Newsworldmarathi Nagpur : नागपूरात सुरू असलेल्या विधीमंडळ हिवाळी अधिवेशनात नवनिर्वाचीत आमदार हेमंत रासने यांनी पहिल्याच संधीत कसब्यातील दोन महत्त्वाच्या समस्या मांडत कर्तव्यदक्षता दाखवली. आज विधानसभेत पुरवणी मागण्यासंबंधित चर्चेत बोलत असताना रासने यांनी खडक पोलीस वसाहतीचे पुनर्वसन तसेच 2004 पासून संथ गतीने सुरू असणाऱ्या मामलेदार कचेरीच्या कामाला देखील गती देण्याची मागणी राज्य सरकारला केली.
खडक पोलीस वसाहत 125 वर्षे जुनी ब्रिटिशकालीन आहे. आपल्या सर्वांच्या सेवेसाठी दिवस रात्र काम करणारे पोलीस या जुन्या वसाहतीतील अडीचशे फुटांच्या दुरावस्थेतील कौलारू निवासस्थानात जीव मुठीत घेऊन राहत आहेत. तडे गेलेल्या भिंती, तुटक्या खिडक्या, सांड पाण्याची दुरावस्था अशा परिस्थितीचा सामना पोलिसांना करावा लागत असल्याची बाब मनाला वेदना देणारी आहे. त्यामुळे येथील 139 निवासस्थानांचे पुर्नवसन करणे अत्यंत गरजेचे आहे, अशी मागणी रासने यांनी केली.
मामलेदार कचेरीच्या बांधकामाकरिता 2004 साली प्रशासकीय मान्यता मिळाली, परंतु गेल्या 20 वर्षांपासून काँग्रेसच्या काळात हा प्रकल्प संथ गतीने राहिला. या भागात दुय्यम निबंधक कार्यालय, पुणे शहर तहसीलदार कार्यालय, उमाजी नाईक स्मारक, खडक पोलीस स्टेशन अशी अत्यंत महत्त्वाची कार्यालये आहेत. परंतु त्या ठिकाणी नागरिकांना बसण्याकरता कोणतीही व्यवस्था नाही नसून खुर्च्या, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. सर्व्हरबद्दल कायम तक्रारी असतात, तसेच कार्यालयाकडे जाणारा रस्ता सुद्धा अरुंद असून अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे राज्य सरकारने लवकरात लवकर येथील कामाला गती द्यावी, अशी मागणी यावेळी रासने यांनी केली.
आमदार रासने यांनी सर्वप्रथम बहुमताने विजयी करणाऱ्या कसब्यातील जनतेचे ऋण व्यक्त केले. तसेच कसबा मतदारसंघात आमदार राहिलेले दिवंगत गिरीश बापट, अरविंद लेले, अण्णा जोशी, मुक्ता टिळक, वसंतराव थोरात, उल्हास काळोखे या सर्वांना आदरांजली समर्पित केली. सभागृहात पहिल्यांदाच बोलत असताना दिवंगत आमदारांची आठवण काढणारे रासने एकमेव आमदार आज दिसून आले.