पुणे राष्ट्रवादी काँग्रेसला दोन नवीन शहराध्यक्ष; सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप यांची नियुक्ती

0
Newsworldmarathi Pune: पुणे शहर राष्ट्रवादी (अजित पवार गट) काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी माजी आमदार सुनील टिंगरे आणि माजी नगरसेवक सुभाष जगताप यांची निवड करण्यात आली आहे. तसेच कार्याध्यक्षपदी रूपाली ठोंबरे, हाजी फिरोज शेख, प्रदीप देशमुख आणि अक्रूर कुदळे यांना संधी देण्यात आली आहे. शहराध्यक्ष म्हणून सुनील टिंगरे यांच्याकडे वडगाव शेरी, कॅन्टोन्मेंट, कसबा आणि हडपसर या भागांची जबाबदारी असणार आहे. तर सुभाष जगताप यांच्याकडे पर्वती, शिवाजीनगर, खडकवासला आणि कोथरूड विभाग सोपवण्यात आला आहे. यापूर्वीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर जवळपास महिनाभर रिक्त असलेल्या शहराध्यक्ष पदावर राष्ट्रवादीने आता दोन प्रमुख नेत्यांची नेमणूक करत संघटनात्मक बळ वाढवले आहे.

जागतिक स्तरावर भारतीय निर्यातदारांना वाढत्या संधी; डॉ. अजय सहाय

0
Newsworldmarathi Pune: “देशाच्या अर्थव्यवस्थेचा आलेख जागतिक पातळीवर सातत्याने उंचावत आहे. तसेच राष्ट्रीय स्तराप्रमाणे जिल्हास्तरावरील वैशिष्ट्यपूर्ण घटकांच्या निर्यातीसाठी विविध योजना आहेत. भारतीय व्यावसायिकांना निर्यातीच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत”, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाअंतर्गत फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशनचे (एफआयईओ-फिओ) महासंचालक डॉ. अजय सहाय यांनी केले. या पार्श्वभूमीवर उद्योगाभिमुख व विविध निर्यातपूरक योजनांच्या मदतीने निर्यातवाढीच्या संधींचा निर्यातदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयांतर्गत फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन (एफआयईओ), मिटकॉन पुणे व कॅनरा बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक्स्पोर्ट कॉन्क्लेव्ह’चे (निर्यात परिषद) आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत ‘एफआयईओ’चे महासंचालक डॉ. अजय सहाय यांनी वाढते निर्यात अर्थकारण, ई-कॉमर्स क्षेत्रातील निर्यात, निर्यात क्षेत्रातील जोखीम तसेच निर्यातीच्या संधी, योजना अशा मुद्यांवर विवेचन केले. नगर रस्त्यावरील हॉटेल नोवोटेल येथे झालेल्या कार्यक्रमात फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन्स आणि मिटकाॅन यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या व कराराचे आदानप्रदान करण्यात आले. मिटकॉनचे चेअरमन अजय अग्रवाल, व्यवस्थापकीय संचालक आनंद चलवादे, चंद्रशेखर भोसले, डॉ. गणेश खामगळ, संकेत लोंढे, ‘डीजीएफटी’चे अमित शर्मा, रिझर्व्ह बँकेच्या विदेशी चलन विनिमय विभागाच्या महासंचालक लता राधाकृष्णन, ईसीजीसीच्या महासंचालक अर्पिता सेन, इंडिया पोस्ट पुणे विभागाचे संचालक अभिजीत बनसोडे, कॅनरा बॅंकेच्या ट्रेझरी विभागाचे उपसंचालक केजेएस नाईक, मिटकाॅनचे व्यवस्थापकीय संचालक आनंद चलवादे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. विदेशी व्यापार महासंचालनालय, भारतीय पोस्ट, कॅनरा बँक, मिटकॉन व एक्स्पोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुमारे २०० हून अधिक निर्यातदार, उद्योजक आणि स्टार्टअप प्रतिनिधी परिषदेत सहभागी झाले होते. ग्रामीण भागातील छोटे उद्योग व शेतकर्‍यांच्या मालाची निर्यात वाढण्यासाठी डाक घर निर्यात केंद्र उभारण्यात येत असल्याचे डॉ. अजय सहाय यांनी सांगितले.

‘श्री शिवगोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक महामंडळ’ नाव देण्याची मच्छिंद्र चव्हाण यांची मागणी

0
Newsworldmarathi Pune: “विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने भटक्या विमुक्त जाती-जमातीतील नाथपंथी समाजासाठी ‘वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जाती आर्थिक विकास महामंडळ’ अंतर्गत उपकंपनी म्हणून स्थापन करण्यात आलेल्या महामंडळाला दिलेले ‘परमपूज्य गंगनाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ’ हे नाव त्वरित बदलून त्याचे नाव ‘श्री शिवगोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक महामंडळ’ असे करावे,” अशी मागणी नाथपंथी समाजाचे प्रतिनिधी व निवृत्त पोलीस उप-अधीक्षक मच्छिंद्र चव्हाण यांनी केली. अखिल नाथपंथी डवरी गोसावी, नाथजोगी, नाथबाबा, गोंधळी, बहरूपी, भारूडी या भिक्षुक, भटक्या जाती-जमातीच्या राज्यभरातील समाजबांधवांनी शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे राज्यस्तरीय बैठक घेऊन महामंडळाचे नामांतर करण्याचा ठराव मंजूर केला. मच्छिंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीला निवृत्त महसूल उपायुक्त आनंदराव जगताप, महादेव शिंदे, डॉ. जयाजी नाथसाहेब, नारायण शिंदे, भालचंद्र सावंत यांच्यासह मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभाग या राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने नाथपंथी समाजबांधव उपस्थित होते.  मच्छिंद्र चव्हाण म्हणाले, “विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ घोषित केले. याचे स्वागत करीत संपूर्ण महाराष्ट्रातील नाथपंथी समाज बांधवानी महायुतीला भरभरून मतदान केले. सरकार स्थापन झाल्यावर मंत्रिमंडळाने हे महामंडळ स्थापनही केले. मात्र, काही लोकांनी खोटी माहिती देऊन या महामंडळाला ‘परमपूज्य गंगनाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ’ असे नाव दिले. गंगानाथ महाराज हे एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचे वडील असून, त्यांचे समाजासाठी कोणतेही योगदान नाही. शिवाय, सदरचे निवृत्त पोलीस अधिकारी हे महामंडळ स्वतःची मालमत्ता असल्याचे भासवून समाजामध्ये दादागिरी करू लागले आहेत. परिणामी, नाथपंथी समाजामध्ये रोष निर्माण झाला आहे. या महामंडळ सर्वसमावेशक नाव देण्याची मागणी, चर्चा व वादविवाद समाजामध्ये गेल्या चार महिन्यांपासून सुरु आहेत. याच पार्शवभूमीवर ही बैठक महत्वपूर्ण ठरली.”

मोठी बातमी! बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेला दिल्लीतून अटक; मुंबई गुन्हे शाखेची कारवाई

Newsworldmarathi Mumbai: बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले याच्याविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला दिल्लीतून अटक केल्याची माहिती समोर आली आहे. नुकतेच बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि सायबर विभागात कासले याच्याविरोधात दोन नवीन गुन्हे दाखल करण्यात आले होते. कासले याच्यावर समाजात तेढ निर्माण करणे, तसेच विविध राजकीय नेत्यांवर गंभीर आरोप केल्याच्या प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. बीडसह मुंबईत देखील त्याच्याविरोधात गुन्हे दाखल झाले असून, त्याच्या वक्तव्यांमुळे सामाजिक शांतता धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. यानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्लीमध्ये विशेष मोहिम राबवून त्याला अटक केली. अटक केल्यानंतर कासलेला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, मुंबई गुन्हे शाखा पुढील तपास करत आहे. या प्रकरणामुळे एकेकाळी पोलीस खात्यात अधिकारी म्हणून काम केलेल्या कासले याच्याविरोधात कायदेशीर कारवाईचा वेग वाढलेला दिसत आहे. सध्या कासले याच्याविरोधात आणखी काही गंभीर प्रकरणांची चौकशी सुरू असून, पोलिस आणि सायबर गुन्हे शाखा त्याच्या ऑनलाइन कृतींचा सखोल तपास करत आहेत.

Manikrao Kokate: ‘कृषिमंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी’; माणिकराव कोकाटेंचे आणखी एक वादग्रस्त वक्तव्य

Newsworldmarathi Mumbai: राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. नुकत्याच छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या कार्यक्रमात बोलताना कोकाटे यांनी कृषी खात्याबाबत नाराजी व्यक्त करत “कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावाची पाटीलकीच आहे, आणि मला हे खातं दिलंय” असं वक्तव्य केलं. हे विधान केवळ त्यांची नाराजी दाखवून गेलं नाही, तर राज्याच्या कृषी धोरणांवर आणि मंत्रिमंडळातील भूमिका वाटपावरही प्रश्न निर्माण करतं. अ. भा. बळीराजा संघटना भारततर्फे आयोजित गुणवंत शेतकरी पाल्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यापूर्वीही कोकाटे यांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीत “ढेकळांचे पंचनामे करायचे का?” असे वादग्रस्त विधान करून शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या होत्या. या वक्तव्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. आता त्यांच्या “ओसाड गावाची पाटीलकी” या विधानावरूनही नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. केंद्र व राज्य सरकारचं बचावात्मक भूमिकेत स्पष्टीकरण कोकाटे यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण देताना म्हटले की, “राज्यात बऱ्याच भागांत पेरणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी फारसं पीक उरलेलं नाही. मात्र, फळबागांचे आणि कांद्याचे नुकसान लक्षात घेता त्यांचे पंचनामे करण्यात येतील. जेथे खरंच नुकसान झालं आहे तिथेच पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.” त्यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणांचे कौतुक करत सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, तसेच मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्नशील आहेत.” शेतकऱ्यांच्या मुलांना शेती शिक्षणाचा सल्ला कार्यक्रमात कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीविषयक शिक्षण घेऊन शेती आधारित व्यवसायात करिअर घडवावे, असा सल्लाही दिला. मात्र, शेतकऱ्यांच्या वेदनांवर भाष्य करताना दिलेली विधानं सध्या त्यांच्या विरोधात जात असून, अशा संवेदी काळात अधिक जबाबदारीने बोलण्याची अपेक्षा सर्वसामान्य शेतकरी व्यक्त करत आहे.

अजितदादांच्या कार्यकर्त्यात दम असेल तर आज संध्याकाळी बारामतीत येतोय, मला अडवून दाखवा !! लक्ष्मण हाके यांचे थेट चॅलेंज..

बारामती : सध्या ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी असा वाद पेटला आहे. लक्ष्मण हाके पंढरपूर येथे असताना त्यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. मी रोज दोन ते तीन जिल्ह्याची बॉर्डर पार करतोय. सुरत चव्हाण यांच्या अंगात जर फार खुमखुमी असेल तर सुरज चव्हाण आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यात दम असेल तर मी आज संध्याकाळी बारामतीत येतोय. मला अडवून दाखवावं असं चॅलेंज ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिलं आहे. यामुळे आता वातावरण तापले आहे. नुकताच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अर्थखात्यावरून निशाणा साधला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटातून हाकेंवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. यामुळे वाद वाढत गेला. राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांनी हाके हे देशी दारुचे ब्रँड अॅम्बेसिडर आहे, अशी जिव्हारी लागणारी टीका केली. तर त्यांना धडा शिकवण्याची भाषा केली होती. त्यानंतर आता लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादीला थेट खुले आव्हान दिले आहे. सुरत चव्हाण यांच्या अंगात जर फार खुमखुमी असेल तर सुरज चव्हाण आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यात दम असेल तर मी आज संध्याकाळी बारामतीत येतोय. मला अडवून दाखवावं असं चॅलेंज ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिलं आहे. दरम्यान, सुरज चव्हाण प्रश्नावर बोला आम्ही फक्त निधी मागतोय तुम्ही काय वैयक्तिक टीका करताय, असे हाके म्हणाले. अजितदादा असली पिल्लावळ माझ्यावर बोलायला सोडताय, तुमचं भवितव्य खूप उज्ज्वल आहे, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांच्यावर केली.

Manikrao Kokate : कोकाटेंच्या ‘ढेकळांचे पंचनामे’ विधानावर वाद; कृषीमंत्र्यांचे स्पष्टीकरण

Newsworldmarathi Nashik : राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावात नुकसानीची पाहणी करताना त्यांनी विचारले, “हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का?” या विधानामुळे शेतकरी संघटनांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, कोकाटे यांनी स्पष्टीकरण देत म्हटले की, “ज्या शेतात काहीच नाही, त्या ठिकाणी पंचनामे करून काय करणार? जे कांदे वावरात आहेत, त्यांचेच पंचनामे होतील. जे घरात आणून ठेवले आहेत, त्यांचे पंचनामे होणार नाहीत.” कोकाटे यांच्या या विधानामुळे विरोधकांनीही टीका केली आहे. कृषीमंत्री म्हणून त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना समजून घेऊन संवेदनशीलता दाखवावी, अशी मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती मदत आणि भरपाई देण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नेमकं काय म्हणाले कोकाटे ? कृषीमंत्र्यांना नुकसानीसंदर्भात विचारले असता, नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, उभ्या पिकांचेच पंचनामे केले जात आहेत, असे विचारले असता कोकाटे म्हणाले की, हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय होणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? जे कांदे शेतात आहेत, त्यांचेच पंचनामे होतील. जे घरात आणून ठेवले आहेत, त्यांचे पंचनामे होणार नाहीत. त्याचे पंचनामे करणे अवघड आहे. ते नियमात बसत नाही, असे त्यांनी म्हटले. शेतात जी काही पिके असतील त्यांचे रितसर पंचनामे केले जातील, असेही मंत्री कोकाटे यांनी स्पष्ट केले.

मेट्रोच्या विस्तारीकरणाला मिळणार गती; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याशी चर्चा

0
Newsworldmarathi Pune: पुणे शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता मेट्रो प्रकल्पांना गती देण्यासंदर्भात पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय नगरविकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली. वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या विस्तारित टप्प्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी देणे तसेच खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासलासोबतच नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग या टप्प्यांना पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डाची मान्यता मिळविण्यासंदर्भात मोहोळ यांनी खट्टर यांच्याशी चर्चा केली. पुणे मेट्रोचे दोन्ही मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू असताना वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या मेट्रो मार्गाचे विस्तारीकरण प्रस्तावित आहे. यासाठी महा मेट्रोने सविस्तर विकास आराखडा तयार केला असून याला राज्य सरकारचीदेखील मंजुरी मिळालेली आहे. तसेच पब्लिक इनव्हेसमेंट बोर्डाचीही मान्यता ११ मार्च २०२५ रोजी मिळाली असून आता केंद्रीय मंत्रिमंडळाची अंतिम मंजुरी प्रतीक्षात आहे. हा प्रस्ताव लवकरात लवकर केंद्रीय मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात यावा, अशी मागणी मोहोळ यांनी खट्टर यांच्याकडे केली. तसेच मेट्रोच्या विस्तारीकरणाचा भाग म्हणून खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला हा मार्गही दृष्टीक्षेपत असून सोबतच नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग हा जोडमार्गही प्रस्तावित आहे. याही प्रकल्पाला राज्य सरकारची मंजुरी मिळाली असून पीआयबीची मान्यता प्रतीक्षेत आहे .तसेच पीआयबीच्या मान्यनंतर मान्यतेनंतर सदर प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळात ठेवण्यात यावा, याबाबत मोहोळ यांनी खट्टर यांच्याशी चर्चा केली. याबाबत माहिती देताना मोहोळ म्हणाले, ‘पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पांना गती देण्याची मोदी सरकारची भूमिका असून नवे प्रस्तावित मार्ग लवकरात लवकर मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. संपूर्ण शहरभर मेट्रोचे जाळे तयार करताना त्याला आणखी वेग यावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही विषयांबाबत खट्टर यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल हा विश्वास वाटतो.

कात्रज परिसरातील ५ हजार नागरिकांना आयुष्मान भारत कार्डांचे वाटप

0
Newsworldmarathi Pune: केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेअंतर्गत कात्रज परिसरातील पाच हजार नागरिकांना आयुष्मान भारत कार्डांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका मनीषा कदम आणि सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ कदम यांच्या पुढाकाराने करण्यात आले. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या आरोग्याच्या गरजा भागवण्यासाठी मोठा आधार मिळणार आहे. उपचारासाठी लागणारा खर्च सुसह्य होणार असल्याने स्थानिक नागरिकांनी मनीषा कदम आणि राजाभाऊ कदम यांचे आभार मानले आहेत. आयुष्मान भारत योजना, ज्याला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना किंवा राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना असेही म्हटले जाते, ही केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे. ही योजना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन अंतर्गत २०१८ मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेचा उद्देश म्हणजे प्राथमिक, माध्यमिक आणि तृतीयक आरोग्य सेवा सुलभ करणे, तसेच प्रतिबंधात्मक व प्रोत्साहनात्मक आरोग्य सेवांचा समावेश करून नागरिकांना समग्र आरोग्य सुविधा पुरवणे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दरवर्षी ५ लाख रुपये पर्यंतच्या उपचारांसाठी मदत मिळते. या रकमेचा उपयोग देशभरातील सहाभागी रुग्णालयांमध्ये (सरकारी तसेच खासगी) मोफत उपचारासाठी करता येतो. हा उपक्रम आरोग्य सेवांमध्ये आर्थिक अडचणीमुळे होणाऱ्या अडथळ्यांना दूर करून गरजू नागरिकांना दिलासा देणारा ठरत असल्याचे राजाभाऊ कदम यांनी सांगितले.

सकारात्मकपणे काम करणारी आजची तरुणाई सर्वांसाठी प्रेरक ; माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे

Newsworldmarathi sambhajinagar: समृद्ध समाजनिर्मितीसाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून शेती, युवक, महिला, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रात खूप मोठे सामाजिक कार्य सुरू आहे. या माध्यमातून समर्पित भावनेने लक्ष केंद्रित करत, जिद्द, चिकाटी, मेहनत घेत, अडचणीत तग धरून राहत, सकारात्मक आणि सातत्य ठेवत काम करणारी ही आजची तरुण पिढी सर्वांसाठी प्रेरक आहे. भारताचे उद्याचे भविष्य असणाऱ्या तरुणाईस आज यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार देत असताना अभिमान वाटतो, असे प्रतिपादन राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने महाराष्ट्राच्या सर्वागीण विकासासाठी विविध क्षेत्रात विधायक, भरीव व विशेष कामगिरी करणाऱ्या युवक-युवतींना दिल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार सोहळ्याचे आज एमजीएम परिसरातील रुक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते. यावेळी टोपे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या जिल्हा केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम होते तर, मानद कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, कार्यकारिणी सदस्य डॉ. अपर्णा कक्कड, कवी दासू वैद्य, संयोजक नीलेश राऊत, केतकी नेवपुरकर, गौरव सोमवंशी, विभागप्रमुख संतोष मेकाळे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना टोपे म्हणाले, आज विविध क्षेत्रात काम करणारे हे सगळे तरुण समाजाच्या भल्यासाठी काम करत आहेत. विशेषत: सामान्य नागरिकांचे जीवन सुखमय आणि आनंददायी होण्यासाठी ही तरुणाई आपापल्या क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपत सातत्यपूर्ण कार्यरत आहे. या सर्वांनी आपल्या कामांतून ‘नोकरी मागणारे होण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा’ हाच संदेश दिलेला आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजासाठी कार्य करणाऱ्या सर्वांना प्रेरणा आणि बळ देण्याचे काम करत आहे. भारताला संतांच्या विचारांची फार मोठी परंपरा आहे. भगवान बुध्दाने उदात्त धर्माची दिलेली शिकवण जगासाठी मार्गदर्शक ठरलेली आहे. अशा समृद्ध विचारपरंपरा लाभलेल्या देशात जाती-धर्माच्या नावाने होणारे वाद बघून मन विषन्न होतं. वडीलधाऱ्या माणसाने तरुणांना याविषयी योग्य मार्ग दाखवला पाहिजे. आपण कुठे चुकत आहोत, हे दाखवून दिले पाहिजे. यशवंतराव चव्हाण सेंटरने यासाठी पुढील काळात काम केले पाहिजे. संधीची नवनवीन क्षितिजे उपलब्ध होत असताना आता या तरुणांनी न थांबता, अथक परिश्रमातून नवनवीन विक्रम स्थापित केले पाहिजेत, असे यशवंतराव चव्हाण सेंटरच्या जिल्हा केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम यांनी यावेळी सांगितले. मानद कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ यावेळी बोलताना म्हणाले, आज यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार प्राप्त करणारे सगळे युवक-युवती समाजाच्या भल्यासाठी अनेक महत्वाच्या विषयावर काम करत आहेत. माध्यमे याची दखल घेत असतील किंवा नाही. मात्र, आज यशवंतराव चव्हाण सेंटरने यांच्या कामाची दखल घेतली आहे. आपली आवड जोपासत ही सगळी तरुण मंडळी आपले सर्वस्व झोकून देऊन काम करत आहेत. या अशा समाजातील तळागाळात काम करणाऱ्या व्यक्तींमुळे महाराष्ट्र चालतो आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक नीलेश राऊत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशश्री मुळे यांनी केले तर आभार विभागप्रमुख संतोष मेकाले यांनी केले. आज झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ७ विविध विभागांमध्ये एकूण १६ पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातील युवकांच्या कार्याचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा आणि प्रोत्साहन मिळावे, हे या पुरस्कारांचे उद्दिष्ट आहे. *पुरस्काराचे स्वरूप :* रोख २१ हजार रु., स्मृतीचिन्ह व मानपत्र असे यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्काराचे स्वरुप आहे. यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०२४-२५ सालचे मानकरी खालीलप्रमाणे आहेत : साहित्य : विनायक होगाडे (कोल्हापूर) मृदगंधा दीक्षित (पुणे), सामाजिक : आकाश टाले (नागपूर) ऋतुजा जेवे (बुलढाणा) इनोव्हेटर : सुश्रुत पाटील (पालघर) पद्मजा राजगुरू (परभणी) क्रीडा : ओजस देवतळे, नागपूर (क्रीडा प्रकार : धनुर्विद्या) हृतिका श्रीराम, सोलापूर (डायव्हिंग), पत्रकारिता : प्रथमेश पाटील (पुणे) ज्योती वाय. एल. (मुंबई) उद्योजक : जयेश टोपे (नाशिक) शिवानी सोनवणे (पुणे) रंगमंचीय कलाविष्कार : कृष्णाई उळेकर, धाराशिव (लोककला) तन्वी पालव, सिंधुदुर्ग (शास्त्रीय नृत्य) ऋतुजा सोनवणे, जळगाव (शास्त्रीय संगीत) कल्पेश समेळ, रायगड (नाट्य)