Newsworldmarathi Pune : जय जगन्नाथ शंकरशेट, जय विश्वकर्मा, जय दैवज्ञ… अशा घोषणा देत नारायण पेठेतील अष्टभुजा दुर्गादेवी मंदिरापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नति परिषदेतर्फे आयोजित शोभायात्रेत समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत वाचनसंस्कृतीला चालना देण्याचा संदेश दिला.
परिषदेतर्फे २१ वे अधिवेशन आणि १० वे दैवज्ञ साहित्य संमेलनाचे आयोजन दि. २२ डिसेंबर पर्यंत स्वारगेट जवळील गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले आहे. त्याचा प्रारंभ शोभायात्रेने झाला. यावेळी समाज श्रेष्ठी डॉ. गजानन रत्नपारखी, डॉ. आनंद पेडणेकर, अजय कारेकर, कुमार अणवेकर, सुरेंद्र शंकरशेठ, उदय गडकरी, मनमोहन चोणकर, सूर्यकांत कल्याणकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नारायण पेठेतील अष्टभुजा दुर्गादेवी मंदिर, केसरी वाडा, रमणबाग शाळा, बालगंधर्व रंगमंदिर मार्गे अष्टभुजा दुर्गादेवी मंदिर येथे शोभायात्रेचा समारोप झाला. यामध्ये वाचनसंस्कृती विषयी तसेच समाज प्रबोधनात्मक जनजागृती करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील कलाकार घोड्यावर बसून शोभायात्रेत सहभागी झाले होते. ठिकठिकाणी पालखी आणि ग्रंथांचे पूजन व औक्षण नागरिकांनी केले. तसेच पुष्पवृष्टी देखील करण्यात आली.