Newsworld marathi Pune : आज सकाळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी महात्मा फुले वाड्यात बाबा आढाव यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच या भेटीनंतर माध्यमांशी बोलत असताना निवडणुकीतील गैरप्रकाराबाबत लोकांमधून उठाव होण्याची आता गरज असल्याचे ते म्हणाले.महाराष्ट्र विधानसभेचा ज्याप्रकारे निकाल लागला त्याचा धक्का अनेकांना बसलेला दिसत आहे. विरोधकांनी निकालावर टीका सुरू केली असून पराभवासाठी ईव्हीएमला जबाबदार धरले. राजकीय पक्ष केवळ भाष्य करत असताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव हे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून गुरुवारी (२८ नोव्हेंबर) महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषणाला बसले. ९५ वर्षीय बाबा आढाव यांच्या या आंदोलनाची दखल राजकीय नेतेही घेत आहेत.माध्यमांशी बोलत असताना शरद पवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यासंबंधीची अस्वस्थता संपूर्ण राज्यात दिसत आहे. निवडणुकीत झालेली अनियमितता पाहून बाबा आढाव यांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत झालेला सत्तेचा गैरवापर आणि पैशांचा महापूर याआधी कधीही पाहायला मिळाला नव्हता. स्थानिक निवडणुकांत अशा घटना ऐकायला मिळतात. पण राज्याच्या निवडणुकात असे चित्र कधी पाहायला मिळाले नव्हते. त्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.