‘ना सिंदूर बचेगा.. ना सिंदूर लगानेवाली बचेगी’; राणा दाम्पत्याला ठार मारण्याची धमकी
Newsworldmarathi Mumbai: ना सिंदूर बचेगा.. ना सिंदूर लगानेवाली बचेगी, हमारे पास तुम्हारी पल पल की जानकारी है, तुम्हे और पुरे हिंदुस्तानको जल्द खतम कर देंगे.. अशा शबदात अज्ञातांनी अमरावती बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी माजी खासदार नवनीत राणा यांना धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे.
रविवारी मध्यरात्री उशिरा राणा दाम्पत्याला हे ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल्स करण्यात आले असून याप्रकरणी खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत राणा दाम्पत्याचा स्वीय सहाय्यक संदीप ससे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री पावणेदोन वाजण्याच्या दरम्यान राणा दाम्पत्याच्या अज्ञातांनी ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल्स करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. हे कॉल्स पाकिस्तानातील वेगवेगळ्या नंबरवरून आल्याची माहिती आहे.
आमदार रवी राणा यांना, ना सिंदूर बचेगा ना सिंदूर लगानेवाली बचेगी, हमारे पास तुम्हारी पलपल की जानकारी हैं, तुम्हे और पुरे हिंदुस्तानको जल्द खतम कर देंगे, तुम्हारी माँ है हम उसको खाते हैं, थोडे दिन में ही धमाका बजने वाला है, अशी जीवे मारण्याची धमकी दिली.
माजी खासदार नवनीत राणा यांना ‘ना सिंदूर बचेगा ना तू सिंदूर लगानेवाली बचेगी, हमारे पास तुम्हारी और तुम्हारे खानदान की पुरी जानकारी है, बहुत जल्दी हिंदू शेरनी दिखेगी नहीं, तुझे बहोत जल्द खतम कर देंगे, हिंदू शेरनी कुछ दिनों की मेहमान हैं, अशी धमकी दिली.
अमृतसरमध्ये विषारी दारू पिऊन १४ जणांचा मृत्यू, ६ जण गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल
Newsworldmarathi Amritsar: पंजाबमधील अमृतसरमधील मजिठा भागात विषारी दारू पिऊन १४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, ६ जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मजिठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अमृतसर पोलिसांनी सांगितले. पुढील कारवाई सुरू आहे.
ही घटना सोमवारी रात्री घडल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. रविवारी संध्याकाळी त्याच ठिकाणाहून दारू खरेदी केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सोमवारी सकाळीच काही मद्यपींचा मृत्यू झाला, परंतु हे नंतर कळविण्यात आले.
बनावट दारू पिण्यामुळे अनेक लोकांच्या मृत्यूबद्दल उपायुक्त साक्षी साहनी म्हणाल्या, “येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. काही लोकांनी विषारी दारू पिली आहे. आम्हाला रात्रीपासून माहिती मिळत होती. आमचे वैद्यकीय पथक लोकांची तपासणी करत आहे.
ज्यांनी दारू पिली आहे त्यांना रुग्णालयात दाखल केले जात आहे. गुन्हेगारांना पकडण्यात आले आहे. अशा घटना ५ गावांमध्ये उघडकीस आल्या आहेत. १४ जणांचा मृत्यू झाला आहे, ६ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.”, असं उपायुक्त साक्षी साहनी म्हणाल्या
बुद्ध पौर्णिमेनिमित्त मंगलमय वातावरणात रंगली धम्म पहाट
Newsworldmarathi Pune: बुद्धम् शरणम् गच्छामि…., साऱ्या विश्वाला बुद्ध हवा…, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले.. , साऱ्या विश्वाला बुद्ध हवा… अशा बुद्ध – धम्म गीतांनी आणि राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज वाबळे (माऊली) यांच्या प्रबोधनात्मक कीर्तनाच्या माध्यमातून बुद्ध – कबीर अन् तुकोबांच्या विचारांचा जागर करत बुद्ध पौर्णिमेची धम्म पहाट मंगलमय वातावरणात रंगली.
जगाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुध्द जयंती निमित्त विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेच्या वतीने ‘धम्मपहाट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुध्द्ध-भिम गीतांनी सजलेला हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, पुणे स्टेशन येथे संपन्न झाला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, महोत्सव समितीचे सरचिटणीस दिपक म्हस्के, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे, श्रामणेर, भंते यांच्यासह असंख्य बौद्ध अनुयायी उपस्थित होते. याप्रसंगी आंबेडकरी चळवळीतील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.
सामूहिक बुद्ध वंदना आणि त्रिशरण पंचशील पाठणाने धम्मपहाट कार्यक्रमाला सुरूवात झाली. पहाटेच्या हलक्याशा गारव्यात राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज वाबळे (माऊली) यांनी वारकरी आणि बुद्ध विचारांचे नाते उलगडले. वारकरी समाजाचा पाया तथागत गौतम बुद्धाच्या विचारातच असल्याचे सांगताना त्यांनी जगदगुरु संत तुकारांच्या अभंगाचा बुद्ध तत्वज्ञानाशी असलेला संबंध आपल्या ओघवत्या वाणीतून उपस्थितांना सांगितला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला न्याय आणि समतेचा संदेश देणारे बुद्ध तत्वज्ञान व वारकरी संप्रदायातील संताच्या विचारातून आल्याचेही वाबळे महाराजांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात “बोलो जय भीम….., सरे रात काळी ……., भारत भू के क्रांती सूर्य को प्रणाम.., भीमरायाने किमया ही केली.., माझी आजी म्हणायची..” अशा एकाहून एक सरस बुद्ध – भीम गीतांचे सादरीकरण सा.रे.ग.म.प. फेम प्रसिद्ध पार्श्वगायक कुणाल वराळे, सा.रे.ग.म. फेम अनुष्का शिकतोडे, पार्श्वगायिका स्वप्नजा इंगोले, गायक संविधान खरात, गायक स्वप्निल जाधव आणि त्यांच्या वाद्यवृंदाने सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
धम्म पहाट कार्यक्रमाबद्दल बोलताना आयोजक परशुराम वाडेकर म्हणाले, यंदा धम्मपहाट कार्यक्रमाचे 20 वे वर्षे आहे. जगभरात बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. त्याप्रमाणे पुणे शहारातही आम्ही धम्मपहाट कार्यक्रमाच्या माध्यमातून बुद्ध पौर्णिमा साजरी करीत आहोत. बुद्ध पौर्णिमेच्या काही तास आधी भारत – पाकिस्तान मधील युद्धबंदी चा निर्णय म्हणजे जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध हवा हाच संदेश देणार आहे.
धम्म पहाट कार्यक्रमाची सांगता पाहेलगाम हल्ल्या तील मृतांना आणि त्यानंतर पाकच्या गोळीबारात शाहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून आणि राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमाची निर्मिती आणि निवेदन दीपक म्हस्के यांचे होते.
राज्यात दहावीचा निकाल ९४.१० टक्के; मागील वर्षाच्या तुलनेत १.७१ टक्क्यांची घट
Newsworldmarathi Pune : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यंदाचा निकाल ९४.१० टक्के लागला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा निकालात १.७१ टक्क्यांनी घट झाली आहे. मागील वर्षीचा निकाल ९५.८१ टक्के होता. यंदा एकूण १५ लाख 6० हजार 15४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी १४ लाख ६८ हजार 58२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभागाने सर्वाधिक ९९.०२ टक्के निकालाची टक्केवारी नोंदवली आहे, तर नागपूर विभाग सर्वात खालोठा म्हणजेच ९२.४९ टक्के निकालासह अंतिम स्थानी आहे.
यंदाही मुलींनी निकालात आघाडी घेतली आहे. मुलींचा निकाल ९५.५४ टक्के, तर मुलांचा निकाल ९९.७४ टक्के इतका आहे. राज्यभरातून ५८२९ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून, २८ शाळांचा निकाल शून्य टक्के आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे गुण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहेत. त्यानंतर गुणपत्रिका शाळांमार्फत वितरित केल्या जातील.
निकाल जाहीर झाल्यानंतर आता अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार असून, यंदा संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे.
पुण्यात व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवून तरुणाची आत्महत्या; स्वतःवर चाकूने केले वार
Newsworldmarathi Pune : पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणाने चाकूने भोसकून घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वैयक्तिक ताणतणाव तसेच नैराश्याच्या गर्तेत सापडल्याने त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्या तरुणावर गेल्या वर्षभरापासून उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सोमवारी पहाटेच्या सुमारास वानवडीतील लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात (एएफएमसी) ही घटना घडली आहे. तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावरून पालकांना यासंदर्भात माहिती दिल्याचे उघडकीस आले आहे. उत्कर्ष महादेव शिंगणे (वय-२०, रा. भाग्यनगर, बीड, मूळ रा. भोपाळ) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्कर्ष मूळचा बीडचा रहिवासी असून तो मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होता. आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेसाठी तो गेल्या आठवड्यात पुण्यात आला होता. वानवडीतील लष्करी महाविद्यालयाच्या मैदानावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सोमवारी पहाटे एएफएमसीच्या वसतिगृहातील प्रसाधनगृहात त्याने स्वतःवर चाकूने वार करून घेत आत्महत्या केली. उत्कर्षने आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावर त्याबाबतची माहितीचे स्टेटस ठेवले होते. गेल्या वर्षभरापासून तो नैराश्यात होता. त्याच्यावर मानसोपचार सुरू होते, अशी माहिती त्याच्याबरोबर असलेल्या सहकाऱ्यांनी दिली. वानवडी पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
परळीतील बौद्ध कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणींची शासकीय सेवेत भरती; घरकाम करणाऱ्या आईचे स्वप्न झाले साकार
Newsworldmarathi Parali: परळी शहरातील शिवाजीनगर भागातील एक सामान्य बौद्ध कुटुंब – पण मोठ्या जिद्दीचे. क्रांतीसूर्य महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श ठेवत शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या तीन सख्ख्या बहिणींनी एकाच वेळी शासकीय नोकरी मिळवून संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मोठ्या कष्टाने त्यांचे शिक्षण घडवणाऱ्या त्यांच्या आईवडिलांनी आज खऱ्या अर्थाने समाधानाचा श्वास घेतला आहे.
कदम कुटुंबातील मनिषा विजय कदम या ४० वर्षीय महिलेला चार अपत्यं आहेत. वंशाला दिवा पाहिजे या सामाजिक मानसिकतेमुळे तीन मुलींनंतर मुलगा झाल्यानंतर घरात आर्थिक ओढाताण सुरू झाली. नवऱ्याच्या उत्पन्नाची तुटवडा असल्यामुळे मुलींचं शिक्षण थांबू नये म्हणून मनिषाताईंनी औष्णीक वीजनिर्मिती केंद्र वसाहतीत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या घरी धुणी, भांडी आणि स्वयंपाकाचं काम करत आपल्या मुलींचं शिक्षण सुरू ठेवलं. अवघ्या 10 बाय 25 फुटाच्या घरात राहणाऱ्या या कुटुंबात शिकण्याची जिद्द मात्र मोठी होती.
मोठी मुलगी दिक्षा हिने दहावीत उत्तम गुण मिळवल्यानंतर तिला आयटीआय आणि इंजिनिअरिंगपर्यंत शिकवलं गेलं. ती सध्या मुंबई मेट्रोत 2019 पासून कार्यरत आहे. सोनाली आणि समिक्षा या दोघींचं प्राथमिक शिक्षण परळीत झालं. त्यानंतर त्यांना लातूर जिल्ह्यातील बावची येथील अनुसूचित जाती नवबौद्ध मुलींच्या निवासी शाळेत दाखल करण्यात आलं. तिथं त्यांनी मेहनत घेऊन आयटीआयमध्ये इलेक्ट्रिशियन कोर्स पूर्ण केला.
या तिन्ही बहिणींनी महापारेषण विभागात नुकत्याच झालेल्या भरतीत भाग घेतला होता. त्या भरतीचा निकाल गेल्या आठवड्यात लागला असून, त्यामध्ये दिक्षाची निवड टेक्निशियन-२ व विद्युत सहायक पदासाठी, तर सोनाली व समिक्षा यांची निवड विद्युत सहायक पदासाठी झाली आहे.
शिक्षणासाठी आईने केलेल्या कष्टाचे चीज झाल्याने मनिषा कदम यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत आहे. दिक्षा ही बावची येथील आश्रमशाळेत शिकली होती, तर सोनाली व समिक्षा या शिवछत्रपती विद्यालयाच्या विद्यार्थिनी होत्या. त्यांच्या यशामुळे त्यांच्या शिक्षकांनीही आनंद व्यक्त केला आहे.
Devendra Fadnavis : शरद पवारांची ‘ती’ मागणी फडणवीसांकडून मान्य, सहकारी संस्थांसाठी केली मोठी घोषणा
Newsworldmarathi Mumbai: सहकार क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम सहकार कायद्यातून झाले पाहिजे. त्यासाठी कायद्यात प्रत्येक क्षेत्राशी निगडित नवीन ‘ प्रकरणे ‘ दाखल करावी लागणार आहेत. सध्या प्रचलित असलेल्या सहकार कायद्यात कालानुरूप बदल करण्याची गरज आहे. त्यासाठी सहकार कायद्यातील आवश्यक बदलांसाठी समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात दख्खनचा उठाव आणि सहकाराची मुहूर्तमेढ, शतकोत्तर सुवर्ण स्मृतिदिन 150 वर्ष, आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 निमित्त ‘ सहकाराचे सक्षमीकरण आणि राज्य शासनाचे धोरण’ या परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संबोधित करताना मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोअर बँकिंग प्रणालीसह आधुनिक तंत्रज्ञानयुक्त बँकिंग प्रणाली सहकारी बँकांनी अंगीकारली. ग्राहकपयोगी सर्व सेवा सहकारी बँका देत आहेत. यामुळे ‘ फिस्कल कन्सोलिडेशन’ च्या कालावधीत सहकारी बँका जगल्या आहेत.
या काळातही सहकारी बँकांनी उत्तम काम केले आहे. पुणे जिल्ह्यातील सुपे येथे 12 मे 1875 रोजी सावकारांविरोधात झालेला उठाव म्हणजे ही सहकार क्षेत्राची सुरुवात ठरली. अशा या ऐतिहासिक घटनेला आज दीडशे वर्ष पूर्ण झाली आहेत.
सहकारी साखर कारखाने साखर उत्पादनासोबत उपपदार्थही बनवीत आहेत. यामुळे जागतिक स्पर्धेत साखर कारखाने टिकत आहेत. केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत, इथेनॉल धोरण यामध्ये सातत्याने बदल केले आहेत. शेतकऱ्यांचे कारखाने शेतकऱ्यांकडेच राहील, अशी राज्य शासनाची भूमिका आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी उपपदार्थांच्या निर्मितीकडेही वळले पाहिजे.
सहकारी तत्त्वावर सुरू असलेल्या सूतगिरण्यांना विजेचे दर हे जागतिक स्पर्धेत टिकविण्यासाठी अडचणीचे ठरत असल्याच्या तक्रारी असतात. शासन विजेबाबत अनुदानही देत असते. त्यामुळे सर्व सुतगिरण्या सौरऊर्जेवर नेण्यात येत आहे. त्यामुळे सुतगिरण्यांची विजेची सर्वात मोठी अडचण दूर होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
10th SSC Result : विद्यार्थींची धाकधूक वाढली…! आज दहावीचा निकाल, कुठे अन् कसा पाहाल रिझल्ट?
Newsworldmarathi Pune: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतलेल्या इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेचा निकाल मंगळवार, १३ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे.
विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून सविस्तर निकाल पाहता येईल. तसेच निकालाच्या माहितीची प्रत (प्रिंट आऊट) घेता येणार असल्याचे राज्य मंडळाने प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षी २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ दरम्यान दहावीच्या परीक्षा घेतल्या होत्या. या परिक्षेला राज्यातील १६.११ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये ८.६ लाख मुलं, ७.४७ लाख मुली आणि १९ ट्रान्सजेंडर यांचा समावेश होता.
यंदाच्या परीक्षेला सर्व नऊ विभागीय मंडळांमार्फत १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. बारावीप्रमाणे दहावीचीदेखील परीक्षा आणि निकाल यंदा लवकर जाहीर होत आहे. दहावीच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे.
जून-जुलै २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार व खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १५ मेपासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे जाहीर केले जाणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली.
येथे पहा निकाल
results.digilocker.gov.in
sscresult.
mahahsscboard.in
sscresult.mkcl.org
कसा पाहाल निकाल
mahahsscboard.in किंवा mahresult.nic.in या वेबसाईटवर जा.
होम पेजवर ‘महाराष्ट्र दहावी किंवा दहावीचा निकाल 2025’ लिंकवर क्लिक करा.
त्यानंतर लॉगिन तपशील व्यवस्थित भरा.
दहावीचा निकाल गुणांसह तुम्हाला पाहायला मिळेल.
निकाल डाऊनलोड करून ठेवा.
पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांचे हित जपले जाईल : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची ग्वाही
Newsworldmarathi Pune: पुरंदर विमानतळासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु असला, तरी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी आणि त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी योग्य प्रकारे कार्यरत आहे. देशात नवीन विमानतळ उभारणीसाठी राज्य सरकारच भूसंपादनाची जबाबदारी पार पाडते. पुरंदर विमानतळासाठी प्रत्येक गावात स्वतंत्र भूसंपादन अधिकारी नेमले गेले असून, कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ त्यांनी दिली.
लोहगाव विमानतळासमोरील एरो मॉल येथे ‘ग्लोबल स्कूल ऑफ एव्हिएशन’ या अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला ग्लोबल फ्लाईट हँडलिंग सर्व्हिसेसच्या व्यवस्थापकीय सारिकाकुमारी उपस्थित होत्या.
‘ग्लोबल स्कूल ऑफ एव्हिएशन’ सुरू झाल्यामुळे विमानसेवा क्षेत्रात स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. भविष्यात विमान कंपन्यांना प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळाची मोठी गरज भासणार आहे. याच पार्श्वभूमीवर, देशात विविध विमान कंपन्यांनी नवीन १,३०० विमानांची नोंदणी केली असून, लवकरच ती प्रत्यक्ष सेवेत दाखल होणार आहेत.
या प्रशिक्षण केंद्रामुळे पुणे विमानसेवा क्षेत्राचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू बनणार असून, तरुणांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली उद्या दुपारी 1 वाजता लागणार निकाल; निकाल पाहण्यासाठी वाचा सविस्तर बातमी
Newsworldmarathi Pune: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल अखेर उद्या जाहीर होणार आहे. निकाल मंगळवारी, दुपारी 1 वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार असून, विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पाहता येईल. काही दिवसांपूर्वी बारावीचा निकाल जाहीर झाला होता आणि त्यानंतरच दहावीच्या विद्यार्थ्यांमध्येही उत्सुकता शिगेला पोहोचली होती. ही प्रतीक्षा आता संपली असून, बोर्डाने निकालाची अधिकृत घोषणा केली आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमधून मूळ गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यानंतर आपल्या शाळांशी संपर्क साधावा, असेही बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, निकालानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी होणारी धावपळ आणि पालक-विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यावर्षी अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया केंद्रीकृत ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने घेतला असून, एक प्रसिद्धीपत्रक काढून त्याबाबत माहिती दिली आहे.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना विविध कॉलेजांत प्रवेशासाठी फेरफटका मारण्याची गरज भासणार नाही. तसेच प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुलभता सुनिश्चित होणार आहे. विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या आणि अकरावी प्रवेशासाठी ठरवलेल्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी अपडेट्स पाहावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
कुठे पाहाल निकाल?
https://results.digilocker.gov.in
https://sscresult.mahahsscboard.in
http://sscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org

