India Pakistan War : भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये किती दहशतवादी मारले, हल्ला कुठे केला, भारताचे किती नुकसान झाले, जाणून घ्या सविस्तर…

Newsworldmarathi Delhi : India Pakistan War : पाकिस्तानसोबतच्या तीन दिवसांच्या युद्धात भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाने महत्त्वाची भूमिका बजावली. दोन्ही सैन्यांनी पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. दरम्यान, भारतीय सैन्याने किती दहशतवादी मारले आहेत आणि भारताचे किती नुकसान झाले आहे ते आपण जाणून घेणार आहोत…. किती दहशतवादी तळ झाले उद्ध्वस्त? भारतीय लष्कराचे लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले की, पाकिस्तानमध्ये ९ छावण्या उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. आमच्या गुप्तचर संस्थांनीही याची पुष्टी केली आहे. त्यापैकी काही पीओकेमध्ये होते. काही पाकिस्तानच्या पंजाबमध्ये होते, ज्यापैकी मुरीदके हे लष्कराचे मुख्यालय होते, जे वर्षानुवर्षे दहशतवादी प्रशिक्षण देत होते. जिथे कसाब आणि हेडलीनेही प्रशिक्षण घेतले. हे सर्व नष्ट झाले आहे. किती दहशतवादी मारले? पहलगाम हल्ल्यानंतर भारतात संताप वाढला होता, ज्याचा बदला घेण्यासाठी भारताने कारवाई केली. भारतीय लष्कराचे लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले की, १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत. दहशतवाद्यांचा कणा मोडला गेला आहे. त्याच वेळी, जर दहशतवाद्यांनी पुन्हा काहीही करण्याचे धाडस केले तर त्यांना पुन्हा नरकात पाठवले जाईल, असा इशारा लष्कराकडून देण्यात आला आहे. पाकिस्तानी सैन्याचे किती सैनिक मारले? भारतीय सैन्याने म्हटले आहे की, प्रत्युत्तरात्मक कारवाई करून शत्रू देशाला योग्य उत्तर देण्यात आले आहे. यादरम्यान, पाकिस्तानी सैन्याचे ३५ ते ४० सैनिक मारले गेले आहेत. त्याच वेळी, सैन्याने असेही म्हटले की त्यांचे काम दहशतवादाचा खात्मा करणे आहे आणि लष्करी प्रतिष्ठानांना नुकसान पोहोचवू नये. भारताचे किती नुकसान झाले? भारतीय हवाई दलाचे महासंचालक एअर ऑपरेशन्स एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले की, ७ मे रोजी सकाळी नऊ दहशतवादी छावण्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर, भारतीय लष्करी प्रतिष्ठाने आणि नागरी क्षेत्रांना लक्ष्य केल्यानंतर भारतीय सशस्त्र दलांनी त्वरित आणि नियोजनबद्ध पद्धतीने प्रत्युत्तर दिले. त्याच वेळी, पाकिस्तानने पाठवलेल्या ड्रोन आणि इतर हवाई साधनांद्वारे हवाई घुसखोरी केली जात होती, परंतु आमच्या मजबूत हवाई संरक्षणामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात येण्यापासून रोखले गेले. ते म्हणाले कि, ‘७ मे रोजी आमच्यावर यूएव्ही आणि लहान ड्रोनने हल्ला केला. हे मोठ्या संख्येने आपल्या नागरी भागात, आपल्या लष्करी प्रतिष्ठानांमध्ये आले आणि हे सर्व यशस्वीरित्या थांबवण्यात आले. त्यापैकी काही जमिनीवर पडले असले तरी त्यांनी जास्त नुकसान केले नाही. त्यांनी आमच्या लष्करी प्रतिष्ठानांना आणि नागरी क्षेत्रांना लक्ष्य केल्यामुळे, आम्हाला प्रत्युत्तर द्यावे लागले. आमचा प्रतिसाद जलद आणि संतुलित होता, आम्ही लाहोर आणि गुजरांवाला जवळील त्यांच्या रडार प्रतिष्ठानांवर हल्ला केला. आम्हाला हे दाखवायचे होते की आम्ही तयार आहोत आणि तरीही आम्हाला पुढे जायचे नव्हते, आमची लढाई दहशतवाद्यांशी होती, पाकिस्तानी लष्करी पायाभूत सुविधांविरुद्ध नाही. पाकिस्तानने भारतीय लढाऊ विमान पाडले का? एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले, ‘या कारवायांदरम्यान नागरी विमानांना परवानगी देऊन पाकिस्तानने असंवेदनशीलपणे वागले आहे. कोणत्याही नागरी विमानाचे नुकसान होणार नाही याची खात्री करण्यासाठी आम्हाला अत्यंत सावधगिरी बाळगावी लागली, काही सामरिक नुकसान सहन करावे लागले. परदेशी माध्यमांमध्ये भारतीय लढाऊ विमानांच्या नुकसानीच्या वृत्तांबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘आपण युद्धाच्या परिस्थितीत आहोत आणि नुकसान हे युद्धाचा एक भाग आहे. मी एवढेच म्हणू शकतो की आम्ही आमचे निवडलेले लक्ष्य साध्य केले आहे आणि आमचे सर्व वैमानिक परतले आहेत. कोणते पाकिस्तानी हवाई तळ उद्ध्वस्त झाले? स्कार्दू एअरबेस चकलाला एअरबेस मुरीद एअरबेस सियालकोट एअरबेस पसरूर एअरबेस सरगोधा एअरबेस चुनलियन एअरबेस रफीकी एअरबेस रहिमयार खान हवाई तळ जेकबाबाद एअरबेस सुक्कुर एअरबेस भोलारी एअरबेस भारताने अवघ्या ७२ तासांत विनाश घडवून आणला आहे, ज्यामुळे पाकिस्तानचा पाया हादरला आहे आणि त्याला युद्धबंदीसाठी पुढे यावे लागले आहे. त्याच वेळी, भारतीय लष्कराने हे स्पष्ट केले आहे की ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. मुनीर आणि त्यांच्या सैन्याने पुन्हा एकदा युद्धबंदीचे उल्लंघन केले तेव्हा भारतीय सैन्य आणि हवाई दलाने ही घोषणा केली. ऑपरेशन सिंदूर संपले का? भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पश्चिम सीमेवरील लष्करी कमांडरसोबत बैठक घेतली आहे. बैठकीनंतर, लष्करप्रमुखांनी लष्करी कमांडर्सना प्रत्युत्तरात्मक कारवाई करण्याची मोकळीक दिली आहे. याचा अर्थ असा की जर पाकिस्तानने आता युद्धबंदीचा भंग केला तर त्याला पुन्हा एकदा अकल्पनीय शिक्षा दिली जाईल.

सद्यस्थिती पाहता रक्तदान ही एक व्यापक चळवळ व्हायला हवी : राजेश शहा.

0
Newsworldmarathi Pune : धी पूना गुजराती केळवणी मंडळ, श्री पूना गुजराती बंधू समाज आणि महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील प्रतिष्ठित हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयात रक्तदान आणि डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्ष राजेश शहा व पूना हॉस्पिटल मॅनेजमेंटचे ट्रस्टी श्री. सुजयभाई शहा यांच्या शुभहस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना संस्थेचे चेअरमन राजेश शहा यांनी ‘सद्याची युद्धमय परिस्थिती पाहता आतापासूनच देशभरातून मोठ्या प्रमाणात रक्त संकलनाची व्यापक मोहीम हाती घेणे गरजेचे ठरते.’ असे मत व्यक्त केले. तसेच, एच व्ही देसाई डोळ्यांचे हॉस्पिटल द्वारे आजपर्यंत हजारो नागरिकांच्या डोळ्यांवर मोतीबिंदू, काचबिंदू या शस्त्रक्रिया मोफत केल्या गेल्या असून हे कार्य अव्याहतपणे चालूच राहील अशी ग्वाही राजेश शहा यांनी दिली. समाजातर्फे वर्षभर सुरू असलेल्या रक्तदान शिबिरांद्वारे जवळपास १००० रक्तदात्यांचे रक्त संकलन केले गेले. यामध्ये पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या राकेश जैन रक्तपेढीने आपली भूमिका बजावली. तर देसाई हॉस्पिटलच्या माध्यमातून आज नागरिकांचे डोळे तपासून त्यांना चष्म्यांचेही मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेत अनेकांचा हातभार लाभला. नैनेश नंदू, राजेंद्र शहा, हर्रैश शहा हेमंत मणियार, विनोद देडिया, संदीप शहा, हेमंत मेहता, संजय मेहता, केतन कापडिया, दिपक महैता पंकज देडिया आणि श्रीमती कृती नागरेचा यांनी या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अविरत श्रम घेतले. या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. ऋषी दुबे, महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजनेचे विकास मुळीक, विद्यार्थी तसेच संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री. संदीप देशपांडे यांनी विशेष मेहनत घेतली. महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा विभागातील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी स्वतःही रक्तदान करून इतरांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहन दिले. रक्तदान शिबिराचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या रक्तदान शिबिराची सुरुवात डॉ. ऋषी दुबे आणि श्री. संदीप देशपांडे यांच्या रक्तदानाने झाली. या शिबिरात एकूण ६७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर सुमारे २५४ एवढ्या नागरिकांनी डोळे तपासून जवळपास १०० जणांनी चष्माही मिळविला. तसेच अनेक गरजूंनी आपल्या डोळ्यावरील अत्यावश्यक व खर्चिक असणाऱ्या शस्त्रक्रिया मोफत करून मिळण्याचा मार्ग मोकळा करून घेतला.

मोठी बातमी…! पुण्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकरांवर गुन्हा दाखल

0
Newsworldmarathi Pune: पुण्यातील राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दिपक मानकर यांच्यावर बनावट कागदपत्रे सादर करुन पोलीसांची दिशाभूल केल्याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचा माजी पदाधिकारी असलेल्या शांतनु कुकडेला पुणे पोलीसांनी काही महिलांच्या तक्रारीनंतर बलात्कार प्रकरणात अटक केली आहे. या प्रकरणात अनेकांचा सहभाग आढळून आल्याने पोलीसांनी शांतनु कुकडेच्या बॅंक खात्यांची पडताळणी केली होते. त्यावेळी शंतनू कुकडे आणि दिपक मानकर यांच्यात एक कोटी रुपयांची देवाणघेवाण झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी याबाबत दिपक मानकर यांना चौकशीला बोलावलं असता त्यांनी शंतनू कुकडे सोबत कोणतेही आर्थिक व्यवहार नसल्याचा दावा करत काही कागदपत्रे पोलीसांसमोर सादर केली होती. पोलीसांनी दिपक मानकर यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची सत्यता तपासली असता ती कागदपत्रे बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर दिपक मानकरच्या विरोधात बनावट कागदपत्रे सादर करुन पोलीसांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना सुगीचे दिवस येणार: राज्यसरकार ५० हजार देणार?

Newsworldmarathi Mumbai : Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमध्ये सरकार दरमहा दीड हजार रुपये देते. ज्या बहिणींना उद्योग सुरु करावयाचा असेल आणि भांडवल नसेल तर या योजनेच्या हमीवर लघू उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजेतून वळता करुन घेण्याचा विचार आहे, असे प्रतिपादन राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. चव्हाणवाडी (ता. मुखेड) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यातीने पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी अजित पवार बोलत होते. पुढे बोलताना म्हणाले, राज्यातील लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपये शासनाच्यावतीने दिले जातात. या पोटी ४५ हजार कोटी रुपये खर्च होतात. एखाद्या महिन्यात थोडासा विलंब झाला तरी विरोधक अफवा पसरवतात. बहिणींनी या अफवांवर विश्वास ठेवू नये, असंही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. खऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत राहणार आणि योजना बंद होणार नाही. दरमहा दीड हजार रुपये द्यायचेच आहेत. परंतु त्याबरोबरच जर काही बहिणींना लघु उद्योग सुरु करायची इच्छा असेल परंतु त्यांच्याकडे भांडवल नसेल आणि बँकाचे कर्ज घेण्यासाठी हमीची आवश्यकता असेल, तर लाडकी बहीण योजनेच्या दीड हजार रुपये महिना या रकमेची हमी देऊन ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने शासनाचे प्रयत्न सुरु आहे, असं अजित पवारांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी जे वीजबील येते ते शासनाच्यावतीने महावितरणकडे भरले जाते. त्यापोटी महिना २० हजार कोटी रुपयांचा खर्च आहे. तो आटोक्यात आणायचा; परंतु शेतकऱ्यांना दिवसा सुद्धा वीज उपलब्ध झाली पाहिजे, यासाठी सोलार पॅनेल बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे यापुढे लवकरच शेतकऱ्यांना हक्क व हमीची वीज उपलब्ध होईल. असं देखील यावेळी अजित पवार म्हणाले.

५ हजार शहाळ्यांमध्ये ‘दगडूशेठ’ गणपती बाप्पा विराजमान

0
Newsworldmarathi Pune : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला. शिव-पार्वतीच्या घरी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी दुर्मती राक्षसाच्या वधार्थ झालेला हा अवतार आहे. वैशाख शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्यावेळी गणेश जन्माची पूजा व अभिषेक झाला. तसेच मंदिरामध्ये गणेशयाग देखील करण्यात आला वैशाख वणव्यापासून तमाम भारतीयांचे रक्षण व्हावे, दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष, शेतकऱ्यांच्या समस्या दूर होण्यासोबत आरोग्यसंपन्न भारताकरीता दगडूशेठ गणपती बाप्पांसमोर प्रार्थना करीत शहाळे महोत्सवात ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य बाप्पाला दाखविण्यात आला. श्री गणेशांचे विविध लीला स्वरुपात अनेक अवतार पाताळ, पृथ्वी व स्वर्गलोकात झाल्याचे आपल्या पुराणात सापडते. त्यापैकी एक म्हणजे पुष्टिपती विनायक अवतार. पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात हा शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला होता.दुर्मती राक्षसाने पृथ्वी-पाताळ-स्वर्गलोक जिंकून सर्वत्र विध्वंस चालविलेला होता त्याचा नित्पात करण्याकरिता पार्वती मातेला दिलेल्या वरानुसार भगवान श्री गणेशांनी विनायक अवतारामध्ये प्रगट होऊन दुर्मती राक्षसाचा वध केला त्यामुळे वैशाख शुद्ध पौर्णिमेचा दिवस हा पुष्टिपती विनायक जयंती म्हणून साजरा केला जातो गाभाऱ्यासह सभामंडपात शहाळ्यांची व वृक्षांची नयनरम्य आरास करण्यात आली होती.पहाटे गायिका सानिया पाटणकर आणि सहकाऱ्यांनी आपली गायन सेवा गणपती चरणी अर्पण केली श्रीगणेश पुराण व मुद्गल पुराण या ग्रंथामध्ये या अवताराचा संदर्भ आढळतो. या अवतारामध्ये पुष्टी ही भगवान विष्णुंच्या घरी त्याची मुलगी म्हणून जन्म घेते व श्री गणेश हे विनायक स्वरुपात शंकर-पार्वती यांच्या घरी जन्म घेतात. वैशाख पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री गणेशाचा पुष्टिपती विनायक हा अवतार झाला होता. भारतीय संस्कृतीमध्ये वैशाख पौर्णिमेला महत्त्वाचे स्थान आहे. उत्तर भारतामध्ये वैशाखी हा सण याच दिवशी विशेषत्वाने साजरा केला जातो. वैशाख वणव्यापासून देशवासियांचे रक्षण व्हावे. दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष शेतक-यांच्या समस्या गणरायाच्या कृपेने निर्विघ्न व्हाव्यात, या सद्भावनेने शहाळ्यांचा महानैवेद्य दरवर्षी अर्पण करण्यात येतो. तसेच, दुस-या दिवशी ससून रुग्णालयातील रुग्णांना शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार आहे, असेही ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Newsworldmarathi Sindhudurg : छत्रपती शिवाजी महाराज महान योद्धा होते. त्यांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने विक्रमी वेळेत शिवरायांच्या कर्तृत्वास साजेसा भव्य पुतळा उभारला असून महाराजांचा हा पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक ठरणार असल्याचे, प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन मुख्यमंत्र्यांनी घेऊन व पूजन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री नितेश राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, खासदार नारायण राणे, आमदार सर्वश्री दीपक केसरकर, रवींद्र चव्हाण, निलेश राणे, निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक दिवे, प्रभारी पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता किणी आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाने विक्रमी वेळेत पुतळ्याचे काम पूर्ण करुन महाराजांच्या कर्तृत्वास साजेसा भव्य पुतळा उभारला आहे. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच यंत्रणांनी अतिशय वेगाने काम केले आहे. ज्येष्ठ मूर्तीकार राम सुतारांनी कमी वेळेत आकर्षक आणि देखणा पुतळा साकारला आहे. आय.आय.टी.,जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे देखील पुतळा उभारणीत मोलाचे योगदान लाभले असून मी सर्वांचे अभिनंदन करतो. पुतळा उभारताना कोकणातील वेगवान वारे व वादळांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. याची उंची पाहता महाराजांचा हा देशातील बहुदा सर्वात उंच पुतळा ठरेल. पुतळ्याची भव्यता लक्षात घेता पुतळ्याच्या आसपासचा परिसर विकसित करुन पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. कोकणच्या विकासाला नेहमीच प्राधान्य दिलेले आहे. पर्यटनाच्या दृष्टीने कोकणचा अधिकाधिक विकास करणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

छत्तीसगडमध्ये भीषण अपघात; १३ जणांचा जागीच मृत्यू; अनेक जण जखमी

Newsworldmarathi Chhatisgad: छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये रविवारी रात्री उशिरा एक हृदयद्रावक अपघात घडला आहे. रायपूर-बालोदाबाजार रस्त्यावरील सारागावजवळ एका वेगवान ट्रक आणि ट्रेलरमध्ये भीषण टक्कर झाली. हा अपघात इतका भीषण होता की १३ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ९ महिला, २ मुली, एक किशोरी आणि ६ महिन्यांच्या एका निष्पाप बाळाचा समावेश आहे. अपघातानंतर लगेचच जखमींना डॉ. बी. आर. येथे नेण्यात आले. त्यांना आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल आणि खरसोरा कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. छठी समारंभातून परतत असताना अपघात झाला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेलरमधील सर्व लोक चटौड गावातील रहिवासी पुनीत साहू यांचे नातेवाईक होते, जे एका नवजात बाळाच्या छठी समारंभात सहभागी होऊन परतत होते. यावेळी हा भयानक अपघात घडला. पोलिस अधीक्षक लाल उम्मेद सिंह यांनी अपघाताची पुष्टी केली आणि सांगितले की, ट्रक खूप वेगाने जात होता आणि टक्कर झाली तेव्हा वाहन नियंत्रणाबाहेर गेले. जखमींची प्रकृती जाणून घेण्यासाठी रायपूरचे जिल्हाधिकारी डॉ. गौरव सिंह आणि आमदार गुरु खुशवंत साहेब रात्री उशिरा रुग्णालयात पोहोचले. उपचारात कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही, असे आश्वासन आमदारांनी दिले. प्रशासन पूर्णपणे सक्रिय आहे. या अपघातामुळे राज्यातील रस्ते सुरक्षेच्या स्थितीवर गंभीर प्रश्न उपस्थित होतात. आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये छत्तीसगडमध्ये १४,८५३ रस्ते अपघात झाले, ज्यात ६,७५२ लोकांचा मृत्यू झाला आणि १२,५७३ लोक जखमी झाले.

भारत-पाकिस्तान तणावानंतर IPL 2025 लवकरच पुन्हा सुरू होणार; १६ किंवा १७ मेपासून सामने

Newsworldmarathi Mumbai : भारत आणि पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या तणावामुळे काही काळासाठी स्थगित करण्यात आलेली इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 स्पर्धा लवकरच पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. सीमेवरील युद्धजन्य परिस्थितीमुळे बीसीसीआयने आयपीएलचे सामने एक आठवड्याकरता थांबवले होते. मात्र, दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर आता आयपीएल पुन्हा सुरू करण्याचे संकेत मिळाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, IPL पुन्हा १६ किंवा १७ मेपासून सुरू होऊ शकते. उर्वरित सामने चार वेगवेगळ्या ठिकाणी खेळवले जाण्याची शक्यता आहे. पुन्हा सुरू होणाऱ्या स्पर्धेतील पहिला सामना लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात लखनऊच्या इकाना स्टेडियममध्ये खेळवला जाण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने सर्व फ्रँचायझी, खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि आयोजक यांना आयपीएल पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. यानंतर सर्व संघांनी आपल्या खेळाडूंना परत बोलावण्यास सुरुवात केली आहे. स्पर्धा स्थगित झाल्याने चाहत्यांमध्ये काहीशी निराशा होती. मात्र आता IPL पुन्हा सुरू होणार असल्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

इयत्ता 11 वीच्या प्रवेश शुल्कात कपात ; विद्यापीठाने 229 महाविद्यालयांवर कारवाई

Newsworldmarathi Mumbai : राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रियेत यंदा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाने येत्या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीकृत ऑनलाइन पद्धतीने राबवण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांकडून आकारल्या जाणाऱ्या नोंदणी शुल्कात कपात करण्यात आली असून, आता सर्व विभागांमध्ये समानपणे केवळ 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. यापूर्वी मुंबईसाठी 225 रुपये आणि इतर विभागांसाठी 125 रुपये शुल्क आकारले जात होते. दरम्यान, मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली आहे. मात्र, नॅक मूल्यांकन व एनबीएसाठी आवश्यक पूर्तता तसेच महाविद्यालय विकास समिती (सीडीसी) स्थापन न केल्यामुळे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या 229 महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. यासोबतच या महाविद्यालयांवर 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठ प्रशासनाने संबंधित महाविद्यालयांना वेळोवेळी परिपत्रके, सूचना आणि स्मरणपत्रे देऊनही पूर्तता न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. या कारवाईबाबत व्यवस्थापन परिषदेने निर्णय घेतला असून, संबंधित महाविद्यालयांची यादी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर [http://mu.ac.in](http://mu.ac.in) उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कांद्याच्या दरात मोठी घसरण; शेतकरी आर्थिक संकटात

0
Newsworldmarathi Nashik : अवकाळी पाऊस आणि गारपीटामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांपुढे आता कांद्याच्या दराचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून, काही बाजारांमध्ये कांद्याचा दर थेट 900 ते 1,100 रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही भरून निघत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून कांदा 1,000 रुपये क्विंटलपर्यंत खाली आला आहे. देशांतर्गत आवक वाढल्याने आणि निर्यात घटल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे पाकिस्तानकडे होणारी निर्यात थांबवण्यात आली. त्याचबरोबर बांगलादेशात 30 टक्क्यांनी जास्त कांद्याचं उत्पादन झालं असून, तिकडील राजकीय अस्थिरतेमुळे निर्यातही कमी झाली आहे. या सगळ्याचा थेट परिणाम बाजारभावावर झाला आहे. नाशिकमधील बाजार समित्यांमध्ये कांद्याला मिळणारे दर घसरले असून, लासलगावमध्ये उन्हाळी कांद्याला 1,151 रुपये, नाशिकमध्ये 900 रुपये, येवल्यात केवळ 851 रुपये, तर मनमाड व पिंपळगाव बसवंत बाजारात 1,100 रुपये दर नोंदवला गेला आहे. सध्या नाफेड आणि एनसीसीएफकडून कांदा खरेदी अद्याप सुरु झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता या संस्थांकडून सुरू होणाऱ्या खरेदीकडे लागले आहे. कांद्याची आवक अधिक असून मागणी कमी असल्याने दर घसरणे सुरूच आहे.