Homeभारतसिध्दनाथाच्या नावानं चांगभलं... खरसुंडीत चैत्री यात्रा उत्साहात

सिध्दनाथाच्या नावानं चांगभलं… खरसुंडीत चैत्री यात्रा उत्साहात

Newsworldmarathi Pune: खरसुंडी (ता. आटपाडी) येथे सिद्धनाथ देवाच्या चैत्री यात्रेला यंदा प्रचंड उत्साहात सुरुवात झाली. तब्बल ४० अंशांपर्यंत पोहोचलेल्या तापमानातही भाविकांनी कडाक्याच्या उन्हाची तमा न बाळगता “सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं”चा जयघोष करत सासनकाठी व पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

चैत्र शुद्ध अष्टमीपासून यात्रेची सुरुवात झाली. अष्टमीच्या सायंकाळी श्री जोगेश्वरी मंदिर परिसरात सिद्धनाथ व जोगेश्वरी देवीचा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यानिमित्त पारंपरिक मंगलकार्य व धार्मिक विधी मोठ्या भक्तिभावात पार पडले. महाराष्ट्र, कर्नाटकसह विविध राज्यांतून आलेल्या भाविकांनी यात्रेत हजेरी लावली.

सोमवारपासूनच भाविकांचे आगमन सुरू झाले होते. मंगळवारी पहाटेपासून मंदिर परिसरात मोठी गर्दी उसळली. विविध गावांतील मानाच्या सासनकाठ्या मध्यरात्रीपासूनच मंदिरात दाखल झाल्या. २५ ते १०० फूट उंच सासनकाठ्या रंगीबेरंगी पताकांनी सजवून वाजत-गाजत आणण्यात आल्या. गुलाल व खोबऱ्यांची उधळण करत भाविकांनी भक्तीचा जल्लोष केला.

दुपारी सिद्धनाथाची पालखी जोगेश्वरी देवीच्या भेटीसाठी निघाली. पालखी मार्गावर सासनकाठ्यांची मोठी झुंबड उडाली. लाखो भाविकांनी पालखी दर्शनासाठी गर्दी केली. पालखी मंदिरातून बाहेर पडताच जयघोष व गुलाल उधळणीने परिसर दुमदुमला.

जोगेश्वरी मंदिरात पालखी पोहोचताच सासनकाठ्यांनी पालखीस टेकून मानवंदना दिली. तीव्र उष्णतेमुळे भाविकांना त्रास सहन करावा लागला, मात्र भक्तीरसात तल्लीन झालेल्या भाविकांनी सर्व कष्ट विसरून यात्रेचा आनंद लुटला.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments