Newsworldmarathi Pune : टीव्ही, मोबाईलमुळे बालनाट्य बघायला गर्दी होत नाही, हा विचार खरा नाही. चांगलं बालनाट्य असेल तर ते चालतं, चालणारच. रत्नाकर मतकरी यांचे अलबत्या गलबत्या नाटक आजही का चालतं? चांगल्या नाटकांना प्रेक्षक आहे, मुलांना सकस आहार, अन्न मिळावं म्हणून आपण जसे दक्ष असतो तसेच मुलांना चांगलं मनोरंजन मिळावं यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन बालरंगभूमी संमेलनाध्यक्ष नटवर्य मोहन जोशी यांनी केले. बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित पहिल्या बालरंगभूमी संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून ते अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत होते.
उदघाटन सोहळ्याला व्यासपीठावर उदघाटक डॉ. मोहन आगाशे, संमेलनाध्यक्ष नटवर्य मोहन जोशी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, सुबोध भावे, सुशांत शेलार, ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, ज्येष्ठ निर्माता अजीत भुरे, बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष ॲड. निलम शिर्के सामंत, कार्याध्यक्ष राजीव तुलालवार, उपाध्यक्ष ॲड. शैलेश गोजमगुंडे, डॉ. दिपा क्षिरसागर, प्रमुख कार्यवाह सतीश लोटके, कोषाध्यक्ष नंदकिशोर जुवेकर, सहकार्यवाह दिपाली शेळके, आसेफ शेख अन्सारी, कार्यकारिणी सदस्य दिपक रेगे, अनंत जोशी, वैदेही चवरे सोईतकर, योगेश शुक्ल, धनंजय जोशी, त्र्यंबक वडूसकर, नागेसन पेंढारकर, आनंद जाधव यांच्यासह महाराष्ट्रातील शाखांचे अध्यक्ष आबा मेघे, सुमती सोमवंशी, सीमा येलगुलवार, डॉ. अदिती मोराणकर, निलेश माने, तेजस्वीनी कदम, वैशाली दाभाडे, राजेश जाधव, उर्मिला लोटके, आबा ढोले, डॉ. निलेश माने, मनीषा पटेल, सुजाता कांबळे, अतुल अमळनेरकर आदी उपस्थित होते.
सोहळ्याच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर, प्रास्ताविक करताना अध्यक्ष ॲड.नीलम शिर्के सामंत यांनी गेल्या वर्षभरात बालरंगभूमी परिषदेतर्फे झालेल्या महोत्सव व कार्यक्रमांचा आढावा घेतला. यात जल्लोष लोककलेचा व खास दिव्यांग बालकांसाठी घेतलेल्या यहाँ के हम सिकंदर या महोत्सवांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. या महोत्सवांनी बालरंगभूमीचे कार्य महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यात पोहचले. बालप्रेक्षक सभासद योजनेत आजवर हजारो बालप्रेक्षकांनी केलेली नोंदणी ही त्याची पावती असल्याचेही त्यांनी सांगितले.
यानंतर मान्यवरांच्या मनोगतात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी सांगितले की, जसे प्रशिक्षणातून तानसेन निर्माण होत असतील तर कानसेनही निर्माण व्हायला हवेत. कारण प्रेक्षक असतील तर रंगमंचावर काम करण्यास मजा येते. बालवयातच हे कलेचे बालकडू मिळाल्यास निश्चितच बालरंगभूमी परिषदेच्या कार्यातून उद्याची रंगभूमी अधिक समृध्द होईल. तालात एक ताकद आहे आणि या ताकदीला अधिक ऊर्जा मिळण्यासाठी बालरंगभूमीचे कार्य गरजेचे आहे. अ.भा.मराठी नाट्य परिषद त्यांच्या कार्यामागे निश्चितच उभी राहील. अध्यक्ष नीलम शिर्के सामंत यांच्या नेतृत्वाखाली बालरंगभूमी प्रगती करेल ह्या सदिच्छा.
स्मरणिका, दिनदर्शिका व वेबसाईटचे प्रकाशन
बालरंगभूमी परिषदेचे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावे. यासाठी गेल्या वर्षभरात झालेल्या महोत्सवाची माहिती देणारी स्मरणिका तसेच वेबसाईटचे प्रकाशन करण्यात आले. याव्ोळी महाराष्ट्रातील सर्व कार्यकारिणींच्या छायाचित्रांचा समाव्ोश असणा-या दिनदर्शिकेचेही प्रकाशन याव्ोळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
अभिनेते सुबोध भावे यांनी मनोगतात, प्रकाश पारखीं यांच्यासोबत बालनाट्यात घेतलेल्या पहिल्या सहभागाचा उल्लेख करत. मी अभिनेता म्हणून घडण्याचे बालकडू मला बालरंगभूमीवरच मिळाले आहे. त्या काळातील अनेक स्वप्ने साकारण्याची उर्मी मला तिथेच मिळाली. नाटकात कामं करणे म्हणजे केवळ अभिनय करणे नाही. तर त्यासाठी मदत करणारे तंत्रज्ञही गरजेचे आहे. बालरंगभूमीच्या माध्यमातून त्यांची कला अधिकाधिक ऋध्दिंगत व्हावे. बालरंगभूमीने एक बालनाट्य महोत्सव घ्यावा, जिथे आमच्यासारख्या कलावंतांना अभिनय करण्याची संधी द्यावी. कारण बालप्रेक्षकांसमोर अभिनय करणे हे खरच कस लावणारे असेल.
अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपल्या मनोगतात बालरंगभूमीने हाती घेतलेल्या या कार्याला निश्चित गती मिळेल. लहानपणी खोड्या करणारी मुलं पुढे मोठी जावून सर्जनशील म्हणून ओळखली जातात. त्यामुळे खोड्या करण्याच्या या वयात निश्चितच खोड्या करा. त्यातूनच कल्पनाशक्तीचा विकास होता. याव्ोळी लहानपणीची आठवण सांगतांना त्यांनी सादर केलेल्या कवितांच्या ओळींना बालप्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.
उदघाटक डॉ. मोहन आगाशे यांनी बालप्रेक्षकांशी गप्पा मारत आपले मनोगत व्यक्त केले. याव्ोळी ते म्हणाले की, तुमच्याप्रमाणेच मी लहानपण अनुभवतो आहे. आपल्या लहानपणाची सगळ्यात मोठी देणगी आहे ती म्हणजे भांडण करुन विसरायची. भांडण विसरायला पाहिजे पण त्यासाठी आधी ते करावं लागतं. प्रत्यक्षात भांडण केलं तर रट्टा मिळतो पण नाटकात केलं तर कौतुक होतं. त्यामुळे ही निरागसता जपा. लहानपणीच उत्तम नाटक बघण्याची सवय लागली तर उद्याचा उत्तम प्रेक्षक घडेल. बालरंगभूमीने दिव्यांगाविषयी कार्य केले, याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो. दिव्यांग नसलेला एकही मुलगा मला आज दिसला नाही. अंतरीच्या नाना कळा असणारे हे दिव्यांग आपल्या बुध्दांकामुळे आपल्याला काही बोलत आहेत.
संमेलनाध्यक्ष नटवर्य मोहन जोशी यांनी अध्यक्षीय भाषणात, माझी अभिनयाची सुरुवातही बालरंगभूमीवरुनच झाली आहे. 1968 मध्ये जयंत तारी यांच्या टूनटूननगरी, खणखण राजा या बालनाट्यातून केली आहे. 60 वर्षानंतरही बालनाट्य रंगभूमी बदलली आहे. ती हौशी नाही तर व्यावसायिक व स्पर्धार्त्मक झाली आहे. नव्या शालेय शिक्षण धोरणात नाटक अभ्यास म्हणून शिकवला जावा. नाट्यशिक्षण ऐच्छित असाव्ो. विद्यार्थ्यांनी नट बनविण्याचा प्रयत्न करावे. बालनाट्य मुलांना भावेल असे हवं. पैसे भरुन झटपट, छोट्या किंवा मोठ्या पडद्यावरचा नायक बनत नसतो. शॉर्टकटने हवं ते मिळविण्याची पालकांची प्रवृत्ती धंदेवाईक प्रशिक्षण संस्थांना जन्म देते. बालरंगभूमीने हे थांबवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. नृत्य, गायन, वादन, जादू, चित्र, शिल्प अशा अनेक कलांच्या प्रसारासाठी आणि प्रचारासाठी बालरंगभूमी परिषद कार्य करत असल्याचा मला आनंद आहे. हे संमेलन सर्व कलांचे समावेशक आहे. बालकांनो बालरंगभूमी ही तुमची हक्काची आहे. ही बालरंगभूमी तुम्हांला घडवेल हा विश्वास बाळगा. तिचा हात आणि बोट सोडू नका, धरुन ठेवा, तुमचं अवघं जगणं आनंदाचं होवून जाईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजय भालेराव यांनी केले तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष शैलेश गोजमगुंडे यांनी मानले.