Newsworldmarathi Pune: पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात सातत्याने मोलाची भर टाकणारा “पुणे नवरात्रौ महोत्सव” यंदा विशेष आकर्षण घेऊन येत आहे. माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या श्री लक्ष्मी माता मंदिर, शिवदर्शन येथे यंदा मदुराई येथील सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिराचा देखावा साकारण्यात येणार आहे. या भव्य देखाव्याचे उद्घाटन सोमवारी, २२ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध सिने अभिनेत्रीच्या हस्ते होणार असून पुणेकरांसाठी हा एक आगळावेगळा सांस्कृतिक अनुभव ठरणार आहे.
या देखाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे तब्बल ७० फुटी उंच गोपुर. दक्षिण भारतीय शैलीत उभारण्यात आलेला हा गोपुर महोत्सवाचे विशेष वैशिष्ट्य ठरणार आहे. उद्घाटनावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागुल यांनी केले आहे.
शिवदर्शन–सहकारनगर परिसरात आबा बागुल यांनी १९९३ च्या सुमारास दाक्षिणात्य धाटणीचे श्री लक्ष्मीमातेचे भव्य मंदिर उभारले. देवीच्या चरणी सेवा अर्पण करण्यासाठी त्यांनी “पुणे नवरात्रौ महोत्सव” सुरू केला. या महोत्सवाची सुरुवात कै. भारतरत्न स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्या अभंगवाणीने झाली होती. तसेच भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी य प्रसंगी पसायदान गाऊन शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे सुरुवातीपासूनच या उत्सवाला एक वेगळा सांस्कृतिक आणि अध्यात्मिक आयाम लाभला आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सवात पुणेकरांना धार्मिक आणि सांस्कृतिक देखाव्यांचा संगम अनुभवायला मिळणार आहे. या वर्षीचा मीनाक्षी मंदिराचा देखावा पुणेकरांसाठी विशेष आकर्षण ठरणार असून देवीच्या चरणी सेवा अर्पण करताना दक्षिण भारताच्या मंदिर स्थापत्यशैलीचा अप्रतिम अनुभव घेण्याची संधी लाभणार आहे.
पुणे नवरात्रौ महोत्सव हे केवळ धार्मिक सोहळा न राहता सांस्कृतिक जडणघडणीतही महत्त्वाचे योगदान देत आहे. यंदा हा महोत्सव पुणेकरांसाठी पर्वणीच ठरणार आहे.
Newsworldmarathi Pune: डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यालयातील इयत्ता दहावी व बारावीच्या 25 विद्यार्थ्यांनी शिक्षकांची व 4 विद्यार्थ्यांनी सेवकांची भूमिका पार पाडली. प्राचार्य म्हणून सुमित सरोज तर पर्यवेक्षक म्हणून सार्थक थिटे यांनी जबाबदारी सांभाळली.
यावेळी विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांचे अध्यापन केले. यासाठी विद्यार्थ्यांनी गेली चार दिवस पाठ टाचणासहित विषय आणि आशयाची तयारी केली होती.
उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनीदेखील विद्यार्थी शिक्षकांना चांगल्या प्रकारे सहकार्य केले उत्कृष्ट तासिका घेतल्याबद्दल अपेक्षा सुरवसे, सुशांत सूर्यवंशी,अनुष्का सितापुरे, सोनाली बनसोडे या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले तर परिपाठाचे उत्तम आयोजन केल्याबद्दल कौस्तुभ भालेराव या विद्यार्थी शिक्षकाचेही अभिनंदन करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्र सेवा दल संचालित शिक्षण प्रशासक मंडळाचे सचिव शिवाजी खांडेकर, विद्यालयाचे प्राचार्य अनिल कांबळे, पर्यवेक्षक जीवन इंगळे विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर उपस्थित होते शिवाजी खांडेकर यांनी सर्व उपस्थितांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊन शिक्षकांचा समाज व देशाच्या जडणघडणीत असलेल्या योगदान विशद केले.
विद्यार्थी शिक्षकांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना समोर बसून शिकणे जितके सोपे तितकेच शिक्षक म्हणून उभे राहून शिकवणे अवघड आहे याची आम्हाला जाणीव झाली तसेच आजचा शिक्षक दिन हा आम्हाला मोलाचा अनुभव देणारा ठरला जो आम्ही कधीच विसरणार नाही असे सांगितले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक मानसिंग गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.
गणेशोत्सव काळात तयार होणाऱ्या निर्माल्याचे खतामध्ये रूपांतर करून पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यासाठी व्हिजन सोशल फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने “निर्माल्य वाहन आपल्या दारी” या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या निर्माल्य वाहनाचे उद्घाटन अभि ग्रुप ऑफ कंपनीजचे जितेंद्र जोशी व माजी सभागृह नेते निलेश निकम यांच्या हस्ते पार पडले.
गणेश पूजनासाठी वापरल्या जाणाऱ्या फुले, फळे, नारळ यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर निर्माल्य तयार होते. या निर्माल्याची थेट नदीत विल्हेवाट लागून जलप्रदूषण होऊ नये म्हणून नागरिकांच्या दारापर्यंत निर्माल्य वाहन जाऊन संकलन केले जाते. व्हिजन सोशल फाउंडेशन गेली २० वर्षे हा उपक्रम सातत्याने राबवत असून, “तुम्ही आम्हाला निर्माल्य द्या – आम्ही तुम्हाला खत देऊ” या संकल्पनेतून हा उपक्रम जनतेत लोकप्रिय झाला आहे.
निर्माल्यावर प्रक्रिया करून दीड-दोन महिन्यांनी दिवाळीच्या सुमारास खत तयार केले जाते आणि नागरिकांना ते मोफत वितरित केले जाते. तसेच गेल्या सात-आठ वर्षांपासून खताबरोबरच रोपेही दिली जात आहेत. या उपक्रमामुळे दरवर्षी दोन ते तीन टन निर्माल्य जमा होऊन पर्यावरणपूरक खत तयार होते.
फाउंडेशनचे अध्यक्ष विकास डाबी म्हणाले की, विसर्जनानंतर नदीपात्रात साचणारा निर्माल्याचा थर हे प्रदूषणाचे मोठे कारण ठरते. ज्या गणरायाची भक्तिभावाने पूजा करतो, त्याचे निर्माल्य योग्य पद्धतीने वापरले जावे या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला. नागरिकांना ही संकल्पना आवडल्याने या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळतो आहे.
उद्घाटन प्रसंगी आदित्य माळवे, सतीश बहिरट, शैलेश बडदे, सचिन वाडेकर, संतोष काळे, सचिन मानवतकर, केशवराज धर्मावत, लक्ष्मण नलावडे, सुरेश शिंदे, विनोद बांदल, मुकेश जाधव तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. यंदा या उपक्रमाचे २० वे वर्ष असून संयोजन विकास डाबी यांनी केले.
Newsworldmarathi Pune:रत्नजडीत रथाला पुष्पांची आकर्षक सजावट, त्यावर कोल्ड फायरची विद्युत रोषणाई, भंडाऱ्याची उधळण, ठिकठिकाणी होणारी पुष्पवृष्ठी आणि ढोल ताशांचा गजरात व मोरया मोरया जयघोषात दिमाखदार मिरवणुकीने हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. यावेळी हजारो भाविक विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर बाप्पाच्या दर्शनासाठी उपस्थित होते.
अनंत चतुर्दशीला शनिवारी सकाळी साडेसात वाजता पोलिस उपायुक्त कृषिकेश रावळे यांच्या हस्ते बाप्पाची पूजा व आरती झाली. त्यानंतर सकाळी आठ वाजता रत्न महालातून बाप्पा विराजमान झालेला ‘श्री गणेशरत्न रथ’ विसर्जन मिरवणुकीसाठी मंडईतील टिळक पुतळ्याकडे मार्गस्थ झाला. टिळक पुतळा येथे प्रथा परंपरेनुसार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टकडून उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ते मानाच्या पाचही गणपतींना पुष्पहार अर्पण करण्यात आला.
त्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास प्रत्यक्ष विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी ‘श्री गणेशरत्न रथाचे सारथ्य केले. रात्री अकरा वाजता बेलबाग चौकात रंगारी बाप्पाच्या रथाचे आगमन झाले. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचा पुतळा आणि त्यावर नगारा मिरवणुकीत पुढे होते. त्यापाठोपाठ श्रीराम आणि रमणबाग यांच्या यांच्या ढोल पथकांच्या वादनाने मिरवणुकीचा उत्साह वाढवला. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून भंडाऱ्याची उधळण आणि पुष्पवृष्टी केली जात होती, तर रथावर कोल्ड फायरची होणारी विद्युत आतषबाजी त्यामुळे ही मिरवणूक भक्तांच्या डोळांचे पारणे फेडणारी अशीच ठरली.
पहाटे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास ‘श्री गणेशरत्न रथ’ टिळक चौकात आल्यानंतर सह पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा व उपायुक्त कृषिकेश रावळे यांच्या हस्ते बाप्पांची आरती झाली आणि बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ झाले. पहाटे ३ वाजून ५० मिनिटांनी पांचाळेश्वर विसर्जन घाटावर महापालिकेच्या हौदात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे भक्ती भावाने भावपूर्ण विसर्जन करण्यात आले.
श्री गणेश रत्नरथाची आकर्षक सजावट
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक १३४ वर्षांपासून पारंपारिक रथात केली जात होती. मात्र, गतवर्षी पासून विसर्जन मिरवणुकीसाठी दरवर्षी आकर्षक रथ तयार केला जातो. यावर्षीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी ट्रस्टने श्री गणेशरत्न रथ’ तयार केला होता. रत्नजडीत रथावर पिंक वेलवेट फुलांची करण्यात आलेली सजावट, विद्युत रोषणाई आणि त्यावरील रंगारी बाप्पाची मूर्ती लक्ष वेधून घेत होती. त्यामुळे हा रथही भाविकांचे लक्ष वेधून घेत होता, हजारो भाविकांनी त्याची छबी आपल्या मोबाईलमध्ये टिपून घेतली.
“श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट च्या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक दरवर्षीप्रमाणे यंदाही जल्लोषात आणि उत्साहात पार पडली. पोलिस प्रशासनाने लक्ष्मी रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीसाठी प्रवेश दिल्यानंतर आम्ही सहभागी झालो. आमच्या मंडळासाठी जो मिरवणुकीचा कालावधी निश्चित केला होता, त्यापेक्षा कमी कालावधीत विसर्जन मिरवणूक संपवून आम्ही पोलिस प्रशासनाला दिलेला शब्द पाळला. मात्र, आम्हाला दिलेल्या वेळेनुसार मिरवणुकीत सहभागी होता आले असते तर बाप्पाच्या दर्शनासाठी येऊन थांबलेल्या हजारो भाविकांना प्रतीक्षा करावी लागली नसती. मात्र, हा संपूर्ण गणेश उत्सव उत्साहात आणि शांततेने पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासन, महापालिका, मंडळाचे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार!
– पुनीत बालन
विश्वस्त आणि उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट
Newsworldmarathi Pune: हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक आकर्षक पद्धतीने सजवलेल्या ‘श्री गणेश रत्न रथा’मधून निघणार आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजता टिळक पुतळा येथून या विसर्जन मिरवणुकीला सुरवात होईल, अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी दिली.
‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’च्या मिरवणुकीबाबत माहिती देताना उत्सवप्रमुख पुनीत बालन म्हणाले, ‘‘दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पाची विसर्जन मिरवणूक लक्षवेधक अशीच असेल. पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या हस्ते सकाळी साडेसात वाजता अनंत चतुर्दशीची पूजा संपन्न होईल. त्यानंतर आठ वाजता रत्न महालातून निघून बाप्पाचा ‘श्री गणेश रत्न रथ’ विसर्जन मिरवणुकीसाठी मंडईतील टिळक पुतळ्याकडे मार्गस्थ होईल.
टिळक पुतळा येथे प्रथा परंपरेनुसार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टकडून मानाच्या पाचही गणपतींना पुष्पहार घातला जाईल. त्यानंतर दिवसभरात मानाच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर पोलिस प्रशासनाकडून देण्यात आलेल्या वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाच्या वैभवशाली मिरवणुकीला सुरुवात होईल.
या मिरवणुकीसाठी आकर्षक पद्धतीने ‘श्री गणेश रत्न रथ’ सजविण्यात आला असून या रथासमोर श्रीराम आणि रमणबाग ही पथके पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशाचे जोरदार वादन करणार आहेत, यानंतर रात्री अकरा वाजता श्रींच्या पूजेच्या मूर्तीचे विसर्जन पांचाळेश्वर येथे करण्यात येईल. ” पोलिस प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून विसर्जन मिरवणूक वेळेत संपवू असा आमचा मानस असल्याचेही बालन यांनी सांगितले.
‘‘पुण्यातील बाप्पाची विसर्जन मिरवणूक हे जगभरातील गणेश भक्तांचे प्रमुख आकर्षण असते. त्यामुळे ती मिरवणूक देखणी, आकर्षक आणि दिमाखदार कशा प्रकारे होईल, असा सर्वच गणेश मंडळांचा प्रयत्न असतो. आमचाही असाच प्रयत्न राहणार आहे. अधिकाधिक गणेश भक्तांनी या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन आनंद घ्यावा आणि बाप्पाला भक्तीभावाने निरोप द्यावा.’’
– पुनीत बालन
विश्वस्त व उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट
Newsworldmarathi Pune: गेल्या आठ दशकांपासून घराघरांपर्यंत पोहोचलेल्या व घराचा अविभाज्य भाग बनलेल्या जयराज अँड कंपनीचे संस्थापक कै. हिराभाई शहा (चोखावाला) यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त मार्केट यार्ड परिसरातील हमाल कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या १८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. या कार्यक्रमासाठी गुजराती बंधू समाजाचे कार्यकारी विश्वस्त नैनेश नंदू, जयराज ग्रुपचे राजेश शहा, दीपक बोरा, प्रवीण चोरबेले, आशिष दुगड, राजेंद्र बाठिया, रायकुमार नहार, रमेशभाई पटेल, दिलीप रुणवाल, हमाल पंचायत तर्फे दत्ताभाऊ डोंबाळे, संदीप मारणे, शिवाजी बाबर तसेच रिक्षा पंचायतचे नितीन पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
जयराज अँड कंपनीतर्फे दरवर्षी शैक्षणिक व आरोग्य विषयक सामाजिक कामांचे नियोजन केले जाते. वैद्यकीय क्षेत्रात, मेहसाणा (गुजरात) येथे सुरू करण्यात आलेले ‘कांचन हिरा आयुर्वेदिक कॅन्सर रिसर्च सेंटर’ गेल्या सात वर्षांपासून दररोज जवळपास तीनशे रुग्णांना लाभ देत आहे. तसेच, एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलच्या मदतीने गरजूंसाठी डोळ्यांची तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया आयोजित केल्या जातात.
कै. हिराभाई शहा यांनी लावलेले सामाजिक कार्याचे रोपटे आज वटवृक्षात परिवर्तित झाले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक कुलकर्णी यांनी केले, तर आभारप्रदर्शन गणपती मंडळाचे अध्यक्ष गोरख मेंगडे यांनी केले.
या विद्यार्थ्यांना दिली शिष्यवृत्ती
दहावी उत्तीर्ण विद्यार्थी : आदित्य गाडे, दर्शन कुंभार, ओम दळवी, भार्गव मारणे, सुरज रसाळ, यश गर्जे, तेजस्वी करपे, निकिता पवार, संस्कृती गोळे, सृष्टी कुडले, सिद्धेश राजिवडे, श्रद्धा खराडे, अंकिता पर्वते, सोहम जगताप.
बारावी उत्तीर्ण विद्यार्थी : संस्कृती फुंदे, स्नेहा बिनवडे, रुचिता धायगुडे, समर्थ गर्जे.
Newsworldmarathi Pune: मानवी आरोग्यास हानिकारक असणाऱ्या डीजे, लेझर लाईट तसेच ध्वनीप्रदुषणास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांवर तेलंगाना, मध्यप्रदेश या सरख्या राज्यांनी बंदी घातली आहे. महाराष्ट्रातही सोलापूर मध्ये डीजे वर बंदी घालण्याचा निर्णय तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. याच धर्तीवर पुणे शहर, जिल्हा तसेच महाराष्ट्रात ही डीजेवर बंदी घालावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने यांनी पोलीस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी ई-मेल द्वारे पाठवले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, डीजेच्या कर्णकर्कश्य आवाजामुळे अनेक जणांना त्रास होतो. डीजेमुळे अनेकांच्या कानाला इजा होऊन अनेकांना कायमचे बहिरेपणा आल्याच्या देशभरातील अनेक घटना घडल्या आहेत. डीजेमुळे अनेकांना प्राणही गमवावे लागले आहेत. मागील वर्षी पुण्यात झालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजेच्या आवाजामुळे ३ जणांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. डीजेवर बसून झेंडा फडकावत असताना विद्युत तारांच्या स्पर्श होऊन वडगावशेरी येथे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पैगंबर जयंती दरम्यान मागील वर्षी घडली होती.
गरोदर महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, आजारी माणसे यांना डीजेच्या आवाजाचा त्रास होतो. साऊंड सिस्टिम वापरण्यासाठी, त्याची आवाज मर्यादा किती असावी याबाबत सर्वोच्च न्यायालयाने नियमावली प्रसिद्ध केली आहे. मात्र त्याला गांभीर्याने घेतले जात नाही. डीजे सुरु असलेल्या मिरवणुकीसोबत चालताना बंदोबस्तात असणाऱ्या पोलीस कर्मचार्यांना व अधिकाऱ्यांना सुद्धा याचा त्रास होतो, मात्र दुर्देवाने पोलीस सुद्धा यात बोटचेपी भूमिका घेतात याचे वाईट वाटते.
डीजे प्रमाणेच लेसर लाईटचे अनेक दुष्परिणाम आहेत. यामुळे अनेकांच्या डोळ्याला त्रास होतो. अनेकांना यामुळे कायमचे अंधत्व आले आहे. मागील वर्षीच्या गणेश चतुर्थीच्या आगमन मिरवणुकीत कोल्हापूरमध्ये एका तरुणाच्या डोळ्याला इजा झाली होती. यावेळी बंदोबस्तात असणाऱ्या अनेक पोलिसांना ही याचा त्रास झाला. सण उत्सवांच्या या बीभत्स प्रकारामुळे समाजावर अनिष्ट परिणाम होत आहे.
डीजेच्या तीव्र आवाजाचा धोका ओळखून अनेक राज्य यावर बंदी घालत आहेत. मध्यप्रदेश सरकारने त्यांच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत ध्वनिप्रदूषण करणाऱ्या डीजेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रमाणेच तेलंगण सरकारच्या वतीने हैद्राबाद पोलिस आयुक्तांनी ३० सप्टेबर २०२४ रोजी एक अद्यादेश काढून डीजे साउंड सिस्टम्स/डीजे साउंड मिक्सर/साउंड ॲम्प्लिफायर्स/ इतर उच्च ध्वनी उत्प्रेरक उपकरणे, मोठ्या आवाजाचे फटाके आदींचा वापर धार्मिक मिरवणुकीत करण्यावर बंदी घातली आहे.
या आदेशाचे उल्लंघन करण्याऱ्या व्यक्तींवर गुन्हा नोंदवण्यात येणार असून सबंधित व्यक्तीला ५ वर्षाचा तुरुंगवास आणि १ लाख रुपया पर्यंतचा दंडाची तरतूद त्यांनी केली आहे. तेलंगण प्रमाणे या वर्षी पासून सोलापूर मध्ये नागरिकांनी स्वयंस्फुर्थीने डीजे विरुद्ध चळवळ उभा केली. सोलापुरच्या जिल्हाधिकारी श्री. कुमार आशीर्वाद यांनीही सोलापुरात डीजे बंदीचा निर्णय घेतला आहे.
डीजे आणि लेसरवर बंदी घालावी यासाठी मी प्रयत्नशील आहे. या विरोधात मी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका ही दाखल केली आहे. त्यामुळे डीजेवर बंदी घालावी अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याप्रमाणे पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनाही निवेदनाद्वारे त्यांनी विनंती केली आहे.
Newsworldmarathi Pune: सदानंद नगर सहकारी गृहरचना संस्था मर्या., पुणे येथे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षानंतर भाजपचे मा. सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या पुढाकारामुळे अखेर सभासदांना काही प्रमाणात न्याय मिळू लागला आहे.
डिसेंबर २०२४ मध्ये सोसायटीतील काही सभासदांनी माहिती अधिकाराखाली अर्ज दाखल केले होते. मात्र आवश्यक माहिती संस्थेकडून न मिळाल्याने प्रथम व द्वितीय अपिलांनंतर राज्य माहिती आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. सुनावणीदरम्यान सहाय्यक निबंधक पंढरीनाथ घुगे आदेश दिल्यानंतरही माहिती न मिळाल्याने सभासदांचा संघर्ष अधिक तीव्र झाला.
Oplus_16908288
मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांच्याकडे तक्रारीनंतर १० जुलै २०२५ रोजी संस्थेच्या लेखापरीक्षणाचे आदेश देण्यात आले तसेच २२ जुलै रोजी प्रशासक नेमण्यात आला. मात्र माजी समितीकडून प्रशासक व लेखापरीक्षकांना सहकार्य न मिळाल्यामुळे दैनंदिन कामकाज ठप्प झाले होते. या पार्श्वभूमीवर थकीत वीज बिल, पाणीपुरवठ्याचा प्रश्न आणि सर्वात मोठा म्हणजे कचऱ्याचा ढीग सभासदांच्या आरोग्यास धोका निर्माण करू लागला होता.
ही गंभीर स्थिती लक्षात घेऊन सभासदांनी भाजपचे मा. सभागृह नेते गणेश बिडकर यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून प्राधिकृत अधिकारी दीपक मुंडे यांच्याशी चर्चा केली आणि सोसायटीच्या कारभारासाठी अनुक्रमे २.५ लाख व २.१ लाख रुपये उभारले. त्यानंतर १९ ऑगस्ट रोजी मुंडे यांनी पुणे महानगरपालिकेकडे कचरा विल्हेवाटीसाठी पत्र पाठवले.
Oplus_16908288
बिडकर यांनी पाठपुरावा करत २२ ऑगस्ट रोजी स्वतः झाडू हातात घेऊन मनपा कर्मचाऱ्यांच्या मदतीने स्वच्छता मोहिम राबवली. या मोहिमेत टँकर, जेटिंग मशीन, कॉम्पॅक्टर, ब्लिचिंग पावडर, हाय.अॅसीड, मॉप आदी साहित्य वापरून १ ते ११ मजल्यांपर्यंतची स्वच्छता करण्यात आली. गेल्या दहा दिवसांत तब्बल २० टन कचरा सोसायटीतून बाहेर काढण्यात यश आले.
पुढील उपाययोजनेत ३१ ऑगस्ट रोजी बिडकर यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राव यांची भेट घेऊन सोसायटीची पाहणी घडवली. भविष्यातील कचरा व्यवस्थापनासाठी “स्वच्छतेची सबसिडी” सोसायटीला मंजूर करण्यात आली आहे. याबाबत सोसायटीतील रहिवाश्यांनी बिडकर यांचे आभार मानले.
सदानंद नगरमधील हा संघर्ष म्हणजे सभासदांचा मुलभूत हक्क व स्वच्छतेसाठीचा लढा ठरला आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे परिस्थिती सुधारण्याचा मार्ग आता मोकळा होत आहे.
Newsworldmarathi Team: पिट्सबर्ग मराठी मंडळ (MMPGH) आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव २०२५ मोठ्या श्रद्धा, भक्ती आणि उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली. प्रतिष्ठापना, अथर्वशीर्ष पठण व आरतीनंतर भक्तांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घेतला.
महाप्रसादाच्या वेळी सुमारे ७०० पेक्षा जास्त भक्तांना भोजन देण्यात आले. एवढी मोठी गर्दी असूनही स्वयंसेवकांनी दोनदा स्वयंपाक करून प्रत्येकाला प्रसाद मिळेल याची काळजी घेतली. शेवटचा थाळीप्रसाद अन्नसेवक टीमलाच देण्यात आला, हे त्यांच्या सेवाभावाचे व नेतृत्वगुणांचे उत्तम उदाहरण ठरले.
या वर्षीच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे एआय तंत्रज्ञानावर आधारित चलतचित्र सजावट. यात गणेश व कार्तिकेय यांच्या पृथ्वी प्रदक्षिणेच्या कथेला देखण्या पद्धतीने साकारण्यात आले होते. या नवकल्पनात्मक सजावटीला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पिट्सबर्ग मराठी शाळा, मराठी युवाविभाग तसेच CMU, UPitt आणि Duquesne विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग नोंदवला. सजावटीच्या टीमने यावर्षी उंची गाठली तर ढोल-ताशा व लेझीम पथकाने उत्सवात ऊर्जा ओतली.
दररोज संध्याकाळी ७.३० वाजता गणपतीची आरती पार पडत असून, गणेश विसर्जन मिरवणूक ७ सप्टेंबर रोजी दुपारी ४.०० वाजता काढण्यात येणार आहे.
पिट्सबर्गमध्ये मराठी समाजाकडून गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा आता ३९ वर्षांची झाली आहे. या उत्सवामुळे परदेशात राहूनही मराठी लोकांना आपली संस्कृती, परंपरा आणि एकोप्याचा वारसा जपण्याची संधी मिळते. हा सोहळा म्हणजे अमेरिकेतील मराठी समुदायासाठी धार्मिक व सांस्कृतिक ओळख जपणारे व्यासपीठ ठरले आहे.गणेशोत्सव हा फक्त धार्मिक सोहळा नसून संस्कृती, भक्ती व समुदाय एकोप्याचे प्रतीक असल्याचे अध्यक्ष राहुल देशमुख यांनी नमूद केले.
पुणे,सुप्रसिदध सतारवादक, लेखक आणि कवि श्री.विदूर महाजन ३ फेब्रुवारी रोजी ६५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. गेली ४५ वर्षे ते सतार वाजवत असून सतार वादनाचे शिक्षण देणारी ‘हार्मनी स्कूल ऑफ सतार’ शाळा चालवत आहेत. या शाळेत ८ ते ६० वयोगटातील कॉर्पोरेट क्षेत्र, शासकिय सेवेत काम करणारे तसेच गृहिणी, शाळा व कॉलेज मध्ये शिकणारे जवळपास ६० पेक्षा अधिक विदयार्थी सतार वादनाचे शिक्षण घेत आहेत. पिंपळे सौदागर, तळेगाव व चिंचवड येथे त्यांच्या शाळा सुरु आहेत.
ग्रामीण भागातील लोकांसाठी भारतीय राग संगिताची ओळख करुन देणारा ‘खेडोपाडी सतार’ हा त्यांचा उपक्रम देखील खुप लोकप्रिय झाला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सुमारे एक लाखांपेक्षा जास्त लोकांना सतारीची व रागसंगिताची ओळख करुन दिली आहे. सतार वादना बरोबरच श्री. महाजन यांचे यांचे वाड:मय क्षेत्रात मोठे कार्य आहे. त्यांची सहा पुस्तके व काव्यसंग्रह प्रसिदध झाले आहेत. त्यांच्या मैत्रजीवांचे व शोधयात्रा या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
सतार वादन, लिखाणाबरोबर मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्रातील रुग्णांमध्ये संगिताची रुची निर्माण करणे, व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन करुन त्यांना मन:शांतीच्या मार्गावर नेण्यासाठी ‘व्यसनातून व्यासंगाकडे’ सारखा स्तुत्य उपक्रम ते राबवत आहेत.
*अनोख्या सायकल रॅलीचे आयोजन*
‘मी व माझे संगीत एकमेकांहून वेगळे नाहीत’ असं मानणाऱ्या विदुर महाजन यांनी मागील काही महिन्यांपासून सायकलिंग सुरु केली आहे. संगीत व सायकलिंग यांची सुरेख सांगड घालत त्यांच्या वाढदिवशी एका अनोख्या सायकल रॅलीचे आयोजन केले आहे.
भारतीय राग संगितामध्ये १६ मात्रांचे एक आवर्तन असणारा त्रिताल हा सर्रास वापरला जाणारा ताल! विदुर महाजन ३ फेब्रुवारी रोजी वयाची ६४ वर्षे पूर्ण करत आहेत. आतापर्यंत त्यांनी चार आवर्तने पूर्ण केली असून ५ व्या अवर्तनात प्रवेश केला आहे. वाढदिवसानिमित्त २ फेब्रुवारी रोजी तळेगाव ते लोणावळा हा ६४ किमी सायकल प्रवास ते करणार आहेत. त्यांच्यासोबत तळेगाव येथील सायकलप्रेमी ज्येष्ठ नागरिक श्री. साठे आणि सतारीच्या शाळेतील विदयार्थी सहभागी होणार आहेत. या प्रवासात कमीत कमी १६ किमी व जास्तीत जास्त ६४ किमी सायकलचा प्रवास करण्याचे आवाहन त्यांनी सायकल प्रेमींना केले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे समाजातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या सर्व उपक्रमांमधे त्यांच्या पत्नी प्राध्यापक डॉ.अपर्णा महाजन आणि कन्या प्रसिदध अभिनेत्री आणि सतार वादक नेहा महाजन यांचेकडून कायम पाठबळ मिळते.