Newsworldmarathi Pune : पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात एका २५ वर्षीय डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ज्या तरुणासोबत लग्नाचं स्वप्न रंगवलं होतं, त्याच तरुणाने धोका दिल्याच्या कारणातून पीडित डॉक्टरने विषारी औषध पिऊन आयुष्याचा शेवट केला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
पल्लवी पोपट फडतरे असं आत्महत्या केलेल्या २५ वर्षीय महिला डॉक्टरचे नाव आहे. तर कुलदीप आदिनाथ सावंत असं आरोपी तरुणाचं नाव आहे. आरोपी कुलदीप याने विवाहित असूनही मेट्रीमोनियल साइट जीवनसाथी डॉट कॉमवर रजिस्ट्रेशन केलं होतं. याच वेबसाईटच्या माध्यमातून त्यांनी पीडितेशी संपर्क साधला होता. तसेच आपण लग्नासाठी इच्छुक असल्याचं आरोपीनं पीडितेला सांगितलं.
सुरुवातीला पीडित महिला डॉक्टरने आरोपीसोबत लग्न करण्यास नकार दिला. मात्र आरोपीनं पीडितेशी संपर्क साधून तिचा विश्वास संपादन केला. तिला लग्न करण्याचं आमिष दाखवत तिच्याकडून वेळोवेळी दहा लाख रुपये घेतले. ज्यावेळी तरुणीने आरोपीकडे लग्नासाठी विचारणा केली, तेव्हा आरोपीनं लग्न करण्यास टाळाटाळ करायला सुरुवात केली. तसेच आपण विवाहित असून पत्नी गर्भवती असल्याचं आरोपीनं पीडितेला सांगितलं. होणाऱ्या पतीचा हा भूतकाळ समजल्यानंतर पीडित तरुणीला मानसिक धक्का बसला. एवढेच नव्हे तर आरोपीनं पीडितेकडून घेतलेले दहा लाख रुपये परत देण्यास देखील टाळाटाळ केली