Newsworldmarathi Pune : पुणे महानगरपालिकेत टप्प्याटप्प्याने समाविष्ट झालेल्या 34 गावांतील विकास कामासाठी निधी उपलब्ध व्हावा या मागणीसाठी शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांना निवेदन दिले.
२०१७ साली महाराष्ट्र शासनाने पुणे महापालिकेच्या हद्दीत ११ गावांचा समावेश केल्यानंतर टप्प्याटप्प्याने आणखी ३४ गावांचा समावेश करण्यात आला. या समाविष्ट गावांच्या विकासासाठी पुणे महानगरपालिकेने राज्य शासनाकडे ६,००० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. मात्र, अद्यापपर्यंत या गावांसाठी अपेक्षित निधी मंजूर झालेला नाही.
महापालिकेच्या अंदाजपत्रकात फक्त १०० ते १५० कोटी रुपयांच्या कामांची तरतूद करण्यात आली आहे. तीही प्रकल्प या वर्षी पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने, समाविष्ट गावांसाठीच्या निधीचा वापर शहरातील इतर प्रभागांसाठी केला जात आहे. त्यामुळे या गावांमध्ये मूलभूत सुविधा आणि प्रकल्पांचा अभाव जाणवत आहे.
पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, या गावांना पुणे शहराच्या इतर भागांसारख्या सोयीसुविधा मिळाव्यात. तातडीने निधी उपलब्ध करून विविध प्रकल्प आणि सुविधा राबवण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. यामुळे नव्याने समाविष्ट गावांचा विकास साधता येईल आणि त्यांच्या मूलभूत गरजाही पूर्ण होतील. यामुळे लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.