Vaishnavi Hagawane Case : “वैष्णवी हगवणे प्रकरणात राजकीय हस्तक्षेपाची शंका; रोहिणी खडसेंची मुख्यमंत्र्यांकडे सीआयडी चौकशीची मागणी”
Newsworldmarathi Pune: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने आता गंभीर राजकीय वळण घेतले असून, या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असल्याची शक्यता शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली आहे.
23 वर्षीय वैष्णवी हगवणे हिने सासरकडील मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली. याप्रकरणी तिचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे आणि नणंद करिश्मा यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. मात्र राजेंद्र हगवणे हे अजित पवार गटाशी संबंधित असल्याने या प्रकरणाची पारदर्शकता आणि पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रोहिणी खडसे यांनी याप्रकरणी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा दाखला देत सांगितले की, “त्या प्रकरणातही सुरुवातीला पोलीस तपास ढिसाळ होता. पण जेव्हा तपास सीआयडीकडे गेला, तेव्हा अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस आल्या. तसेचच काही वैष्णवी प्रकरणातही दिसून येत आहे.”
त्यांनी एक व्हिडीओ जारी करत पोलिसांच्या भूमिकेवर थेट आरोप केले. त्यांनी म्हटले की, “वैष्णवीच्या मृत्यूच्या दिवशीच तिच्या अंगावर 29 जखमा असल्याचे स्पष्ट झाले होते, तरीसुद्धा सौम्य कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला. ही एफआयआर आरोपींना मदत करणारी वाटते.” त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “पोलीस यंत्रणेवर राजकीय दबाव आहे का?”
याशिवाय त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, “आरोपींच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर शंका घेतली असून, अशा प्रकारे पीडितेला दुहेरी शिक्षा मिळत आहे.”
मुख्यमंत्र्यांकडे मागणी
“सत्य लपवले जात आहे. वैष्णवीच्या कुटुंबाला न्याय मिळावा, यासाठी ही केस सीआयडीकडे वर्ग करावी, जेणेकरून निर्दोष व्यक्तींचा छळ होणार नाही आणि दोषींना शिक्षा मिळेल,” असे रोहिणी खडसे यांनी ठामपणे म्हटले आहे.
या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली असून, आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की मुख्यमंत्री यावर काय भूमिका घेतात.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : कुख्यात निलेश चव्हाणच्या पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवर आवळल्या मुसक्या
Newsworldmarathi Pune : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : कुख्यात निलेश चव्हाणला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवर अटक केली आहे. निलेश चव्हाणला शोधण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ५ पथके तैनात केली होती. गेल्या काही दिवसांपासून पोलिस त्याच्या मागावर होते आज अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.
मध्यरात्री आणणार पुण्यात
वैष्णवी हगवणे प्रकरण सध्या राज्यात गाजत असून या प्रकरणात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संपूर्ण राज्यातून होत आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत वैष्णवीचा पती शशांक, सासरा राजेंद्र हगवणे (Rajendra Hagavane), दीर सुशील हगवणे, सासू आणि नणंद यांना अटक करण्यात आली आहे. तर आता पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई करत निलेश चव्हाण याला देखील अटक करण्यात आल्याने आता या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
माहितीनुसार, निलेश चव्हाण 23 मे पासून फरार होता. आता पोलीस निलेश चव्हाणला विमानाने पुण्यात आणणार आहे. आज मध्यरात्री दोन वाजता पुणे विमानतळावरती येणार असल्याची माहितीसमोर आली आहे. पुणे सत्र न्यायालयात 28 मे रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान राजेंद्र हगवणेंच्या वकिलांनी या प्रकरणात निलेश चव्हाणाला आरोपी करणे चुकीचे आहे कारण त्याने बाळाचा सांभाळ केला आहे. असा युक्तीवाद करत निलेश चव्हाणाने हेळसांड केली म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचा दावा केला होता.
प्रकरण काय?
पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम येथे 16 मे 2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केली होती. यानंतर वैष्णवीने असं टोकाचं पाऊल उचललं, यामागे हुंड्यासाठी झालेला छळ, कौटुंबिक हिंसाचार, असे आरोप करण्यात आले होते. तर वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे सासरे आणि दीर दोघंही फरार झाले होते. त्यांना आठ दिवसांनंतर पोलिसांनी अटक केली होती. लग्नाच्या वेळी 51 तोळे सोने, एक फॉर्च्युनर कार आणि इतर महागड्या वस्तू दिल्यानंतरही आणखी पैशांसाठी वैष्णवीचा छळ सुरु होता असा आरोप वैष्णवीच्या माहेरच्या लोकांकडून करण्यात आला आहे.
पुण्यात भाजप महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार? चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना दिल्या सूचना
Newsworldmarathi Pune : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पक्ष कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.
युतीचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील, परंतु कार्यकर्त्यांनी आतापासूनच घरोघरी जाऊन जनसंपर्क वाढवावा आणि दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे. कसबा मतदारसंघात आयोजित बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ऐतिहासिक विजयाचे लक्ष्य ठेवण्याचे निर्देश दिले.
कार्यकर्त्यांना घरोघरी जाण्याचे आदेश
चंद्रकांत पाटील यांनी कसबा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना सांगितले की, पक्षाने नुकतीच शहराध्यक्ष आणि मंडल अध्यक्षांची निवड पूर्ण केली आहे. आता मंडल अध्यक्षांनी सर्व आघाड्या आणि मोर्चांच्या अध्यक्षांसह कार्यकारिणीची निवड लवकरात लवकर पूर्ण करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. “आपल्या कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत रस्त्यावर उतरून मेहनत घेतली, त्यामुळे पक्षाला मोठे यश मिळाले. आता महापालिका निवडणुकीतही असेच यश मिळवायचे आहे,” असे पाटील यांनी सांगितले. त्यांनी कार्यकर्त्यांना आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आणि जनतेपर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले.
युतीचा निर्णय वरिष्ठ नेत्यांवर सोपवला
महापालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार की युती करणार, याबाबत कार्यकर्त्यांनी काळजी करू नये, असे पाटील यांनी स्पष्ट केले. “युतीचा निर्णय हा आपल्या पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. आपले काम आहे जनतेच्या मनात स्थान निर्माण करणे आणि पक्षाला विजयी करणे,” असे त्यांनी नमूद केले. या विधानातून पाटील यांनी युतीच्या चर्चांना पूर्णविराम न देता कार्यकर्त्यांचे लक्ष निवडणूक तयारीवर केंद्रित केले आहे.
ऐतिहासिक विजयाचे लक्ष्य
पुणे महानगरपालिका निवडणूक ही भाजपसाठी महत्त्वाची आहे. गेल्या निवडणुकीत पक्षाने चांगली कामगिरी केली होती, आणि यंदा त्याहून मोठे यश मिळवण्याचे उद्दिष्ट आहे. पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की, प्रत्येक कार्यकर्त्याने गटागटाने कामाला लागावे आणि घरोघरी जाऊन पक्षाच्या योजना आणि कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवावी. “आपण आतापासूनच मेहनत घेतली तर पुण्यात ऐतिहासिक विजय नक्की मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुण्यातील राजकीय समीकरणे
पुणे महानगरपालिकेची निवडणूक ही नेहमीच राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाची राहिली आहे. यंदा युतीच्या चर्चांमुळे आणि स्वबळावर लढण्याच्या शक्यतेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या विधानाने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला असून, पक्षाने आता निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाने पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. युतीचा निर्णय वरिष्ठ नेत्यांवर सोपवत कार्यकर्त्यांना जनसंपर्कावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. आता पुण्यातील निवडणूक रंगतदार होणार असून, भाजपचा ऐतिहासिक विजयाचा दावा कितपत खरा ठरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
बावधन खुर्द व बावधन बुद्रुक गावठाण सिटी सर्वे प्रक्रियेला सुरुवात; दिलीप वेडेपाटील यांच्या अथक प्रयत्नांना यश
Newsworldmarathi Pune बावधन खुर्द व बावधन बुद्रुक या गावांचा गावठाण सिटी सर्वे आजपासून औपचारिकपणे सुरू झाला आहे. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेसाठी गेल्या ५ वर्षांपासून सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारे माजी नगरसेवक दिलीप अण्णा वेडेपाटील यांचे अथक प्रयत्न आज यशस्वी झाले आहेत.
बावधन परिसरातील झपाट्याने वाढणाऱ्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर गावठाण हद्दीचे अचूक आणि कायदेशीर मोजमाप होणे ही गावाच्या भविष्यकालीन विकासासाठी अत्यावश्यक बाब होती. मात्र ही प्रक्रिया अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. याला चालना देण्यासाठी दिलीप अण्णा वेडेपाटील यांनी शासन, महसूल विभाग, आणि जमाबंदी कार्यालयाशी सातत्याने संवाद साधून या विषयाला प्राधान्य देण्याची मागणी केली.
या प्रक्रियेस गती मिळवून देण्यासाठी त्यांनी मा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची विशेष भेट घेऊन बावधन गावातील स्थिती सविस्तरपणे मांडली. या बैठकीदरम्यान जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे, उपायुक्त राजेंद्र गोळे, तसेच जमाबंदी नगर भूमापन विभागाचे अधिकारी हे उपस्थित होते.
सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या सहकार्याने आजपासून प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे काम सुरु झाले असून गावठाण हद्द, खाजगी जमिनी, रस्ते, सार्वजनिक जागा, मंदिरे, शाळा, यांचा नकाशा व मालकी हक्कांचे दस्तऐवजीकरण करण्यात येणार आहे.
सिटी सर्वेचे नागरिकांना होणारे फायदे :
•मालमत्तेवर कायदेशीर हक्क सिद्ध होणार.
•जमिनीच्या नोंदी शासकीय दस्तऐवजांमध्ये समाविष्ट होतील.
•बँक कर्ज, वारसा नोंदणी यांसारख्या प्रक्रियेस सुलभता.
•शासकीय योजना व नागरी सुविधांसाठी अडथळे दूर.
•बावधन गावाच्या नियोजनबद्ध विकासाला चालना मिळणार.
दिलीप अण्णा वेडेपाटील यांनी यावेळी सांगितले की,
“हा सिटी सर्वे म्हणजे फक्त नकाशा काढण्याची प्रक्रिया नसून, हे गावाच्या विकासाच्या दृष्टीने एक मूलभूत पाऊल आहे. गावातील प्रत्येक नागरिकाचा कायदेशीर हक्क निश्चित व्हावा, हीच माझी भूमिका होती. आज ती पूर्ण होताना पाहून समाधान वाटतं. s”या ऐतिहासिक निर्णयामुळे बावधन गावाच्या भविष्यकालीन पायाभरणीत महत्त्वाची भर पडणार असून, येत्या काळात अनेक विकासकामांना गती मिळणार आहे.
पीओके प्रमाणे, काँग्रेस नव्हे तर ‘भ्रष्टाचारी व्याप्त भाजप’; काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी
पुणे : एकीकडे ‘वायूसेना प्रमुखांच्या’ वक्तव्यातून ‘संरक्षण खात्याची वास्तवता’ समोर आल्याने, सत्ता पक्षाची पोलखोल झाली आहे. राहुल गांधी यांचे देशाप्रती काळजी दर्शवणारे प्रश्न योग्यच असल्याचे सिद्ध झाले असल्याने त्यांची भुमिका जागरुक व समंजस विरोधी पक्ष नेत्याची असल्याचे वेळोवेळी सिद्ध होत असुन देशभर प्रशंसा होत आहे. यामुळेच भाजप नेते बिथरल्याचेच् बघायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे देशातील विरोधी पक्षाचे नेत्यावर अश्लाघ्य व अतार्किक टिका करत फडणवीस आपल्या बौद्धिक दिवाळखोरी व विकृतीचेच प्रदर्शन करत असल्याची प्रखर टीका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, खरेतर फडणवीसांना पीओके प्रमाणे प्रमाणे तुलनाच करायची असेल तर ती काँग्रेस नव्हे तर भाजप सोबतच चांगल्या पध्दतीने होऊ शकते. ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणवणाऱ्या भाजप’ने भ्रष्टाचार मुक्त देशाची घोषणा करून एकीकडे ११ वर्षात ‘एकाही भ्रष्टाचारी नेत्यावर’ खटला चालवून, त्यास गजाआड टाकण्याचे काम केलेले नाही, तर उलटपक्षी ‘भ्रष्टाचार व्याप्त वा काँग्रेस व्याप्त भाजप’ करण्याचे पवित्र कार्य करून अनायसे काँग्रेस सह अन्य राजकीय पक्ष स्वच्छ करण्याचेच कार्य केले आहे.
देशाच्या “संरक्षण वा गृह खात्याची” जबाबदारी असलेले भाजप नेते, देशाच्या वा राज्याच्या सुरक्षा विषयक प्रश्नांवर वा आपल्या संविधानीक ऊत्तरदायीत्वावर चकार शब्द न बोलता वा स्वराजधर्माचे पालन न करता, जनतेने प्रश्न विचारण्यास निवडून दिलेल्या प्रतिनिधींवरच अश्लाघ्य आरोप करण्यात धन्यता मानत असून आपल्या ‘राजकीय नादानपणाचे व बेजबाबदारपणाचे’ प्रदर्शन करत असल्याचे प्रतिपादन काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.
देशाच्या विरोधी पक्ष नेत्यावर वा राष्ट्रीय प्रश्नांवर तारे तोडण्यापेक्षा, स्व-अखत्यारीतील व राज्यातील अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काही करावे, एमएमआरडीच्या हजारो कोटी भ्रष्टाचाराकडे लक्ष केंद्रित करावे तसेच कायदा – सुव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करून बीड, परभणी, बदलापूर, पुणे जिल्हा इ मधील खुनांच्या तपास प्रकरणांना गती द्यावी, धुळे मंत्री महोदयांच्या स्वीय सहाय्यकांच्या खोलीत मिळालेल्या १॥ कोटी रकमे बाबत बोलावे, पोर्शे कार प्रकरणी, वाढत्या ड्रग्ज व सायबर गुन्हे प्रकरणी अधिक लक्ष केंद्रित करावे व ‘राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री’ नात्याने, जनतेप्रती संविधानीक कर्तव्यांची पुर्तता करावी व अपेक्षित राजधर्माचे पालन करावे.. असे खडे बोल काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या प्रसिद्धी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांनी सुनावले.
लाडक्या बहिणींना टप्याटप्याने निधी वाढवणार; एकनाथ शिंदेंचं मोठं विधान
Newsworldmarathi Nashik: राज्यातील लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, उलट टप्प्याटप्याने निधी वाढवण्यात येईल, अशी स्पष्ट ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीत महायुतीने दिलेली आश्वासने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मी मिळून पूर्ण करू, असं ठाम वक्तव्य त्यांनी केलं.
इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित यांनी शिंदेसेनेत प्रवेश करत पक्षाला रामराम ठोकला. यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते. त्यांच्या पाठोपाठ इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील १५०० महिला कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सेनेला नाशिकमध्ये पुन्हा मोठा धक्का बसला आहे.
निर्मला गावित या दोन वेळा आमदार राहिल्या असून त्यांचे वडील माणिकराव गावित सलग ९ वेळा खासदार होते. यामुळे हा प्रवेश उद्धवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता शिंदेसेनेचा हा मजबूत पाऊल असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
शिंदे यांचे शिवसैनिकांना आवाहन: “गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक” या घोषवाक्यानुसार काम करा व महायुतीचा भगवा आगामी निवडणुकांमध्ये फडकवा, असे आवाहनही यावेळी एकनाथ शिंदे यांनी केले.
१५०० महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश
श्रमिक वर्तमान कामगार संघटनेच्या शालेय पोषण आघार समितीचे अध्यक्ष शरद लोहकरे पाटील, तालुका अध्यक्ष मच्छिंद्र पवार, नाशिक जिल्हा परिषदेच्या उबाठाच्या माजी उपाध्यक्षा नयना गावित यांच्यासह इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील १५०० महिला कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
ऐतिहासिक क्षण:एनडीएतील मुलींची पहिली तुकडी बाहेर पडली -17 मुलींनी पुशअप्स मारून साजरा केला आनंद
Newsworldmarathi Pune: सैन्यदल आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या इतिहासातील मोठा क्षण शुक्रवारी अनुभवायला मिळाला. एनडीएतील १४८व्या तुकडीचे ऐतिहासिक दीक्षांत संचलन शुक्रवारी झाले. महिला कडेटची पहिली तुकडी एनडीएतून बाहेर पडली. पहिल्या तुकडीतील १७ मुलींनी दीक्षांत संचलनानंतर पुशअप्स मारून आनंद साजरा केला.
मिझोरामचे राज्यपाल तथा निवृत्त जनरल व्ही. के. सिंह यांची दीक्षांत संचलनाला प्रमुख उपस्थिती होती. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख ले. जनरल धीरज सेठ ,एनडीएचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल गुरचरण सिंग, उपप्रमुख एअर मार्शल सरताज बेदी या वेळी उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाने २०२१ मध्ये दिलेल्या अंतरिम निकालानंतर महिलांसाठी एनडीएचे दरवाजे खुले करण्यात आले होते. त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत प्रवेश प्रक्रिया राबवून १९ मुलीची पहिल्या तुकडीसाठी निवड करण्यात आली. त्यापैकी १७ कडेट्स नी तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षणानंतर आता या सर्व आधिकारी मुली पुढील एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करून सैन्यदलात दाखल होणार आहेत.
Vaishnavi Hagwane Case : हगवणे कुटुंबीयांचं नवीन कांड समोर; फसवणूक अन् धमकीचा आरोप; काय आहे जेसीबी खरेदी प्रकरण?
Newsworldmarathi Pimpri: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने आधीच चर्चेत असलेल्या हगवणे कुटुंबीयांवर आता आणखी एका गंभीर गुन्ह्याची नोंद झाली आहे. वैष्णवीच्या पती शशांक हगवणे आणि सासू लता हगवणे यांच्यावर ११ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक आणि पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. त्यामुळे हगवणे कुटुंबीयांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
प्रशांत येळवंडे (रा. निगोजे, ता. खेड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मार्च २०२२ मध्ये त्यांनी शशांक आणि लता हगवणे यांच्याकडून २४ लाख रुपयांना जेसीबी खरेदीचा व्यवहार केला होता. पाच लाख रुपये रोख दिल्यानंतर उर्वरित कर्जासाठी दरमहा ५० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यांनी हप्त्यांद्वारे ६.७० लाख रुपये भरले; मात्र हगवणे यांनी बँकेचे हप्ते न भरता रक्कम स्वतःसाठी वापरली आणि बँकेने जेसीबी जप्त केला. नंतर मशीन परत मिळावी म्हणून पाठपुरावा करत असताना शशांकने पिस्तूल दाखवून धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकारामुळे पोलिसांनी फसवणूक आणि धमकावल्याचा गुन्हा दाखल केला. यासोबतच वैष्णवी आत्महत्या प्रकरणातील तपासही वेग घेत आहे. पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा हगवणे यांची गुरुवारी येरवडा कारागृहात रवानगी झाली. त्यांच्यावर वैष्णवीवर मानसिक आणि शारीरिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप आहे. सासरा राजेंद्र आणि दीर सुशील हगवणे यांना देखील पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी आरोपींच्या मोबाईलमधील चॅट, मेसेजेस आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. आरोपी शशांक व त्याच्या कुटुंबीयांवर आता विविध गंभीर कलमान्वये कारवाई होत असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभूते करत आहेत. या प्रकारामुळे हगवणे कुटुंबीयांच्या अडचणी आणखी गहण झाल्या आहेत.
धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात
Newsworldmarathi Beed : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे हे मागील आठ दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील प्रसिद्ध विपश्यना केंद्रात विपश्यना घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मागील साधारण सहा महिन्यांपासून धनंजय मुंडे यांच्या भोवती विणले गेलेले खोटे आरोपांचे जाळे, मीडिया ट्रायल यांसह विविध कारणांमुळे अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळ सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काही दिवसांनी म्हणजेच आठ दिवसापूर्वी माजी मंत्री छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊन धनंजय मुंडे यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी देण्यात आली होती.
मधल्या काळात धनंजय मुंडे यांच्या दोन्ही डोळ्यांवर शस्त्रक्रिया झाली, त्यानंतर काही दिवसातच त्यांना बेल्स पालसी या दुर्मिळ आजाराने ग्रासले. विविध उपचार घेऊनही अद्याप धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीत हवी तितकी सुधारणा झालेली नाही.
चारही बाजूने धनंजय मुंडे यांना खोटे आरोप, मीडिया ट्रायल करून कात्रीत पकडले असताना देखील प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन धनंजय मुंडे हे या काळात अतिशय शांत होते. अत्यंत संयमी राहत त्यांनी कसलेही प्रत्युत्तर न देता ही परिस्थिती हाताळली.
मात्र या काळात प्रचंड मनस्ताप, ट्रायल, आरोपांच्या फैरी सहन केलेल्या धनंजय मुंडे यांनी इगतपुरी येथील सुप्रसिध्द विपश्यना केंद्र येथे जाऊन मन:शांती घेण्याचा निर्णय घेतला. आठ दिवसापासून ते त्या ठिकाणी ध्यानधारणा करत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.
सलग दहा दिवस त्यांचा हा कार्यक्रम असल्याचे समजते त्यापैकी आठ दिवस पूर्ण झाले असून ते आपली ध्यान साधना पूर्ण करून दोन तारखेला पुन्हा कामाला लागणार असल्याचे त्यांचे कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.
याच काळात बीड जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे आमदार आर टी देशमुख यांचे अपघाती निधन झाले. देशमुख हेही मुंडे कुटुंबाचे अतिशय जवळचे होते. तरीही देशमुख यांच्या अंत्यसंस्कारात धनंजय मुंडे दिसून आले नाहीत.
त्यांनी आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी धनंजय मुंडे कुठे आहेत याबद्दल सुगावा लागू दिला नव्हता मात्र ते नाशिक येथे इगतपुरी येथील केंद्रात विपश्यना घेत असल्याचे आता समोर आले आहे.
वेगवेगळे वाद, आरोप, शपथविधी राजीनामा अशा वेगवेगळ्या घटनांमुळे धनंजय मुंडे हे मागील सहा महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहेत. मधल्या काळात ते उपचारासाठी विदेशात गेल्याची ही माहिती आली होती, या विपशनेनंतर नवीन धनंजय मुंडे पाहायला मिळतात का? याकडे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.
Vaishnavi Hagwane Case : शशांक हगवणेचे मामा IPS जालिंदर सुपेकरांना गृह विभागाचा दणका; केली मोठी कारवाई
Newsworldmarathi Pune : वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्या प्रकरणात मामे-सासरे विशेष पोलिस महानिरीक्षक (कारागृह सेवा सुधार विभाग, महाराष्ट्र) जालिंदर सुपेकर यांनी हगवणे कुटुंबास मदत केल्याचा आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर गृह विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. जालिंदर सुपेकर यांच्याकडून नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढून घेतला आहे.
जालिंदर सुपेकर यांनी यापूर्वी देखील आपली बाजू मांडली होती. वैष्णवी हगवणे हिची आत्महत्या आणि पिस्तूल परवाना देण्यासंदर्भात माझा कोणताही संबंध नाही, असं सुपेकर यांनी यावेळी सांगितले होते. मात्र, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
दरम्यान, दमानिया यांनी जालिंदर सुपेकर यांच्या संदर्भातील अनेक पुरावे समोर आणले. जालिंदर सुपेकर यांची कारकीर्द वादग्रस्त असल्याचे दमानिया यांनी दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे ५०० कोटींच्या भ्रष्टाचारा प्रकरणी त्यांच्यावर खटला सुरू असल्याची बाबही अंजली दमानिया यांनी निदर्शनास आणून दिली होती. त्यामुळे जालिंदर सुपेकर यांच्या भूमिकेबाबत त्यांच्याविरोधात संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. याच पार्शवभूमीवर गृहविभागाने मोठा निर्णय घेत त्यांच्याकडून नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढून घेतला आहे.
गृह विभागाच्या परिपत्रकात नेमकं काय म्हटलंय?
“विशेष पोलीस महानिरीक्षक, मुख्यालय, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे” हे जबाबदारीच्या दृष्टीने अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, या पदानंतरचे महत्वाचे पद आहे. त्यामुळे, जालिंदर सुपेकर यांच्याकडे असलेल्या “कारागृह उप महानिरीक्षक” या संवर्गातील तिन्ही रिक्त पदांचा (नाशिक विभाग, नाशिक, मध्य विभाग, छत्रपती संभाजीनगर आणि पूर्व विभाग, नागपूर) अतिरिक्त कार्यभार ठेवणे प्रशासकीयदृष्ट्या उचित नाही, असे संबंधित आदेशात म्हटलं आहे.
तसेच, “कारागृह उप महानिरीक्षक” या कनिष्ठ संवर्गातील पदाचा कार्यभार “विशेष पोलीस महानिरीक्षक, मुख्यालय, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे” या वरिष्ठ संवर्गातील पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याकडे सोपवणे योग्य नाही. त्यामुळे जालिंदर सुपेकर यांच्याकडील “कारागृह उप महानिरीक्षक” या संवर्गातील तिन्ही रिक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार कारागृह विभागातील इतर अधिकाऱ्यांकडे सोपविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार, या तिन्ही पदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.

