महेश नागरी मल्टिस्टेटकडून ९ टक्के लाभांश जाहीर

0
पुणे, १७ : महेश नागरी मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच सुखसागरनगर येथे मोठ्या उत्साहात पार पडली. सभेचे अध्यक्षपद संस्थेचे अध्यक्ष राजेश धनराजजी राठी यांनी भूषवले, तर कार्यकारी संचालक व सीईओ मगराज मिश्रीमलजी राठी यांनी संस्थेचा वार्षिक ताळेबंद सादर केला. यावेळी सभासदांना चालू आर्थिक वर्षासाठी ९ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. संस्थेच्या एकूण ठेवी २०३ कोटी १३ लाख रुपये असून, कर्जवाटप १२१ कोटी २८ लाख रुपयांचे झाले आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात संस्थेला तब्बल १ कोटी ७७ लाख रुपयांचा नफा झाला आहे. संस्थेची एकूण उलाढाल ३२५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत संस्थेचा राखीव निधी २४.५१ कोटी रुपये आणि भाग भांडवल ३.४१ कोटी रुपये असल्याचे राठी यांनी सभेत स्पष्ट केले. या सभेला जवळपास ६०० सभासदांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी विविध क्षेत्रातील दिवंगतांना श्रदधांजली वाहण्यात आली. आभार प्रदर्शन उपाध्यक्ष प्रविण बांगड यांनी केले. संस्थेच्या कामकाजात आगामी काळात आणखी वाढ होणार असून, संस्थेला नवीन दोन शाखा सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे. लवकरच पिंपरी-चिंचवड व गुजरातमधील सुरत शहरात शाखा सुरु होणार आहेत. विद्रद्यमान सहा शाखांबरोबरच एकूण आठ शाखांचे जाळे उभे राहणार आहे. महेश नागरी मल्टिस्टेटची स्थापना ७ सप्टेंबर १९९८ रोजी झाली असून, १ ऑक्टोबर १९९८ रोजी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर कामकाजाला सुरुवात झाली होती. गेल्या २७वर्षामध्ये संस्थेने सातत्याने प्रगती करत सभासदांचा विश्वास संपादन केला आल्याचे राठी यांनी नमूद केले.
आमची संस्था सुरुवातीपासूनच प्रगती करत असून सर्व नियमांचे काटेकोर पालन करते. संस्था कोणत्याही मोठ्या कंपन्या किंवा रिअल इस्टेट क्षेत्राला वित्तपुरवठा करत नाही. त्याऐवजी स्थानिक व मध्यमवर्गीय सभासदांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करून कर्जवाटप केले जाते. संस्थेतर्फे वाहन कर्ज, सोने तारण कर्ज, तसेच नवीन सोने खरेदीसाठी सुवर्ण संचय योजना राबविण्यात येत असून त्याचा सभासदांनी लाभ घ्यावा.
राजेश राठी, अध्यक्ष, महेश नागरी मल्टिस्टेट

विद्यापीठस्तरीय ‘ जल्लोष २०२५’ स्पर्धेत नौरोसजी वाडिया महाविद्यालयाची विजेतेपदाची हॅट्रिक!

0
Newsworldmarathi Pune: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या विद्यापीठस्तरीय आंतर-महाविद्यालयीन ‘जल्लोष २०२५’ युवक महोस्तव स्पर्धेत यजमान नौरोसजी वाडिया महाविद्यालयाने सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकाविण्याचा बहुमान मिळविला. पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते महाविद्यालयाने विजेत्यापदाचा करंडक स्वीकारला. पुणे विभागीय या स्पर्धेत पुणे शहर, पुरंदर, हवेली, भोर, वेल्हे आणि मुळशी तालुक्यातील पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील १२०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी संगीत, नाट्य, नृत्य, साहित्य आणि ललित कला अशा पाच प्रमुख गटामधून २७ कला प्रकारामध्ये सहभाग घेतला होता. वाडिया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी एकूण ८८ गुणांसह विजेतेपद पटकवले तर उपविजेत्या मॉडर्न लॉं कॉलेजला ३९ गुण मिळाले. या स्पर्धेत महाविद्यालयाने भारतीय सुगम गायन, ताल-वाद्य वादन, लोकवाद्यवृंद, लोकनृत्य, प्रहसन, व मुकनाट्य या प्रकारात प्रथम, पाश्चिमात्य वैयक्तिक गायन, एकांकिका, नकला, वादविवाद या प्रकारामध्ये द्वितीय, तर पाश्चिमात्य वाद्य वादन मेहंदी व कोलाज मध्ये तृतीय असे एकूण १४ कला प्रकारामध्ये क्रमांक पटकाविले. सदर कार्यक्रमास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य,अधिसभा सदस्य, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक तसेच मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त प्रा. सचिन सानप, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. वसंत चाबुकस्वार, सांस्कृतिक समन्वयक प्रा. डॉ. हनुमंत लोखंडे, विद्यार्थी विकास कल्याण अधिकारी डॉ. महेश पांढरपट्टे व सर्व शिक्षक-शिक्षेकतर कर्मचारी मोठ्या संख्येने होते

३१व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार भव्य उद्घाटन

Newaworldmarathi Pune: कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत आणि धार्मिक भक्तीभावाचा संगम असणाऱ्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचे यंदाचे ३१वे वर्ष दिमाखात साजरे होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन सोमवार, दि. २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन सोहळ्यास केंद्रीय नागरी हवाई उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व माजी आमदार उल्हास पवार, राज्याच्या नागरी विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खा. मेधा कुलकर्णी, आमदार डॉ. विश्वजित कदम, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि अप्पर पोलीस आयुक्त संजय पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळ्याचे आकर्षण या सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकार भार्गवी चिरमुले, तेजा देवकर, सानिया चौधरी, शितल अहिरराव, राधा सागर, सिया पाटील, ऋजुता जुन्नरकर, अमृता धोंगडे व वैष्णवी पाटील विशेष उपस्थित राहणार आहेत. महोत्सवाचे सर्व कार्यक्रम नेहमीप्रमाणे रसिकांसाठी विनामूल्य असतील, अशी माहिती आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरवर्षीप्रमाणे घटस्थापना सोमवार, दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी ६.४१ वाजता शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिरात मा. उपमहापौर, अध्यक्ष आबा बागुल व जयश्री बागुल यांच्या हस्ते होईल. यंदा मंदिर परिसरात दक्षिण भारतातील माधुराई येथील ७२ फुट उंचीचे मीनाक्षी मंदिर साकारले जात असून सुमारे ८० कलावंतांनी हा देखावा उभारला आहे. पुरस्कार वितरण उद्घाटन सोहळ्यात समाजकार्यात व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात येतो. यंदा ‘महर्षी पुरस्कार’ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तर ‘श्री लक्ष्मीमाता जीवनगौरव पुरस्कार’ प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, समाजकार्यकर्त्या डॉ. मेघा पुरव सामंत, बुलढाणा सहकारी बँकेचे सहसंस्थापक शिरीष देशपांडे आणि लोककलावंत प्रमिला लोदगेकर यांना देण्यात येईल. तसेच डॉ. मयूर कर्डिले व डॉ. अरविंद खोमणे यांचाही विशेष सत्कार होणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी उद्घाटन सोहळ्यात सितार, व्हायोलिन, बासरी आणि तबल्याची जुगलबंदी असलेला ‘आनंद तरंग’ हा कार्यक्रम डॉ. नीलिमा राडकर व माधवी करंदीकर यांच्या ग्रुपकडून सादर केला जाईल. नृत्यगुरु पं. शमा भाटे ‘शरण्ये रुद्र चंडिके’ हा कथ्थक कार्यक्रम सादर करतील. विनोद व स्वाती धोकटे यांचा ‘जागर शक्ती पिठांचा’ देवीचा गोंधळ आणि मराठी सिनेतारकांचा ‘जल्लोष’ हा नृत्याविष्कार रसिकांना मंत्रमुग्ध करेल. सलग ११ दिवस संगीतमय सोहळा उद्घाटनानंतर महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रम सलग ११ दिवस विजयादशमीपर्यंत दररोज सायं. ७ वाजता श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होणार आहेत. २३ सप्टेंबर : ‘नाईनटीज मेलडी’ – अभिजित सराफ, कल्याणी देशपांडे, अक्षय घाणेकर. २४ सप्टेंबर : ‘इश्क सुफियाना’ – संदीप पंचवाटकर, प्रवीण अवचर, संदीप उबाळे, विनल देशमुख. २५ सप्टेंबर : ‘स्वर साम्राज्ञीयाँ’ – राधिका अत्रे, राजेश्वरी पवार, कविता सेंगर, चारुलता पाटणकर. २६ सप्टेंबर : ‘म्युझिकल मास्टर्स – एल.पी. & आर.डी.’ – पल्लवी पत्की ढोले, संजय हिवराळे, रफी हबीब आदी कलाकार. २७ सप्टेंबर : ‘अस्मिता महाराष्ट्राची’ – पृथ्वीराज नागवडे, अंकिता शिवतरे, सौगंध कापसे व ५० कलाकारांची साथ. २८ सप्टेंबर : महिलांसाठी खास आकर्षण ठरलेला भव्य ‘लावणी महोत्सव’ सलग १२ तास चालणार आहे. २९ सप्टेंबर : ‘टोटल म्युझिक धमाका’ – मुकेश देढीया, तेजस्विनी पाहुजा, चंद्रशेखर महामुनी, माधुरी भोसेकर व आकाश सोलंकी. ३० सप्टेंबर : ‘बेमिसाल रफी’ – आली हुसेन, आनंद म्हसवडे, कल्याणी देशपांडे. १ ऑक्टोबर : ‘हृदयात वाजे समथिंग’ – तन्वी दात्ये, ए सराफ, अवंतिका धुमणे, आर.जे. बंड्या. २ ऑक्टोबर : सांगता कार्यक्रम ‘सोलफुल किशोर कुमार’ – जितेंद्र भूरूक, रुपाली घोगरे व ग्रुप. या सोहळ्याचे आयोजन अध्यक्ष आबा बागुल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून, कोषाध्यक्ष नंदकुमार बानगुडे, उपाध्यक्ष घनशाम सावंत, सचिव नंदकुमार कोंढाळकर, सदस्य रमेश भंडारी, अमित बागुल आणि हेमंत बागुल या सर्वांनी महोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त न्यू एंजल स्कूलतर्फे वृक्षारोपण

0
Newsworldmarathi Pune: आपल्या देशाचे लोकप्रिय व दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या वाढदिवसानिमित्त न्यू एंजल स्कूलच्या वतीने पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आला. या निमित्ताने शाळेच्या परिसरात वृक्षारोपण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास मा. नगरसेविका व पुणे शहर भाजप चिटणीस रूपाली दिनेश धाडवे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते तसेच शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या सहभागातून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी एकमुखाने “एक व्यक्ती – एक वृक्ष” हा संकल्प करून समाजातील सर्वांनी वृक्षलागवडीसाठी पुढे यावे, असे आवाहन केले. पर्यावरणाचे रक्षण करणे ही काळाची गरज असून प्रत्येकाने या जबाबदारीत आपला वाटा उचलला पाहिजे, हा संदेश विद्यार्थ्यांनी घोषणांमधून दिला. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना रूपाली धाडवे म्हणाल्या, “आजच्या काळात वृक्ष लागवड ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून जीवन जगण्यासाठी आवश्यक अशी गोष्ट आहे. भावी पिढ्यांसाठी शुद्ध हवा, स्वच्छ पर्यावरण आणि हरित वातावरण ठेवायचे असेल, तर प्रत्येकाने वृक्षारोपण करणे आवश्यक आहे.” विद्यार्थ्यांनी घेतलेल्या संकल्पाचे त्यांनी कौतुक केले आणि अशा उपक्रमांमधूनच समाजात पर्यावरणाबद्दल जनजागृती होत असल्याचे सांगितले. या सोहळ्यास शाळेचे सर्व शिक्षक, पदाधिकारी, विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राबवलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

शालेय जीवनापासून स्पोर्ट्स कडील कल वाढावा : डॉ राजेश शहा

Newsworldmarathi Pune: द पूना गुजराती केळवणी मंडळाच्या हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयात युथ, ज्युनिअर व सिनियर गटाच्या जिल्हा पातळीवरील वेट लिफ्टिंग स्पर्धा आणि राज्यस्तरीय स्पर्धेसाठीच्या जिल्हा संघाची निवड चाचणी दि १४ आणि १५ सप्टेंबर रोजी पार पडली. यावेळी बोलताना अधिकाधिक तरुण तरुणींनी योग्य वेळेत खेळांकडे लक्ष देऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपल्या देशाचे नांव उज्ज्वल करावे, यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत संस्था व संस्थेच्या पीजीकेएम स्पोर्ट्स अकॅडमी मार्फत पुरविली जाईल असे संस्थेचे चेअरमन डॉ. राजेश शहा यांनी प्रतिपादन केले. याप्रसंगी बोलताना डॉ शहा यांनी शालेय जीवनापासूनच पालक व शिक्षक यांनी स्पोर्ट्स बाबत मुला-मुलींना जागरूक करावे आणि खेळाकडील त्यांचा कल वाढवण्यास मदत करावी असे नमूद केले. याप्रसंगी यशस्वी झालेल्या खेळाडूंना मेडल आणि प्रमाणपत्रे देण्यात आले. त्यावेळी देसाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र गुरव, शारीरिक क्रीडा संचालक डॉ ऋषी दुबे, वाणिज्य विभाग अधिष्ठाता यशोधन मिठारे आणि प्रशासकीय अधिकारी संदीप देशपांडे तसेच पुणे जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव व महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष सुधीर म्हाळसकर तर उपाध्यक्ष शरद काळे उपस्थित होते.

बुधवारी होणार ड्रोन लाईट शो ; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे आयोजन

0
Newsworldmarathi Pune: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आयोजित केलेला ड्रोन लाईट शो पावसाच्या शक्यतेने एक दिवस पुढे ढकलण्यात आला असून मोदी यांच्या वाढदिवस दिनी म्हणजे १७ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता हा ड्रोन लाईट शो स.प. महाविद्यालयाच्या मैदानात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या औचित्याने केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पैकी महाराष्ट्रात प्रथमच होणारा ड्रोन लाईट शो आणि अवधूत गुप्ते यांची लाईव्ह इन कॉन्सर्ट ही १६ सप्टेंबर रोजी नियोजित होती. मात्र मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे आणि पावसाच्या संभाव्य शक्यतेमुळे दोन्ही कार्यक्रम मोदींच्या वाढदिवस दिनीच होणार आहेत. याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस दिनी अवधूत गुप्ते यांची लाईव्ह कॉन्सर्ट सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत तर ड्रोन लाईट शो हा रात्री आठ ते नऊ या वेळेत होत आहे. अयोध्या आणि वाराणसीनंतर महाराष्ट्रात हा प्रथमच भव्य-दिव्य ड्रोन शो होणार असून यात एकाच वेळी एक हजार ड्रोनच्या माध्यमातून पुणेकरांना तंत्रज्ञानाची नवी अनुभूती मिळणार आहे. यात महाराष्ट्राच्या मानबिंदूंसह पंतप्रधान मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पाचे प्रतिबिंब अनुभवयास मिळणार आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांची गैरसोय होऊ नये, याची पूर्ण काळजी घेतली गेली आहे. स.प. महाविद्यालयाच्या मैदानात नागरिकांना हा ड्रोन शो पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी शैलेश काळे; कार्यवाहकपदी पुढारीचे पांडुरंग सांडभोर

0
Newsworldmarathi pune: पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी ‘आज का आनंद’चे शैलेश काळे यांची निवड झाली. कार्यवाहपदी ‘पुढारी’चे पांडुरंग सांडभोर, तर खजिनदारपदी ‘महाराष्ट्र टाइम्स’चे सुनीत भावे यांची निवड करण्यात आली. पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या विश्वस्तांच्या झालेल्या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली. इतर विश्वस्त पुढीलप्रमाणे : विठ्ठल जाधव (सामना), राजेंद्र पाटील (सार्वमत) आणि अंजली खमितकर (प्रभात). पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील हे प्रतिष्ठानचे पदसिद्ध विश्वस्त आहेत.

भारत-पाक सामना म्हणजे आमच्या भावनांशी खेळ; शहिदांच्या कुटुंबीयांची संतापजनक प्रतिक्रिया

0
Newsworldmarathi Pune: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीयांचा बळी गेला. या घटनेत पुण्यातील दोन कुटुंबांचे सदस्यही शहीद झाले. गणबोटे आणि जगदाळे कुटुंबातील सदस्यांना आपला जीव गमवावा लागला. देशभरात या घटनेचे दुःख अद्यापही ओसरलेले नाही. अशा परिस्थितीत आज होणारा भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना केंद्र सरकार आणि बीसीसीआयवर तीव्र टीकेचा विषय ठरला आहे. जगदाळे कुटुंबातील आसावरी जगदाळे यांनी या संदर्भात संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “आमच्या भावना अजून सावरलेल्या नाहीत. सहा महिनेही झाले नाहीत या हल्ल्याला, तरीही पाकिस्तानसोबत सामना खेळला जातोय. ज्यांना भावना नाहीत तेच असे निर्णय घेतात. बीसीसीआयने किमान हा सामना रद्द करायला हवा होता.” त्यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला की, “पाकिस्तानचे दहशतवादी आमच्या जवानांना, आमच्या नागरिकांना मारून टाकतात आणि त्याच देशाच्या खेळाडूंशी आपण मैदानात सामना खेळतो, हे आमच्यासाठी दु:खदायक आहे. हा सामना म्हणजे आमच्या भावनांशी खेळ आहे.” या हल्ल्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. शहीद जवानांच्या बलिदानाची वेदना अजूनही ताजी असताना पाकिस्तानशी क्रिकेट खेळणे योग्य आहे का, असा सवाल सामान्य नागरिकांपासून ते शहीदांच्या नातेवाईकांपर्यंत सर्वत्र विचारला जात आहे. देशासाठी प्राण देणाऱ्यांचा सन्मान करताना किमान अशा सामन्यांवर निर्णय घेताना संवेदनशीलता दाखवली गेली असती तर शहीद कुटुंबीयांच्या जखमा आणखी खोल झाल्या नसत्या, असा सूर आता उमटतो आहे.

पंतप्रधान मोदींना पुणेकरांकडून मिळणार अनोख्या शुभेच्छा; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतील उपक्रम

Newsworldmarathi Pune: देशाचे यशस्वी पंतप्रधान आणि वैश्विक नेतृत्व नरेंद्र मोदी यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस १७ सप्टेंबरला देशभरात सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला दि. १६ रोजी पुण्यात आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा ड्रोन शोसह दिव्यांग सहाय्यता शिबीर आणि संगीत रजनीचे आयोजन स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर केले आहे. ‘ज्योतीने तेजाची आरती’ या ड्रोन शोव्दारे पुणेकरांच्या वतीने पंतप्रधान मोदींना अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. अयोध्या आणि वाराणसीनंतर महाराष्ट्रात हा ड्रोन शो प्रथमच होणार असून यातून विकसित भारताच्या संकल्पाचे दर्शन पुणेकरांना घडणार आहे. केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या वतीनं या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून थ्रीडी स्वरूपात असलेला हा ड्रोन शो ४५ मिनिटे असेल. त्यात मोदी सरकारच्या कामगिरीसह पुण्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मानबिंदूंचे दर्शनही पुणेकरांना घडेल. तसेच पंतप्रधान मोदींनी केलेल्या विकसित भारताचा संकल्पही याद्वारेल पुणेकरांना अनुभवता येईल. हजारो ड्रोन्स जेव्हा अवकाशात झेपावतील, तेव्हा पुण्याच्या ३-४ किलोमीटर परिसरापर्यंतच्या भागातील नागरिकांना हा शो अवकाशात पाहता येणार आहे. मोदीजींच्या वाढदिवसाच्या पूर्व संध्येला हजारो ड्रोन पुण्याच्या अवकाशात झेपावतील आणि त्यांच्या विविध फॉर्मेशन्समधून विकसित भारताच्या दिशेने झालेल्या प्रवासाचे नयनरम्य दर्शन पुणेकरांना घडेल. केंद्रीय मंत्री मोहोळ पुढे म्हणाले, ‘या निमित्ताने मंगळवार दि. १६ सप्टेंबर या दिवशी स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर विविध कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. दुपारी २ ते ६ वाजेपर्यंत दिव्यांगांसाठी सहाय्यता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यात १२०० हून अधिक दिव्यांगांना १७५० आवश्यक साहित्यांचे मोफत वितरण या शिबिरात करण्यात येणार आहे. शिबिरानंतर याच ठिकाणी सायंकाळी ५ ते १० ख्यातनाम संगीतकार आणि गायक अवधूत गुप्ते यांची लाईव्ह कॉन्सर्ट होईल. दरम्यान रात्री ८ वाजता ‘ज्योतीने तेजाची आरती’ हा ऐतिहासिक ड्रोन शो होणार आहे. या सर्व कार्यक्रमात आपण सहभागी होत या सर्व क्षणांचे साक्षीदार होऊन आपल्या लाडक्या पंतप्रधानांना शुभेच्छा देऊ या’. ‘२६ मे २०१४ या दिवशी संसदेच्या पायरीवर नतमस्तक झालेल्या मोदींचे दृष्य आजही भारतीयांच्या मनावर कोरलेले आहे. त्यांनी गेल्या अकरा वर्षात १४० कोटी देशवासीयांना ‘राष्ट्रहित सर्वतोपरी’ हा मंत्र देत देशात आणि देशाबाहेर ताठमानेने उभे रहाण्याचे बळ दिले. ‘मै देश को झुकने नहिं दुंगा’ हा वज्रनिर्धार करत विकसित भारताचा संकल्प करुन देशवासीयांसाठी ते प्रेरणास्रोत झाले आहेत. सर्वसामान्य देशवासीयांचे जीवनमान उंचाविण्यापासून ते मंगळापर्यंत झेप घेणारे नवे अवकाश धोरण राबविणारे, करोनाची लस मोफत देऊन आफ्रिकेसह १४० लहान, गरीब देशांतील नागरीकांच्या जीवनाचे रक्षण करण्यापासून ते पाकिस्तानच्या घरात घुसून त्यांची नांगी ठेचणे, हे मोदींचे कर्तृत्व आहे. भारतवर्षाचा उर्जा स्त्रोत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून हजारो ड्रोन्सच्या माध्यमातून मोदींना पुणेकरांच्या वतीने शुभेच्छा देणारा, डोळ्यांचे पारणे फेडणारा अनोखा कार्यक्रम सादर होतो आहे. या दिवशी आपण सर्व पुणेकर त्यांना शुभेच्छा देऊ या’ असेही मोहोळ म्हणाले. पुण्यातील ७५ हजार विद्यार्थी देणार पंतप्रधान मोदींना शुभेच्छा! पंतप्रधान मोदी यांचा अमृतमहोत्सव विविध उपक्रमांद्वारे साजरा होत असताना पुण्यातील ७५ हजार विद्यार्थी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टकार्डद्वारे शुभेच्छा देणार आहेत. यात पुणे शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी दिलेले शुभेच्छा संदेश एकत्र करुन थेट पंतप्रधान मोदी यांना पाठविण्यात येणार आहेत, अशीही माहिती केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी यावेळी दिली.

कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या उत्तम नियोजनामुळे भक्तिमय वातावरणात गणेश विसर्जन

Newsworldmarathi Pune: कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत सार्वजनिक गणेशोत्सव काळात गणेश मूर्ती विसर्जन भक्तिमय वातावरणात पार पडले. प्रभाग क्रमांक ३८, ४१, ४२ तसेच गुजर–निंबाळकरवाडी, पिसोळी व वडाचीवाडी या नव्याने समाविष्ट गावांसह एकूण १२ ठिकाणी पुणे महानगरपालिकेने विसर्जनाची व्यवस्था केली होती. याशिवाय शाडू मातीच्या गणेश मूर्तींसाठी स्वतंत्र टाक्या उपलब्ध करून देण्यात आल्या. अकरा दिवसांच्या या गणेशोत्सव काळात एकूण २५,७८३ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्याचबरोबर पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत तब्बल ३२,५५६ किलो निर्माल्य वेगळे संकलित करण्यात आले. उत्सव काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी स्वच्छता, विद्युत व्यवस्था, टेबल-खुर्च्या, शौचालये (स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र), सीसीटीव्ही कॅमेरे तसेच निर्माल्य संकलनाची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या संपूर्ण कालावधीत विसर्जन व्यवस्था सुरळीत पार पाडण्यासाठी जवळपास २०० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यात सहाय्यक महापालिका आयुक्त, उपअभियंता, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, अधीक्षक, कनिष्ठ अभियंता, उपअधीक्षक, लिपिक, शिपाई, मोकादम व सेवक वर्ग यांचा सक्रिय सहभाग होता. पोलिस प्रशासनाच्याही सहकार्यामुळे विसर्जनस्थळी शिस्तबद्ध व सुरक्षित वातावरण राहिले. या उपक्रमासाठी महापालिका आयुक्त मा. नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त मा. पृथ्वीराज बी. पी., उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन मा. संदीप कदम, परिमंडळ क्रमांक ४ चे उपायुक्त मा. प्रशांत ठोंबरे व उपायुक्त मा. खलाटे यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली कामकाज पार पडले. कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त मा. राजेश कादबाने तसेच पाटणकर, खिलारे, पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. महापालिकेच्या नियोजनामुळे व अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे या वर्षीचे गणेश विसर्जन कोणत्याही अडचणीशिवाय, भक्तिमय आणि पर्यावरणपूरक वातावरणात पार पडले.