं. काय करावं ?….. काय करावं?….. निर्णय घेता येत नव्हता व माझ्या हातून कृती होत नव्हती. वेळ तर फारच कमी होता. To be or not to be या अवस्थेत शेवटी ती निमंत्रण पत्रिका चोरली. माझ्या आयुष्यातील ती पहिली व शेवटची चोरी होती.
माझे आई-वडील, माझे नातेवाईक, माझे शालेय माध्यमिक उच्च माध्यमिक-उच्च शिक्षणातील सर्व शिक्षक, समाज, इ. सर्व घटकांनी माझ्यावर सुसंस्कार केले होते. इ. ४ थी पासून ते माझा विवाह होईपर्यंत मी १४ वर्षे वसतिगृहात राहून शिक्षण घेतलं आहे. होस्टेल लाईफ मध्ये आई वडिलांनी कितीही पैसे दिले तरी पॉकेट मनी कमी पडत होता, हौसमौज करता येत नव्हती पण त्यासाठी कधीही चोरी केली नाही. या कार्यक्रमासाठी मात्र बालगंधर्व रंगमंदिरामध्ये पुण्यभूषण पुरस्काराच्या निमित्ताने भारताचे संरक्षण मंत्री असलेल्या मा. साहेबांना जवळून पाहता यावं, ऐकता यावं या उदात्त हेतूने मी आयुष्यातील पहिली-वहिली विधायक चोरी केली होती. १३ ऑगस्ट १९९१ रोजी सायंकाळी संपन्न झालेला हा कार्यक्रम याचि देही याचि डोळा अनुभवला होता. त्यामुळे माझं जीवन, अनुभवाविश्व, भावनिक विश्व, मानसिक विश्व, वैचारिक विश्व अणिक समृद्ध झालं होतं.
१९९३-९४ या शैक्षणिक वर्षात पुणे विद्यापीठाच्या (आताचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) मराठी विभागात एम. फिल. साठी तत्कालीन मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. आनंद यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शिक्षकांच्या जीवनावरील तीन कादंबऱ्या अश्रू, हद्दपार, बनगरवाडी एक अभ्यास’ या विषयावर संशोधन करत असताना ‘जानेवारी १९९४ ते मे १९९४’ या कालावधीत दै. ‘सकाळ’, दै. ‘लोकसत्ता’, दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’, दै. ‘टाईम्स ऑफ इंडिया’, दै. ‘इंडियन एक्सप्रेस’ इ. वृत्तपत्रातील ‘अधिव्याख्याता’ पदांच्या जाहिरातींच्या आधारे राज्यभरात जवळ जवळ ३०-३५ ठिकाणी वरिष्ठ महाविद्यालयातील मराठी विषयांच्या ‘आधिव्याख्याता’ पदासाठी अर्ज केले होते. (त्यापैकी एक अर्ज बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विषयाच्या ‘अधिव्याख्याता’ या पदासाठी केला होता.) नोकरी प्राप्त करण्यासाठी तीव्र स्पर्धा होती, शिवाय राज्यभरातील विविध महाविद्यालयांची मुलाखतीसाठी पत्रं येतील, मुलाखतींच्या निमित्ताने राज्यभर भटकंती करता येईल, Window Shopping या संकल्पनेप्रमाणे एस.टी. च्या, ट्रेनच्या खिडकीत बसून प्रवास करावा महाराष्ट्र पाहावा ही त्यामागील भूमिका होती. अन् एके दिवशी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे मला मुलाखतीसाठी पत्र आले. मा. शरद पवार त्यावेळी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी होते.
मा. मुख्यमंत्र्यांचं गाव, बारामती हे तालुक्याचं ठिकाण, बारामतीची पंचक्रोशी पाहता येईल या भूमिकेतून २९ जून १९९४ रोजी मुलाखत दिली. मा. साहेबांची, मा. दादांची संस्था असल्यामुळे त्यांच्या एखाद्या कार्यकर्त्यांचा मुलगा-मुलगी नातेवाईक, त्यांच्या विधानसभा लोकसभा मतदारसंघातील कोणीतरी तरुण तरुणी, वशिल्याचं कुणीतरी व्यक्तींची ‘अधिव्याख्याता’ म्हणून निवड होईल असे माझ्यासहित सर्वच उमेदवारांना वाटत होते. पण घडलं उलटंच…… एके दिवशी (५ जुलै १९९४) मला माझ्या वसतिगृहाच्या पत्त्यावर (खोली क्र.३६, वसतिगृह क्र.५, पुणे विद्यापीठ, पुणे) माझी निवड झाल्याची व तातडीने महाविद्यालयाच्या सेवेत रुजू होण्याची ‘तार’ माझ्या हातात आली अन् आश्चर्याचा सुखद धक्का बसला. पुणे विद्यापीठाच्या वसतिगृह क्र. ५. खोली क्र. ३६ मधून थेट ७ जुलै १९९४ रोजी मी विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सेवेत रुजू झालो. बघता-बघता मला इथं येऊन २१ वर्षे पूर्ण झाली. आता मी पक्का बारामतीकर झालो आहे. माझ्यासहित आमच्या सर्व प्राध्यापकांना ‘विद्या प्रतिष्ठान’ ही मा. साहेब अध्यक्ष असलेली संस्था फक्त गुणवत्तेला प्राधान्य देते याचा प्रत्यंतर या निमित्ताने आला.
७ जुलै १९९४ रोजी बारामती येथील विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात आल्यानंतर मा. साहेबांचे वारंवार दर्शन होऊ लागले. मा. साहेब राज्याचे मुख्यंमंत्री असताना महाविद्यालयाच्या प्रवेशकक्षात तत्कालीन प्राचार्य डॉ. स. भी खरोसेकर यांनी आम्हा तरुण नवख्या प्राध्यापकांची भेट घडवून आणली होती, प्रा. राजेंद्र खैरनार, प्रा. राजाराम चौधर, प्रा. विठ्ठल यादव, प्रा. अजित चांगण, प्रा. संपत मोहिते, प्रा. राजकुमार देशमुख व मीः आम्ही मोठया उत्साहाने, अभिमानाने, कौतुकाने मा. साहेबांना भेटलो होतो. मा. साहेबांनी मोठया आपुलकीने आम्हा सर्वांची नावं गावं शिक्षण याबाबतीत चौकशी केली होती. आमचं महाविद्यालय नुकतंच सुरु झालं होतं. विद्यार्थी संख्या अगदीच कमी म्हणजे १५०च्या आसपास होती. “आजच्या विद्यार्थी संख्येमुळे तुम्ही नाराज होऊ नका, तुमचं काम तुम्ही प्रामाणिकपणे करत राहा, तुमच्या योगदानामुळे निश्चितच विद्यार्थी संख्या वाढेल,” असा आशावाद व्यक्त करुन आमच्या प्राध्यापकीचा हुरुप वाढवला होता, इतकंच नाही तर “विद्या प्रतिष्ठान ही संस्था संस्थाचालकांच्या नावाने ओळखली न जाता इथल्या सेवकांच्या- शिक्षकांच्या प्राध्यापकांच्या नावाने ओळखली जावी” अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी आमच्यावर फार मोठी जबाबदारी टाकली होती. मा. साहेबांची ही अल्पशी भेट आम्हा तरुण नवख्या धडपडणाऱ्या प्राध्यपकांच्या मनात त्यागाचं बीज पेरून गेली, आम्हा पहिल्या पिढीच्या आणि त्यानंतर महाविद्याल्याच्या सेवेत आलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी, प्राध्यापकांनी Smart work, Hard work करुन मा. साहेबांची ही इच्छा आमच्या मयदित राहून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.
मा. साहेबांना अगदी जवळून पाहता यावं ऐकता यावं असं मला माझ्या विद्यार्थिदशेपासूनच वाटत होतं. आमच्या विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलानं माझी आमची इच्छा वारंवार पूर्ण केली. मा. साहेब आम्हाला आमच्या संकुलामध्ये वारंवार दिसत राहिले. (विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलातील त्यांच्या सातत्याने भेटीबाबत मी स्वतंत्र लेख लिहिणार आहे) १२ फेब्रुवारी १९९५ रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करुन मुख्यमंत्रीपदी असलेले मा. साहेब सौ. प्रतिभाकाकींसमवेत विद्या प्रतिष्ठानच्या संकुलामध्ये अगदी निवांतपणे फेरफटका मारत होते. मुख्यमंत्रीपदी असूनही कोणताही लवाजमा त्यांच्यासोबत नव्हता, मी एकटाच त्यांच्या जवळून जाताना दोघांनाही फक्त नमस्कार केला होता. सकाळची वेळ होती, दोघांचाही मूड अगदी प्रसन्न होता, मी धाडस करून थोडंसं जरी बोललो असतो तर दोघांनाही माझ्याशी छान गप्पा मारल्या असत्या, पण मा मुख्यमंत्र्यांशी, त्यांच्या पत्नीशी आपण बोलावं की न बोलावं अशी द्विधा मनः स्थिती निर्माण झाल्याने, त्यावेळी मी दोघांशीही गप्पा मारू शकलो नाही याची हुरहुर मात्र आयुष्यभर मला सलत राहील,
आणखी एक सुखद धक्का…… आमच्या महाविद्यालयाच्या खोली क्र. ७ मध्ये सकाळी ८.४० ते ९.३० किंवा सकाळी ९.३० ते १०.२० या वेळापत्रकातील वेळेप्रमाणे प्रथम वर्ष कला या वर्गातील विद्यार्थ्यांना मी मराठी विषयाच्या अध्यापनाचे कार्य करत होतो. आणि अचानक माझ्या वर्गासमोर मा. शरद पवार यांच्यासमवेत बॅ. रामराव आदिक, मा. विलासराव देशमुख, मा. विजयसिंह मोहिते पाटील, डॉ. शिवाजीराव निलंगेकर पाटील आदी मान्यवर मा. साहेबांच्या दूरदृष्टीतून आकाराला येत असलेल्या ‘विद्या प्रतिष्ठान’ ची पाहणी करण्यासाठी आले होते. मी माझ्या अध्यापनात मग्न होतो. वर्गात व्याख्यान देत विद्यार्थ्यांवरुन दृष्टिक्षेप टाकताना व्हरांडयाकडे माझे लक्ष गेल्यानंतर मला हा अनुपम सोहळा अनुभवाला आला. या मान्यवरांना फेब्रुवारी १९९५ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र पाहून आश्चर्याचा धक्काच बसला. या सर्व मान्यवरांना पाहून आपण आपले अध्यापनाचे कार्य थांबवावं की न थांबवावं या मनःस्थितीमध्येच मी वर्गाच्या बाहेर आलो. पण मा. साहेबांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली ती फार महत्वाची होती. ते म्हणाले “तुम्ही तुमचं काम सुरू ठेवा. आम्ही पाहणी करुन लगेचच निघणार आहोत. काही संस्थाचालक आपापल्या शैक्षणिक संकुलात वावरताना सेवकांचा, शिक्षकांचा, मुख्याध्यापकांचा, प्राध्यापकांचा, प्राचार्यांचा लवाजमा घेऊन सरंजामदारांसारखे वावरत असतात. याउलट मा. साहेब मात्र आमच्या संकुलात वावरताना सेवक, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य इ. कोणत्याही घटकाचा अधिक्षेप होणार नाही याची काळजी घेतात. मा. साहेबांचा हा मनाचा मोठेपणा आम्हा सर्वांचा हुरूप वाढविण्यासाठी कारणीभूत ठरतो.
श्री. संजय संभाजी दराडे (दराडे सायकल्स, भिगवण रोड, बारामती) यांची माझ्या मुलांच्या Cycles repair च्या निमित्ताने ओळख झाली. हळूहळू आमच्या त्यांच्या सायकल दुकानात वेगवेगळया विषयांवर चर्चा गप्पा होऊ लागल्या. आमच्या मैत्रीची Wave length जुळल्यामुळे त्यांच्या घरी जाणं-येणं झालं. त्यांचे वडील श्री. संभाजी शिवराम दराडे (सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक) यांची भेट झाली, ओळख झाली, गप्पा-टप्पा झाल्या आणि त्यांच्या आगळ्या-वेगळया छंदाचा परिचय झाला, कोणाकडे नाण्यांचा संग्रह, नोटांचा संग्रह, टपाल तिकिटांचा संग्रह, जुन्या पोथ्यांचा संग्रह, जुन्या भांडयांचा संग्रह असतो छंद असतो. श्री. दराडे गुरूजींना बालपणापासून लग्नपत्रिकांच्या संग्रहाचा छंद आहे. बारामतीच्या पंचक्रोशीतील सर्वसामान्य नागररिकांपासून ते अनेक समाजकारणी, राजकारणी यांच्याबरोबरच मा. सुप्रियाताई सुळे, मा. अजित पवार व मा. शरद पवार यांच्याही लग्नपत्रिका त्यांच्या संग्रही आहेत. दरवर्षी मा. शरद पवार ‘दीपावली पाडवा’ या दिवशी बारामती येथील गोविंदबागेत सर्वांना भेटून शुभेच्छा देतात व घेतात. तो एक अनुपम सोहळा असतो. आपल्या वयाच्या पासष्टीत श्री. दराडे गुरुजींनी आपला मुलगा संजयकला दीपावली पाडव्याला मा. साहेबांची भेट घेऊन त्यांच्या आयुष्यातील एक अनमोल खजिना त्यांच्याकडे सुपुर्द करावयाचा आहे असे सांगितले. १ ऑगस्ट १९६७’ रोजी झालेल्या त्यांच्या विवाहाची पत्रिका अनमोल भेटीच्या रूपाने द्यावयाची आहे अशी इच्छा व्यक्त केली. बुधवार, दि. २९ ऑक्टोबर २००८ रोजी दीपावली पाडव्याच्या दिवशी श्री. दराडे गुरुजी व श्री. संजय दराडे यांनी रांगेत उभे राहून मा. साहेबांची भेट घेतली व त्यांच्या ४१ वर्षापूर्वी बारामती येथील शाहू हायस्कूल येथे संपन्न झालेल्या शुभविवाहाची पत्रिका भेट म्हणून दिली. रांगेत उभे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शुभेच्छा देणारे शुभेच्छा घेणारे मा. साहेब ४१ वर्षांपूर्वीची स्वतःच्या लग्नाची पत्रिका पाहून दराडे गुरुजींसारखी सर्वसामान्य माणसं आपल्यावर कोणकोणत्या पध्दतीने प्रकारे प्रेम करतात हे पाहून ६८ वर्षांचे असणारे मा. साहेब अक्षरशः भारावून गेले, लोकांसोबत प्रचंड गर्दीत असूनही क्षणभर ते भूतकाळात गेले.
श्री. दराडे गुरुजींच्या प्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली व ही लग्नपत्रिका दोघांनी मिळून विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलातील जनवस्तु संग्रहालयास भेट म्हणून दिली. मा. साहेब व दराडे गुरुजी या दोघांच्याही आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण होता. श्री. दराडे गुरुजींच्या या आयुष्यभराच्या छंदाचं त्यादिवशी चीज झाले असे मला वाटते. दै. ‘पुढारी’ चे उपसंपादक श्री. दिगंबर दराडे यांना या ‘छोटया लग्नाची मोठी गोष्ट’ समजल्यानंतर गुरुजींची समक्ष भेट घेऊन चर्चा करुन, समजून उमजून घेऊन ‘मा. साहेब व श्री. दराडे गुरुजी’ यांच्या या भेटीचे वार्तांकन मंगळवार, दि. १० डिसेंबर २०१२ रोजी मा. साहेबांच्या ७२ व्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर ‘छोटया लग्नाची मोठी गोष्ट…..’ या शीर्षकाने प्रसिद्ध करुन श्री. दराडे गुरुजींच्या सेवानिवृत्तीच्या आयुष्यात अलौकिक आनंद प्राप्त करुन दिला. श्री. दराडे गुरुजी यांच्याकडे मी ही लग्नपत्रिका पाहिली आणि मी थक्क झालो. महाराष्ट्राच्या शिल्पकाराचे मा. यशवंतराव चव्हाण यांचे मा. साहेब शिष्य व मानसपुत्र होते. मा. साहेब नुकतेच आमदार म्हणून निवडून आले होते. सौ. प्रतिभाकाकींचे वडील कै. सदुभाऊ शिंदे विख्यात क्रिकेटपटू होते. अशी लौकीक अर्थाने ‘श्रीमंती’ असूनसुद्धा लग्नपत्रिका अतिशय साधीसुधी होती. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बारामती येथे स्थापन केलेल्या छत्रपती शाहू हायस्कूल येथे १ ऑगस्ट १९६७ रोजी झालेला हा विवाहसुद्धा अतिशय साधेपणाने साजरा झाला होता. मा. साहेबांच्या मातोश्री सौ. शारदाबाई गोविंदराव पवार, वडील मा. गोविंदराव जिजाबा पवार हे दोघेही महात्मा जोतीराव फुले यांच्या सत्यशोधक विचारधारेचे असल्यामुळे मा. साहेबांच्या विवाहाची पत्रिका अतिशय साधीसुधी, विवाह सोहळा अतिशय साधेपणाने साजरा झालेला दिसून येतो. अगदी ऐतिहासिक काळापासून ते आजच्या तारखेपर्यंत समाजाच्या सर्व प्रकारच्या आर्थिक स्तरातील लोक खोट्या प्रतिष्ठेसाठी आपल्या मुला मुलींची लग्नं अगदी थाटामाटात करतात.
या देशावर; छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षि शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा, इ. महामानवांवर; पुरोगामी विचारांवर – विवेकवादावर; जे लोक प्रेम करतात व मा. साहेबांवरसुद्धा जे लोक प्रेम करतात त्यांनी मा. साहेबांच्या लग्नपत्रिकेचे, लग्नसोहळयाचे मा. साहेबांच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, १ ऑगस्ट २०१७ रोजी साजऱ्या होणाऱ्या मा. शरद पवार व सौ. प्रतिभाकाकी यांच्या विवाहाच्या सुवर्णमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनुकरण करावे असे वाटते.
अगदी काल-परवाची गोष्ट शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०१५ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील बहिःशाल शिक्षण मंडळाच्या वक्ते केंद्रकार्यवाह संयुक्त कृतिसत्रास उपस्थित राहून प्रा. डॉ. आनंदा गांगुर्डे, श्री. संजय जगताप (व्ही. आय. आय.टी., बारामती) यांच्या सोबत पुणे ते बारामती असा प्रवास करत होतो. या प्रवासात आम्ही मा. साहेबांबद्दल गप्पा मारत होतो, चर्चा करत होतो. तेव्हा श्री. संजय जगताप यांनी मा. साहेबांबाबत एक किस्सा सांगितला. VIIT च्या बाबतीत, विशेषतः संगणक साक्षरतेबद्दल मा. साहेब फारच संवेदनशील आहेत. VIIT च्या शैक्षणिक व इमारत उभारणीच्या निमित्ताने आमच्या या मित्राचा श्री. संजय जगताप यांचा मा. साहेबांशी सातत्याने संपर्क आला. मा. साहेबांची VIIT बद्दलची संवेदनशीलता, तळमळ, संगणक साक्षरतेबद्दलची उत्सुकता, त्यांचं प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या माणसांवरचं प्रेम, त्यांची दूरदृष्टी इ. पैलूंमुळे मा. शरद पवार नावाच्या एका वडिलधाऱ्या माणसाला खाली वाकून, पायाला हात लावून नमस्कार करण्याची फार दिवसांची वर्षांची श्री. संजय जगताप यांची इच्छा होती. पण मा. साहेबांना अशा बाबी आवडत नाहीत हे माहीत असल्यामुळे श्री. संजय जगताप यांचा धीर होत नव्हता व प्रत्यक्ष कृती करता येत नव्हती. VIIT ला मोठं करण्याच्या निमित्ताने मा. साहेबांचा सातत्याने सहवास लाभल्यामुळे जवळपास १३-१४ वर्षानंतर मानसिक तयारी झाल्यामुळे एके दिवशी धाडस करुन श्री. संजय जगताप यांनी त्यांना खाली वाकून नमस्कार करून, पदस्पर्श करण्याची आपली गेल्या काही दिवसांची वर्षांची इच्छा पूर्ण केली. पण त्यांच्या या कृतीवर मा. साहेबांची जी प्रतिक्रिया होती ती अतिशय महत्त्वपूर्ण होती. मा. साहेब म्हणाले, “अहो जगताप ! तुम्हाला माहीत आहे की अशी कृती मला आवडत नाही. आता ठीक आहे पण परत अशी कृती करू नका. आपण एकमेकांना हात जोडून नमस्कार करुन परस्परांबद्दल आदर व्यक्त करू या.” मा. साहेबांच्या या उद्गारातून मोठी माणसं किती साधी असतात, माणुसकीला जपणरी असतात, सर्वसामान्य माणसांचा आदर करणारी असतात याचे प्रत्यंतर येते.
सर्वच क्षेत्रांतील सर्व स्तरांतील लोकांना मा. साहेबांना पाहणं, ऐकणं, त्यांच्या सहवासात राहण्याची इच्छा व उत्सुकता असते. माझ्याही बाबतीत हेच घडत राहतं. मा. साहेबांना पाहिल्यानंतर, त्यांची भाषणं ऐकल्यानंतर, त्यांच्याबद्दलच्या बातम्या वर्तमानापत्रात वाचल्यानंतर, त्यांची चरित्रं, त्यांची व्यक्तिचित्रं वाचल्यानंतर असे लक्षात येते की त्यांचा प्रचंड मोठ्या संख्येने लोकसंग्रह आहे, सर्व स्तरांतील सर्व प्रकारच्या लोकांशी त्यांची मैत्री आहे, अफाट स्मरणशक्ती आहे, प्रज्ञा-प्रतिभा प्रतिमा कणखर शिस्त यांचा अपूर्व संगम असणारे नेतृत्व आहे, प्रशासनावर जबरदस्त पकड आहे. आयुष्यामध्ये चढ-उतार, यश-अपयश इ. टप्पे येत असतात, परंतु परिवर्तनाच्या दिशेने समाजाला प्रवास करायला प्रवृत्त करणारी असामान्य माणसं दुर्मिळ असतात असा एक असामान्य माणूस म्हणून मा. साहेब राज्याच्या, देशाच्या व जगाच्या नकाशावर दीपस्तंभासारखे आहेत.
मा. साहेबांना त्यांच्या 12 डिसेंबर 2024 रोजी साजऱ्या होणाऱ्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !
लेखक
प्रा.डॉ. श्रीराम यशवंत गडकर
मराठी विभाग प्रमुख
विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय