Newsworldmarathi Team : काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये कर्नाटकातील एका व्यावसायिकाचाही समावेश होता. मंजुनाथ राव असं त्यांचं नाव होतं.
ते तीन दिवसांपूर्वी त्यांची पत्नी पल्लवी आणि मुलासह जम्मू-काश्मीरला फिरण्यासाठी गेले होते. मुलाला पीयूच्या परीक्षेत 97 टक्के गुण मिळाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी ते तिघं काश्मीरला गेले होते. परंतु पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात राव यांच्या कुटुंबीयांनी आपलं सर्वस्व गमावलंय. पत्नीसमोरच दहशतवाद्यांनी मंजुनाथ यांना गोळ्या झाडल्या. एका दुकानदाराशी ते बोलत असताना दहशतवाद्यांनी गोळीबाराला सुरुवात केली. अतिरेक्यांनी मंजुनाथ यांच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. पतीला आपल्या डोळ्यासमोर प्राण गमावताना पाहून मंजुनाथ यांच्या पत्नीने “मलाही मारून टाका..” असं दहशतवाद्यांना म्हटलं होतं.
Oplus_131072
मंजुनाथ आणि त्यांचे कुटुंबीय 19 एप्रिल रोजी काश्मीरसाठी रवाना झाले होते. ते 24 एप्रिलला काश्मीरहून शिवमोग्गाला परतणार होते. एका ट्रॅव्हल एजन्सीच्या माध्यमातून त्यांनी ही ट्रीप बुक केली होती. हल्ल्यानंतर एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मंजुनाथ यांच्या पत्नीने हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग सांगितला. “माझ्या मुलाने सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. माझा पती एका दुकानदाराशी बोलत होता, तेव्हा दहशतवाद्यांनी गोळीबाराला सुरुवात केली. त्यांनी माझ्या पतीच्या डोक्यात गोळी झाडली. जेव्हा मी आणि माझा मुलगा त्यांच्याजवळ गेलो, तेव्हा त्यांनी आपले प्राण गमावले होते. मी दहशतवाद्यांना ओरडून म्हणाले की, तुम्ही माझ्या पतीला मारलंत, मलाही मारून टाका. माझ्या मुलानेही तेच म्हटलं. पण तो अतिरेकी म्हणाली, नाही मारणार.. मोदीला जाऊन सांग. ही भयानक घटना तू मोदीला जाऊन सांगावं यासाठी तुला सोडून देतोय, असं म्हणून तो तिथून निघून गेला”, असं त्यांनी सांगितलं
पुणे- काल पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला करीत गोळीबार केला, या गोळीबारात 26 जणांचा मृत्यू झालाय. हल्ल्यातील मृतांमध्ये महाराष्ट्रातील पाच पर्यटकांचा समावेश आहे, यातील दोन पर्यटक हे पुण्याचे असून, कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचा यात मृत्यू झालाय. पुण्यातील कोंढवा साईनगर येथे कौस्तुभ गणबोटे राहत होते, तर कर्वेनगर येथे संतोष जगदाळे राहायला होते. या घटनेने दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगरा कोसळलाय.
Oplus_131072
आमचा आधारच गेला आहे :पहलगाममध्ये झालेल्या घटनेत कौस्तुभ गणबोटे यांचा मृत्यू झालाय. त्यानंतर त्यांच्या काकी ज्योती गणबोटे म्हणाल्या की, कौस्तुभ जाण्याच्या आधी मला येऊन भेटला होता आणि त्याने सांगितलं होतं की, मी माझ्या मित्राच्या बरोबर फिरायला चाललोय, तेव्हा मी बोलली होती की, जा पण काळजी घे, परंतु काल फक्त गोळीबाराची बातमी समजली होती आणि आज अशी बातमी आल्याने आमचा आधारच गेला आहे. तो आमच्या घरातील सर्वात मोठा होता, असं म्हणत काकी ज्योती गणबोटे या भावूक झाल्यात.
Newsworldmarathi Kashamir : जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय. हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय. यात डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झालाय.
Oplus_131072
डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झालाय. तर महाराष्ट्रातले एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हल्ल्यात जखमी झालेत.
महाराष्ट्रातील मृतांची नावे-
1) अतुल मोने – डोंबिवली
2) संजय लेले – डोंबिवली
3) हेमंत जोशी- डोंबिवली
4) संतोष जगदाळे- पुणे
5) कौस्तुभ गणबोटे- पुणे
6) दिलीप देसले- पनवेल
जखामींची नावे-
1) एस बालचंद्रू
2) सुबोध पाटील
3) शोबीत पटेल
Newsworldmarathi Pune : प्रत्येक काम करताना चांगले वाईट अनुभव येत असतात. पण आपल्याला चांगले काम करायचे असेल तर वाईट गोष्टीकडे लक्ष न देता आपल्या ध्येया कडे लक्ष केंद्रीत कर असा सल्ला माझा शुभम हा नेहमी मला देतो आणि माझा पाठीशी खंबीरपणे उभा असतो. त्यामुळे मी अशा ट्रोलिंगकडे लक्ष देत नसल्याचे माझी सरपंच निर्मला नवले यांनी सांगितले. स्टोरी डॉट कॉम या यु ट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखती वेळी त्या बोलत होत्या.
Oplus_131072
यावेळी त्यांनी गावात अनेक विकास कामे केली त्याचा आढावा दिला. शिवाय गावाकऱ्यांच्या साथीने गावात सर्वात जास्त कर संकलन करणारी आमची ग्रामपंचायत आहे. यावेळी जास्तीत जास्त महिलांनी राजकारणात यावे आणि समाजसेवा करावी असा सल्ला निर्मला नवले यांनी दिला.
गावात नळ पाणी पुरवठ्याचे काम पूर्ण करण्यात मला यश आले याचा मला खूप आनंद वाटतो. ही योजना तात्पुरती चालू न राहता कायम स्वरूपी कशी सुरु राहील या साठी मी आणि गावकरी मिळून टेकनॉलॉजीचा वापर करून नळ मिटर लावून घेतला आणि ही योजना मला यशस्वी करता आल्याचेही नवले यांनी सांगितले.
स्टोरी डॉट कॉमची निर्मला नवले यांची संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा….
https://youtu.be/YC_rEY5E_Jc?si=7OhcDjB4u2ospb6_
Newsworldmarathi Mumbai : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे रुळालगत भांडण करत असलेल्या तीन मित्रांपैकी दोघांनी रेल्वे रूळ ओलांडून पळून जाण्याचा प्रयत्न करताना वेगात आलेल्या लोकलच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ऐरोली व दिघा रेल्वे स्थानकांदरम्यान ही घटना घडली आहे. सागर संजीव सोनवणे (वय-२२), सचिन छबुराव रोकडे (वय-२४) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. या अपघाताप्रकरणी ठाणे रेल्वे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सागर सोनवणे आणि सचिन रोकडे हे ऐरोली नाका परिसरात राहत होते. रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सागर आणि सचिन व त्यांचा तिसरा साथीदार नरेश सोनवणे (वय-२७) हे तिघेही ऐरोली व दिघा गाव या रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाजवळ एकमेकांसोबत भांडण करत होते.
Oplus_131072
या भांडणादरम्यान नरेश दोघांना मारण्यासाठी त्यांच्या मागे धावला असता सागर आणि सचिन या दोघांनी त्याच्यापासून दूर पळून जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकलने सागर आणि सचिन या दोघांना जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सागर व सचिन या दोघांचा मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती रेल्वे पोलिसांना आणि आरपीएफच्या जवानांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांचे मृतदेह ठाणे येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये पुढील कार्यवाहीसाठी पाठवून दिले. या अपघाताप्रकरणी ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाणे यांनी दिली आहे.
Newsworldmarathi Pune : समाजात प्रचंड असंवेदनशीलता, क्रूरता, हेवेदावे, माणूसकीचा अंत आणि अस्वस्थता माजवणाऱ्या घटना सातत्याने घडत आहेत. अशा घटना घडू नये असे वाटत असेल तर बालवायताच संवेदनशीलता हे मूल्य प्रत्येक शाळेत रुजवले गेले पाहिजे. माणूस म्हणून जगताना माणूसकीचा अर्थ प्रत्येक विद्यार्थ्याला समजला गेला पाहिजे तरच समाज सुखी आणि समृद्ध होईल असे प्रतिपादन शिवाजी खांडेकर यांनी केले.
नुकतेच राष्ट्र सेवा दल संचालित शिक्षण प्रशासक मंडळाच्या साने गुरुजी प्राथमिक शाळेत ” संवेदना निधी प्रदान समारंभ” पार पडला.त्या प्रसंगी ते बोलत होते.
Oplus_131072
मन समृद्ध माणसं समाज समृद्ध करतात, आदर्श मूल्य संस्कार हेच सामाजिक भान निर्माण करतात या उद्देशाने साने गुरूजी प्राथमिक शाळेत मधूकरराव निरफराके सहज शिक्षण प्रकल्पांतर्गत विविध उपक्रम राबविले जातात त्यापैकी सर्व समाजाला दिशादर्शक ठरावा असा हा संवेदना निधी उपक्रम नूकताच संपन्न झाला.
या उपक्रमांतर्गत दर शुक्रवारी संवेदनशीलता मूल्यावर अधारित एक कथा सांगितली जाते व दर शनिवारी प्रत्येक विद्यार्थ्याला एक रुपया आणण्याचे आवाहन केले जाते. वर्षभर हा निधी संवेदना निधी डब्यात टाकला जातो. जमा झालेला हा निधी दरवर्षी अंध, अपंग,वृद्धाश्रम अशा समाजातील दुर्लक्षित संस्थेला प्रदान करण्यात येतो.संवेदनशिलतेबरोबरच अशा दुर्लक्षित व्यक्तिंविषयी आपूलकी निर्माण व्हावी व आपणही समाजाचे काही देणे लागतो ही भावना विद्यार्थ्यांत निर्माण व्हावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या वर्षी हा निधी नर्हे येथील लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेच्या आश्रमास प्रदान करण्यात आला. संस्थेचे प्रमुख अर्जून केंद्रे यांनी तो कृतज्ञतेने स्वीकारला.
सोबत शिक्षक,पालक व विद्यार्थ्यांनी “एक मूठ तांदूळ एक मूठ साखर” हा उपक्रम राबवत साधारण ५० -५० किलो तांदूळ व साखरही या संस्थेकडे सुपूर्द केली. यात इनरव्हील क्लब ऑफ पुणे प्लॅटीनमच्या कोषाध्यक्षा माधूरी बोरा, अध्यक्षा प्रिती शिरुडकर, चिटणीस वृषाली शिरूडकर, सदस्या संगिता गोवळकर यांचाही वाटा मोठा होता.
यावेळी व्यासपीठावर प्रशासक मंडळाचे सचिव मा शिवाजी खांडेकर, मुख्याध्यापक मीना काटे, सामाजिक कार्यकर्ते अमोल कुलकर्णी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय ससे, तेजस्विनी फूलफगर, विठ्ठल शेवते,शितल खेडकर, लक्ष्मी कांबळे यांनी परिश्रम घेतले.प्रास्ताविक मुख्याध्यापक मीना काटे यांनीकेले.सूत्रसंचालन सोपान बंदावणे यांनी केले तर आभार संगिता गोवळकर यांनी मानले.
Newsworldmarathi Pune : भोर तालुक्यातील काँग्रेसचे माजी आमदार राहिलेले संग्राम थोपटे मंगळवारी (दि. २२) मुंबईत भाजपात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत थोपटे कमळ हातात घेणार आहेत.
Oplus_131072
दरम्यान, थोपटे यांच्या पक्षप्रवेशाला स्थानिक भाजप नेत्यांनी विरोध केला असून, घरात बाहेरचे पाहुणे जास्त झाले की घरातील लोकांना बाहेर झोपावे लागते, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करणारे पत्र चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना लिहिले आहे.
पुण्यातील भोर तालुक्यात गेली ४० वर्षे वर्चस्व राखलेल्या थोपटे कुटुंबीयांच्या राजकारणाला २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत घरघर लागली. संग्राम थोपटे यांचा पराभव झाला. अखेर भविष्याची राजकीय दिशा व गरज ओळखून संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी जाहीर केला. त्यानुसार, मंगळवार, २२ एप्रिल रोजी प्रदेश भाजप कार्यालयात थोपटे यांचा मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश होत आहे.
तालुक्यातील गेली अनेक वर्षे काम करत असलेल्या भाजप कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता बाहेरच्या लोकांना पक्षात घेतले जात आहे. ज्यांचा आयुष्यभर तिरस्कार केला ते आता आपल्यासोबत येत आहेत. घरात बाहेरचे पाहुणे जास्त झाले की घरातील लोकांना बाहेर झोपावे लागते, अशा शब्दांत नेत्यांनी वरिष्ठांकडे पत्राद्वारे नाराजी व्यक्त केली आहे.
नेत्यांच्या पायाशी लुडबूड करणारे लोक पुढे निघून जातात आणि हाडाचा कार्यकर्ता कायम दुर्लक्षित राहतो? हे असे का याचे उत्तर वरिष्ठांनी अवश्य द्यावे, असे या पत्रात म्हटले आहे.
पुणे : पुणे-सातारा महामार्गावरील राजगड वॉटर पार्क अँड रिसॉर्टमध्ये झिपलाईनवरुन पडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना 18 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी घडली. तरल अरुण अटपळकर (वय 28) असे मृत तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे अटपळकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पार्कमध्ये पुरेशी सुरक्षा नसल्यामुळे हा अपघात झाला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास करत आहेत.
अटपळकर कुटुंबीय सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी राजगड वॉटर पार्कमध्ये गेले होते. तिथे झिपलाईन करताना तरलचा तोल गेला आणि ती खाली पडली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या दुर्घटनेमुळे पार्कमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तरलचे काका नंदकिशोर श्रीपती अटपळकर (वय 50) यांनी सांगितले की, उन्हाळ्याची सुट्टी असल्याने कुटुंबातील 12 सदस्य राजगड वॉटर पार्कमध्ये मजा करण्यासाठी गेले होते. प्रत्येकी 1200 रुपये प्रवेश शुल्क भरले. दिवसभर खेळ खेळले, जेवण केले आणि सायंकाळी झिपलाईन करण्याचं ठरलं. तरल उत्साहाने झिपलाईन करायला गेली, पण अचानक ती 25-30 फूट उंचीवरुन खाली सिमेंटच्या ब्लॉकवर पडली.
पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख म्हणाले, “आमचे पथक राजगड वॉटर पार्कमधील तरुणीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करत आहे. लवकरच अहवाल आल्यानंतर कारवाई सुरू करू. राजगड वॉटर पार्क अँड रिसॉर्ट सध्या बंद ठेवण्यात आले आहे. अशा घटना टाळण्यासाठी योग्य सुरक्षा उपाययोजना करणे आवश्यक आहे.”
बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी संपायचं काही नाव घेत नसताना माजलगाव शहरातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आधी भाजपच्या पदाधिकाऱ्याची भरदिवसा निर्घृण हत्या, नंतर चिकन विक्रीच्या किरकोळ वादातून अल्पवयीन मुलाची हत्या तर आता बिल देण्यावरून झालेल्या क्षुल्लक वादातून हॉटेल मालकाची हत्या करण्यात आली आहे. महादेव गायकवाड (वय 54 वर्षे) असे हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील माजलगाव पुन्हा एकदा निर्घृण हत्येच्या घटनेने हादरले आहे. हॉटेल (ढाबा) मालक व त्याच्या मुलावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (20 एप्रिल) रात्री उघडकीस आली. यात गंभीर जखमी असलेल्या बाप-लेकावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते, यात महादेव गायकवाड यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. आशुतोष महादेव गायकवाड याच्यावर उपचार सुरू आहेत.
माजलगाव शहरापासून 4 किलोमिटर अंतरावर नागडगाव पाटी कॉर्नरवरील गावरान ढाबा मालक महादेव गायकवाड यांची एका टोळक्याने धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या केली. महादेव गायकवाड (रा. मंजरथ रोड, माजलगाव) हे रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता हॉटेलमध्ये नेहमीप्रमाणे बसले होते. तितक्यात माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथील एका टोळक्याने बिल देण्यावरून महादेव गायकवाड यांच्याशी वाद घातला. वाद वाढला असता टोळक्याने महादेव गायकवाड यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. यात महादेव गायकवाड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. टोळक्याने महादेव गायकवाड यांचा मुलगा आशुतोष याच्यावरही प्राणघातक हल्ला केला.
Newsworldmarathi pune : सध्या जागतिक स्तरावर सुरू असलेल्या आर्थिक अस्थिरतेमुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. चीन आणि अमेरिकेतील व्यापार युद्धामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय शोधत असून, त्याचा परिणाम सरळपणे सोन्याच्या दरांवर होत आहे. परिणामी, आज सोन्याचा दर तब्बल 1,01,400 रुपये प्रति तोळा या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला आहे.
लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर आधीच सोन्याला मागणी (Gold Rate Increase) वाढलेली असताना आता दरवाढीमुळे सामान्य खरेदीदारांचे बजेट ढासळण्याची शक्यता आहे. केवळ शोभेची वस्तू म्हणून नव्हे, तर गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करणाऱ्यांच्या टेन्शनमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे.
चीन-अमेरिका दरम्यान वाढणाऱ्या तणावामुळे जागतिक आर्थिक परिस्थितीत अस्थिरता निर्माण झाली आहे. जागतिक मंदी येण्याची शक्यता गुंतवणूकदारांना सतावत असून, अशा परिस्थितीत पारंपरिक व सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे झुकाव वाढला आहे. त्यामुळे सोन्याची मागणी (Gold Rate) वाढत आहे आणि दरही झपाट्याने वर जात आहेत.
गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते, येत्या काही महिन्यांतही सोन्याचे दर चढे राहू शकतात. त्यामुळे अधिक परतावा मिळवण्यासाठी अनेक तज्ज्ञांनी यापूर्वीच सोन्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. हीच गोष्ट आता प्रत्यक्षात उतरतेय, असंही स्पष्ट होत आहे. त्यामुळे सोन्याची गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा योग्य काळ असू शकतो.