Newsworldmarathi Pune : हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन पुण्यामध्ये करण्यात आले आहे. यामध्ये हिंदू संस्कृती, संस्कार आणि सामाजिक सेवा कार्याचे विराट दर्शन पुणेकरांना घडणार आहे. दिनांक १९ ते २२ डिसेंबर २०२४ दरम्यान स.प.महाविद्यालय मैदान येथे हा भव्य महोत्सव होत असून यामध्ये महाराष्ट्रातील अनेक महत्वपूर्ण देवस्थाने, सामाजिक व धार्मिक संस्थांनी सक्रिय सहभाग घेतला आहे, अशी माहिती हिंदू अध्यात्मिक सेवा संस्थेचे अध्यक्ष अशोक गुंदेचा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला हिंदू सेवा महोत्सवाचे अध्यक्ष व कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, संस्थेचे महामंत्री किशोर येनपुरे, उपाध्यक्ष पंडित शिवकुमार श्री, इस्कॉनचे संजय भोसले, स्वामीनारायण मंदिरचे राधेश्याम अग्रवाल, चरणजितसिंग सहानी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
महोत्सवाचे उद्घाटन गुरुवार, दि. १९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, प.पू.स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज, इस्कॉन चे गौरांग प्रभू, ज्योतिषरत्न जैन मुनी लाभेश विजय म.सा. यांच्या हस्ते होणार आहे. मठ-मंदिरांच्या सेवाकार्याचे प्रदर्शन, जैन तत्वज्ञानावर आधारित भव्य पॅव्हेलियन, शिव गौरवगाथा महानाट्य, शिख समाजाच्या चार शहजादे बलिदानावर आधारित लाईव्ह शो, १ हजार बालिकांचे कन्यावंदन, १ हजार आचार्य वंदन, १ हजार वादकांद्वारे मृदुंग वादन, १ हजार मातृ-पितृ वंदन, शेकडो महिलांद्वारे अथर्वशीर्ष, श्रीसुक्त पठण, विष्णू सहस्त्रनाम व सौंदर्य लहरी पठण, देशभक्ती जागरण आधारित अनेक कार्यक्रम, वीरमाता व वीरपत्नी सन्मान सोहळा,दगडूशेठ गणपती मंदिरा द्वारे मोफत आरोग्य शिबीर, संत संमेलन असे असंख्य कार्यक्रम होणार आहेत. महोत्सवाला देशभरातील साधूसंत, राज्यपाल, केंद्रीय मंत्री व मुख्यमंत्री यांची उपस्थिती देखील असणार आहे.
गुरुवार, दि.१९ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता १ हजार बालिकांचे कन्यावंदन आणि सायंकाळी ७.३० वाजता सफर-ए-शहादत हा पंजाबी कलाकारांचा साऊंड व लाईट शो हे प्रमुख आकर्षण असणार आहे. शुक्रवार, दि. २० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सामूहिक वंदे मातरम कार्यक्रमांतर्गत वीरमाता, वीर पत्नी सन्मान सोहळा होणार आहे. तर, सायंकाळी ७ वाजता शिव गौरव गाथा हे महानाटय सादर होईल.
शनिवार, दि. २१ डिसेंबर रोजी तब्बल ३ हजार पुणेकरांच्या उपस्थितीत मातृ-पितृ वंदनाचा कार्यक्रम सकाळी १० वाजता होणार आहे. तर, दिवसभरात चेंदा मेलम, केरळी वाद्यवादन, भरतनाट्यम नृत्यप्रकार सादरीकरण कार्यक्रम होईल. शेवटच्या दिवशी रविवार, दि. २२ डिसेंबर रोजी १ हजार वादकांचे मृदुंग वादन हा दुपारी ४ वाजता उपक्रम होणार आहे. तर, सायंकाळी ७ वाजता संत संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
पुण्यातील प्रमुख संस्था, मंदिरे यांसह राज्यातून अनेक संस्था, प्रमुख देवस्थाने, संघटनांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. केवळ हिंदू शक्तीचे दर्शन घडविणे हा महोत्सवाचा उद्देश नसून हिंदू संस्कृतीतील संस्कार, सृष्टी संवर्धन, देशभक्ति जागरण, नारी सन्मानमध्ये अभिवृद्धी, पर्यावरण संरक्षण, इकॉलोजी संतुलन याचे महत्व सर्वांपर्यंत पोहोचविणे हा आहे.
एकविसाव्या शतकात धार्मिक – सामाजिक संस्थांनी कशा प्रकारे वाटचाल करावी, समाजातील गरजूंसाठी कशा प्रकारे उभे रहावे, याचे मार्गदर्शन देखील महोत्सवात केले जाणार आहे. संत संमेलनासारख्या प्रमुख कार्यक्रमाद्वारे संत महंतांचे विचार ऐकण्याची आणि नाटक व सादरीकरणाद्वारे हिंदू संस्कृतीचा इतिहास जाणून घेण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. चार दिवसीय महोत्सवाला विनामूल्य प्रवेश असून पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदू सेवा महोत्सवाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी केले आहे.