Pune Crime News : दीपक मानकरांनंतर आता मुलगाही अडचणीत; समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

0
Newsworldmarathi Pune: राष्ट्रवादी पक्षाचे माजी शहराध्यक्ष दिपक मानकर यांच्यानंतर आता त्यांच्या मुलावर देखील गुन्हा झाला आहे. एका महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपी शंतनु कुकडे याच्याकडून ५० लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण मानकर याच्याविरुद्ध करण्यात आला आहे. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शंतनु कुकडे, करण मानकर यासह एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शंतनु कुकडे याच्याकडून घेतलेल्या ५ कोटी रुपयांच्या कर्जाबाबत ज्या स्टॅम्प पेपरवर व्यवहार करण्यात आला होता. तो बनावट स्टॅम्प असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेड हाऊस फाऊंडेशनचा शंतनु कुकडे याच्यावर अल्पवयीन मुलीच्या बलात्कारप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर सामूहिक बलात्काराचा दुसरा गुन्हा दाखल झाला. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास सुरू असतानाच कुकडे व रोनक जैन याच्या बँक खात्यावरून लाखोंचा आर्थिक व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणी चौकशी सुरू केली असता दिपक मानकर, करण दिपक मानकर आणि सुखेन शहा यांच्या बँक खात्यावरून लाखो रुपयांचा व्यवहार झाला होता. पोलिसांनी करण व सुखेन शहा याच्याकडून आर्थिक व्यवहाराबाबत चौकशी करण्यात आली. ५०० रुपयांच्या स्टँप पेपरवर बनावट करारनामा त्यावेळी करण मानकर याने त्यांच्या जबाबात सांगितले की, डोणजे याठिकाणी दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी शंतनु हा करण याला पाच कोटी रुपये कर्ज स्वरूपात देणार होता. हे कर्ज पुढील ४० वर्षांसाठी होते. त्यासंदंर्भाने ५०० रुपयांच्या स्टँप पेपरवर करारनामा झाला. मात्र, पोलिसांनी तपासादरम्यान हे बनावट तयार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांची दिशाभूल दरम्यान, शंतनू सॅम्युअल कुकडे, सुखेन शहा, करण मानकर, रौनक भरत जैन यांच्यासह इतरांवर बनावट स्टॅम्प पेपर तयार करणे, त्याद्वारे आर्थिक व्यवहार दाखवणे आणि पोलिसांची दिशाभूल करणे, या गंभीर आरोपांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शंतनू कुकडे हा एका परदेशी तरुणीवर सामूहिक बलात्कारप्रकरणी आरोपी आहे. त्याच्याशी मानकर कुटुंबीयांचे मोठे आर्थिक व्यवहार झाले आहेत. कुकडेच्या बँक खात्यात तब्बल १०० कोटीचे व्यवहार झाले असून, यातील काही रक्कम ही मानकर पिता-पुत्रांच्या खात्यात जमा झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची आकर्षक पुष्पसजावट

0
Newsworldmarathi Pune: शेषात्मज गणेश जयंतीच्या निमित्ताने फुलांच्या शेषनागांच्या प्रतिकृतींची मंदिरात केलेली आकर्षक आरास आणि गाभा-यात विविधरंगी फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये विराजमान लाडक्या गणरायाच्या चांदीच्या मूर्तीचे विलोभनीय रुप पहायला मिळाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे शेषनागाच्या विविधरंगी फुलांच्या प्रतिकृती साकारुन ही सजावट करण्यात आली. याच दिवशी श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झाला होता. गणेश जयंतीनिमित्त मंदिरात शुक्रवारी ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक पार पडला. त्यानंतर पहाटे ४ वाजता पं. कैवल्य कुमार गुरव यांनी स्वराभिषेकातून गणरायाचरणी स्वरसेवा अर्पण केली. तसेच मंदिरात गणेश याग, सहस्त्रावर्तने, गणेशजाग देखील पार पडला. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, गाणपत्य संप्रदायात भाद्रपद आणि माघ मासाप्रमाणेच ज्येष्ठ चतुर्र्थीचा श्रीशेषात्मज जन्मोत्सव महत्वपूर्ण मानलेला आहे. भगवान ब्रह्मदेव सृष्टी रचनेच्या कार्यात असताना आपल्याच सृष्टीवर मोहित झाले. त्या मोहित अवस्थेत त्यांच्या नासिकेमधून एक बालक जन्माला आले. त्याच्याकडे पाहिल्यानंतर भगवान ब्रह्मदेव अधिकच मायायुक्त झाले. परिणामी आपल्या नव्या अपत्याला त्यांनी मायाकर असे नाव दिले. अनेकानेक वरदान देऊन त्याला परिपुष्ट केले. पुढे विप्रचित्ती नामक राक्षसाने या मायाकराला राक्षसांचा राजा केले. मायाकराने आपल्या अतुलनीय वरदानांच्या भरवशावर सगळी पृथ्वी आणि स्वर्ग लोक जिंकले. त्यानंतर त्याने पाताळावर आक्रमण केले. त्याच्या वरदानासमोर निष्प्रभ झालेल्या भगवान शेषांनी शेवटी भगवान गणेशांचे स्मरण केले. श्रीशेष ध्यान करत असतांना त्यांच्या ध्यानातूनच भगवान श्री गणेश श्रीशेषात्मज रूपात ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला माध्यान्ह समयी प्रकट झाले. याच अवतारात पुढे गजासुर नामक राक्षसाला मारण्यासाठी भगवान श्री गणेशांनी ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, देवी, सूर्य या पंचेश्वरांच्या शक्तिने युक्त असलेले मूषक हे वाहन त्यांना करायला सांगितले. या मूषकावर बसून श्री गणेशांनी गजासुर वध केल्यामुळे याच श्रीशेषात्मज अवताराला श्रीमूषकग असे पण नाव प्राप्त झाले.

पुण्यात भाजप आमदाराच्या घरात जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न; वारंवार धमक्या, नेमकं काय घडलं?

0
Newsworldmarathi Pune: पुण्यातील खडकवासला मतदारसंघाचे भाजप आमदार भीमराव तापकीर यांच्या घरात जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या शंकर सर्जेराव धुमाळ (वय 47) या व्यक्तीला अखेर सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी वारंवार आमदारांच्या घराजवळ येऊन गोंधळ घालत, सुरक्षारक्षकाला शिवीगाळ करत धमक्या देत होता. धनकवडी येथील आमदार निवासस्थानाजवळ धुमाळने तीन वेळा घुसण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीला किरकोळ कारवाई करण्यात आली होती, मात्र त्याच्या पुनरावृत्तीमुळे आमदारांनी थेट पुणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तातडीची कारवाई करण्याची मागणी केली होती. आखेर पोलिसांनी उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या सूचनेनुसार धुमाळ याला अटक केली. त्याच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. राजकीय नेत्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभं करणारी ही घटना सध्या पुण्यात चर्चेचा विषय ठरली आहे. नेमकं काय घडलं? आरोपी शंकर धुमाळ हा व्यक्ती वारंवार आमदार भीमराव तापकीर यांच्या घराजवळ जाऊन गोंधळ घालत होता. त्याने तीन वेळा आमदारांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्याला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदारांच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला त्याने शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली होती. सुरुवातीला आमदारांच्यावतीने सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. सुरुवातीला आरोपीवर किरकोळ स्वरूपाची कारवाई करण्यात आली. मात्र त्यानंतरही तो पुन्हा पुन्हा येत राहिला आणि शिवीगाळ करत धमक्या देत राहिला. या प्रकरणात कारवाई न झाल्यामुळे आमदारांनी थेट पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र पाठवून लक्ष घालण्याची मागणी केली होती. त्यानुसार त्याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

Aashadhi Vari : यंदा ‘आषाढी वारी’साठी भव्य नियोजन; मुख्यमंत्र्यांचे सर्व विभागांना समन्वयाचे आदेश

0
Newsworldmarathi Pune: महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळख असलेल्या ‘आषाढी वारी’ला यंदा अधिक भव्य आणि सुरक्षित करण्यासाठी राज्य शासन सज्ज झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांना परस्पर समन्वयाने काम करण्याचे स्पष्ट आदेश दिले असून, पावसाचे लवकर आगमन लक्षात घेता वारकऱ्यांसाठी सर्व मूलभूत सुविधांची पूर्तता करण्यावर भर देण्यात आला आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध योजना जाहीर केल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, पालकमंत्री जयकुमार गोरे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि पालखी संस्थानांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होते. बैठकीतील महत्त्वाचे निर्णय : 36 वॉटरप्रूफ मंडपांची तयारी, गरज पडल्यास संख्या वाढवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी विमा योजना’ यंदाही लागू वाखरी येथे ‘मॉडेल वारकरी तळ’ आणि संत नामदेव महाराज ओटा पुनर्विकास पोलिसांची पूर्वतयारी, जिल्हानिहाय समन्वय, वाहतूक आणि अपघात टाळण्याचे निर्देश महिलांसाठी विशेष सुविधा : हिरकणी कक्ष आणि स्वतंत्र स्नानगृहे आरोग्य, पाणी, वीज आणि स्वच्छतेसाठी विशेष भर ‘निर्मल वारी, हरित वारी’ उपक्रमासाठी वृक्षारोपण आराखडा मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “वारी हे राज्याचे आध्यात्मिक वैभव असून ती अत्यंत सुव्यवस्थित पार पडावी यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन नियोजन करावे.” पुणे, नाशिक, विदर्भ, मराठवाडा येथून येणाऱ्या पालख्यांना आवश्यक त्या सुविधा वेळेत मिळाव्यात यासाठी स्थानिक प्रशासन आणि विभागीय आयुक्तांना स्वतंत्र बैठका घेण्याचे आदेश देण्यात आले. उपमुख्यमंत्र्यांचा दिलासा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, “पावसामुळे कोणत्याही वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी शासन सज्ज आहे. आरोग्य, स्वच्छता, वाहतूक आणि वसतिसुविधांबाबत संपूर्ण यंत्रणा सजग ठेवली आहे.” वारीतील महिलांच्या गरजा लक्षात घेऊन प्रयागराजच्या धर्तीवर सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. तसेच दर्शन पासची संख्या वाढवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. वारकऱ्यांचा आवाज : या बैठकीत विविध पालखी संस्थानांच्या प्रमुखांनी आपले अनुभव, अडचणी आणि सूचना मांडल्या. प्रशासनाने त्या लक्षपूर्वक ऐकून उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

पावसाळ्याचे बळी की गैरवस्थापनाचे बळी; प्रशासनाच्या अपयशावर युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांचा संतप्त सवाल

0
Newsworldmarathi Pune: शहरात अवघ्या दोन दिवसांत झाड कोसळून दोन निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांनी पुणे महानगरपालिका आणि प्रशासनावर थेट निशाणा साधला आहे. त्यांनी प्रशासनाच्या अपयशावर संतप्त प्रतिक्रिया देत प्रश्न उपस्थित केला — “ही पावसाची बळी आहेत का? की महापालिकेच्या ढिसाळ नियोजनाची बळी आहेत?” निलायम टॉकीजसमोर शुभदा सप्रे आणि अलंकार पोलीस ठाण्याजवळ राहुल जोशी या दोघांचा झाड कोसळून मृत्यू झाल्यानंतर शहरात भीतीचं वातावरण आहे. यासंदर्भात आबनावे यांनी थेट जाब विचारत अनेक जबाबदार व्यक्ती आणि यंत्रणांकडे बोट दाखवलं आहे. ➡️ पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री ➡️ पुणे महापालिकेचे आयुक्त ➡️ पालकमंत्री ➡️ शहरातील निवडून आलेले आठ आमदार ➡️ उपमुख्यमंत्री, जे नगरविकास खातेही सांभाळतात “पावसाळ्यापूर्वी आवश्यक ती झाडांची छाटणी, नालेसफाई, ड्रेनेज व्यवस्थापन या मूलभूत बाबीकडे दुर्लक्ष झालं आहे. यामुळेच पुणेकरांच्या जीवितावर घाला येतो आहे,” असा आरोप आबनावे यांनी केला. आंबील ओढा: विस्मरणात गेलेली पुराची जखम २०१९ मध्ये आंबील ओढ्यात आलेल्या पुरात २६ नागरिकांचा बळी गेला होता. त्यानंतर २०० कोटी रुपयांच्या पूर प्रतिबंधक उपाययोजना करण्याचे आश्वासन महापालिकेकडून देण्यात आले. मात्र सहा वर्षांनंतरही सीमा भिंती, नाल्यांचे विस्तारीकरण, अतिक्रमण हटवणे किंवा कल्वर्ट उंचीकरण यातील कोणतेही काम पूर्णत्वास गेलेले नाही. युवक काँग्रेसने उपस्थित केलेला प्रश्न महत्त्वाचा आहे २०० कोटी निधीचा ठावठिकाणा काय? ➡️ तो निधी केंद्राकडून राज्याकडे आला का? ➡️ राज्य सरकारने तो महापालिकेला दिला का? ➡️ की तो कुठेतरी वळवण्यात आला? “पुणेकरांचा हक्काचा निधी हवेत विरला आहे का? की तो केवळ घोषणाबाजीपुरताच होता?” — असा गंभीर सवाल आबनावे यांनी केला. तीव्र आंदोलनाचा इशारा युवक काँग्रेसने स्पष्ट इशारा दिला आहे की, यापुढे पावसामुळे जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान झाले, तर त्याची जबाबदारी संपूर्णपणे प्रशासनावर असेल. उत्तर मिळाले नाही, तर युवक काँग्रेस तात्काळ रस्त्यावर उतरेल आणि तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

भीमनगर वासीयांची  फसवणूक होऊ देऊ नका; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे एसआरए अधिकाऱ्यांना आदेश

0
Newsworldmarathi Pune: एरंडवणे  येथील भीम नगर झोपडपट्टी चे एसआरए अंतर्गत पुनर्वसन योजनेत झोपडपट्टी धारकांची कोणतीही फसवणूक होऊ देऊ नका, गरज पडल्यास नागरिकांना अधिकच्या सुविधा द्याव्यात किंवा संपूर्ण स्कीम रद्द करावी असे आदेश उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण चे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांना दिले आहेत.  भीम नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत फसवणूक व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत,  मूळ जागेपासून नऊ किलोमीटर लांब सक्तीचे स्थलांतर अमान्य करत झोपडपट्टी धारकांनी या विरोधात गेल्या काही दिवसांपासून आंदोलन पुकारलेले आहे.  या संदर्भात त्यांनी नुकतेच मंत्री  चंद्रकांत  पाटील यांच्या कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा नेला होता.  या बिऱ्हाड मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज चंद्रकांत पाटील व झोपडपट्टी धारकांचे  प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक पार पडली.  या बैठकीत नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन कोणत्याही परिस्थितीत झोपडपट्टी धारकांची फसवणूक होणार नाही, याबाबत आपण सर्व ती काळजी घेऊ असे आश्वासन त्यांनी झोपडपट्टी धारकांना दिले. तसेच झोपडपट्टी धारकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून सदर पुनर्वसन प्रक्रियेमध्ये झोपडपट्टी धारकांना अधिक लाभ देण्यात यावा अथवा फसवणूक झाली असल्यास संपूर्ण योजना रद्द करावी असे आदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण चे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांना चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.   मंत्री चंद्रकांत  पाटील यांनी झोपडपट्टी धारकांच्या हिताचा विचार मांडल्याने आंदोलनात बळकटी प्राप्त झाली असून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत झोपडपट्टी धारकांना फसवणूक करण्याचा इरादा ठेवणाऱ्या बिल्डरांना यामुळे चाप लागणार असल्याची भावना यावेळी रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे, स्थानिक रहिवासी देविदास ओव्हाळ ,प्रभु सूनगर,  जावेद शेख दादू गायकवाड व सुनील डमरे यांनी व्यक्त केली.  दरम्यान, या प्रश्नावर अधिक चर्चा करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालनात शुक्रवारी  विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीत उपस्थित होणाऱ्या मुद्द्यांच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाईल असे देखील ठरवण्यात आले आहे.

अतिवृष्टीमुळे सिंहगड किल्ला काही काळासाठी पर्यटकांसाठी बंद

0
Newsworldmarathi Pune: सध्या परिसरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सिंहगड किल्ल्याच्या परिसरात दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिल्यानंतर वनविभागाने खबरदारीचा उपाय म्हणून काही काळासाठी सिंहगड किल्ल्यातील नागरिक व पर्यटकांचा प्रवेश बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वनविभागाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, गुरुवार दिनांक २९ मे रोजी होणाऱ्या आपत्ती निवारणाच्या शासकीय पाहणी दौऱ्याच्या अनुषंगाने किल्ला बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात कोणालाही किल्ल्यावर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. या बंदीमध्ये ट्रेकिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांचाही समावेश असून, किल्ल्यावर जाणाऱ्या सर्व मार्गांवर बंदी लागू करण्यात आली आहे. विशेषतः कल्याण दरवाजा, आतकरवाडी आणि इतर सर्व पायी मार्गांद्वारे प्रवेश थांबवण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वांनी सहकार्य करावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी. पावसामुळे किल्ल्याच्या काही भागात माती सरकण्याचा किंवा दरड कोसळण्याचा धोका असल्याने हा निर्णय तात्पुरत्या स्वरूपात घेतल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. किल्ला पुन्हा उघडण्याबाबतचा निर्णय हवामानाच्या स्थितीचा आढावा घेऊन लवकरच घेण्यात येणार आहे. तोपर्यंत नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

“बलात्कारासाठी माणसं पाठवण्याची धमकी”; आमदार परिणय फुकेंच्या भावजयीचे गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

Newsworldmarathi Nagapur: भाजपचे विधानपरिषद सदस्य परिणय फुके यांच्या कुटुंबातील वाद सार्वजनिक पटलावर आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. फुके यांच्या लहान भावाची पत्नी प्रिया फुके यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या सासरच्या मंडळींवर मानसिक छळ, बलात्काराच्या धमक्या, संपत्तीवरील वादातून घराबाहेर हाकलणे यांसारखे गंभीर आरोप केले. या आधी परिणय फुके यांच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल करत म्हटले होते की, प्रिया फुके नातवंडांना भेटू देत नाही आणि पैशांची मागणी करतेय. मात्र प्रिया फुके यांनी आज शिवसेना (ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी नेत्या रोहिणी खडसे यांच्या उपस्थितीत आपल्या बाजूने स्पष्ट भूमिका मांडली. प्रिया फुके यांनी सांगितले की, “माझं आणि संकेत फुके यांचं २०१२ मध्ये लग्न झालं. पण लग्नाआधीच त्यांच्या किडनीचे प्रत्यारोपण झाले होते, याबाबत आम्हाला माहिती दिली नव्हती. जेव्हा मला हे कळलं आणि मी विचारलं, तेव्हा मला धमकावण्यात आलं. ‘बोललीस तर बलात्कारासाठी माणसं पाठवू’ अशा घाणेरड्या धमक्या देण्यात आल्या.” पतीच्या मृत्यूनंतर देखील छळ सुरूच राहिला, असा दावा करत प्रिया म्हणाल्या, “रात्री १०.३० वाजता मला घराबाहेर काढण्यात आलं. अजूनही माझ्यावर नजर ठेवली जाते. घरी अज्ञात लोक येतात, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात.” राजकीय पाठिंबा मिळत असल्याचा दिलासा: राजकीय क्षेत्रातून सुषमा अंधारे आणि रोहिणी खडसे यांनी पुढे येत प्रिया फुके यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारवर दबाव टाकण्याची मागणी केली. “महिला आयोगाने वेळेवर दखल घेतली असती, तर हे प्रकरण इतकं वाढलं नसतं,” असे रोहिणी खडसे म्हणाल्या.

Jalgaon News : जळगावात महिलेनं भर रस्त्यात दिला बाळाला जन्म; रोहिणी खडसेंची सरकारवर आगपाखड

Newsworldmarathi Jalgaon : राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा पुन्हा एकदा उघड झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील बोरमळी गावात एका आदिवासी महिलेने, आरोग्य सुविधा न मिळाल्यामुळे भररस्त्यात बाळाला जन्म दिला. या प्रकाराने राज्यभर खळबळ उडवली असून सर्वच स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. खडसे म्हणाल्या, “कालपासून आपण मीडिया, सोशल मीडियात पाहतोय की भारताने जपानला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा टप्पा गाठला आहे. पण याच देशात, महाराष्ट्रात एक महिला रस्त्यावर बाळाला जन्म देते, कारण आरोग्य सेवा नाही! ही शोकांतिका आहे, विकासाचा फसवा चेहरा आहे.” “चार मंत्री, पण सेवा शून्य” त्या पुढे म्हणाल्या, “जळगाव जिल्ह्यात चार मंत्री असूनही आरोग्य सेवा सक्षम नाही. प्रसुतीकळा सुरू झाल्यावर महिला दवाखान्याकडे जात होती, पण मदतीअभावी तिला रस्त्यावरच बाळंत व्हावी लागली. ही घटना लाजिरवाणी आहे. प्रत्येक जबाबदार व्यक्तीने यावर आत्मपरीक्षण केलं पाहिजे.” सोशल मिडियावर खडसे यांची संतप्त पोस्ट: या घटनेबद्दल रोहिणी खडसेंनी सोशल मीडियावर लिहिलं, “एकीकडे आपण प्रगतीच्या गप्पा मारतो, पण दुसरीकडे आपल्या बहिणीला भर रस्त्यावर बाळंत होण्याची वेळ येते. अजून किती दिवस ही ‘प्रगत भारत’ म्हणवणारी जाहिरात खरी मानायची?” या घटनेने आरोग्य खात्याच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उभे केले आहेत. स्थानिक प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि राज्य सरकार यांच्यावर जबाबदारी निश्चित करून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत.

पुण्यात अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या भागाचे तत्काळ पंचनामे करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

0
Newsworldmarathi Pune : पुणे शहरात अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या भागाचे पंचनामे तत्काळ सुरु करावेत असे आदेश महसूल, कृषि, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, पशुसंवर्धन इत्यादी विभागांना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बारामती इंदापूर तालुक्यात 25 मे रोजी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागाची 26 मे रोजी पाहणी करुन तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले आहेत. जिल्ह्यात सुरु असलेल्या पर्जन्यमानाबाबत उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून वेळोवेळी परीस्थितीचा आढावा घ्यावा व घडलेल्या घटनांबाबत तात्काळ प्रतिसाद देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. यासाठी जिल्हास्तरावर आपत्ती नियंत्रण कक्ष 24 तास सुरु असून त्याचा हेल्पलाईन क्र. 020-26123371,26133522 व टोल फ्री क्रमांक 1077 असा असून या नियंत्रण कक्षाशी तालुका व गावपातळीवरील नागरिकांनी तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन डुडी यांनी केले आहे.