Newsworldmarathi Pune : आपल्या देशात अनेकदा हे करू नका. असे वागू नका हे सांगितले जाते. मात्र नेमक काय करा किंवा कसे वागायला हवे हे सांगितले जात नाही. यामुळे संभ्रमावस्था असते. आज आपल्या समाजात असलेल्या वाईट गोष्टींवर, दोषांवर केवळ गप्पा न मारता, वाईट गोष्टीपासून परावृत्त करण्यासाठी समाजाला चांगला पर्याय देणे आवश्यक असल्याचे मत माजी खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी व्यक्त केले.
बंग कुटुंबियांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘डॉ विजय बंग सोशल वेल्थ क्रिएटर अवॉर्ड 2024’ च्या पुरस्कार वितरण समारंभात डॉ. विकास महात्मे बोलत होते. ऑडिटोरियम, सेंटर फॉर पोलिस रिसर्च, पाषाण, येथे आयोजिक कार्यक्रमात यंदाचा ‘विजय बंग सोशल वेल्थ क्रिएटर अवॉर्ड’ छत्तीसगढ मधील दंतेवाडा जिल्ह्यात सेंद्रिय शेतीसाठी काम करणाऱ्या आकाश बडवे यांना प्रदान करण्यात आला. मानपत्र आणि रोख 51 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक मिलिंद बोकील, वसंत बंग आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. महात्मे म्हणाले, आकाश बडवे हे मूळचे नाशिकचे. बिट्स पिलाणी विद्यापीठात त्यांचे उच्च शिक्षण झाले. पुण्यात नोकरी केली आणि ज्या दंतेवाडा जिल्ह्याची ओळख देशाला नक्षालग्रस्त अशी आहे, त्या जिल्ह्याचे नाव सेंद्रिय शेतीसाठी देशभर पोहोचवले आहे. त्यांनी दंतेवाडामध्ये जावून तिथल्या लोकांचा विश्वास जिंकत चांगल्या गोष्टी काय करता येतील याचा पर्याय दिला आणि स्थानिकांनी त्यांना यामुळेच साथ दिल्याचे दिसते. आज 110 गावात त्यांची सेंद्रिय शेतीची चळवळ पोहोचली आहे ही अभिमानाची गोष्ट आहे.
मिलिंद बोकील म्हणाले, सामाजिक संपत्ती म्हणजे आपण समाजासाठी काय केले यावरून आपल्या सामाजिक संपत्तीचे मूल्यमापन होते. भौगोलिक आणि सामाजिक कारणामुळे आदिवासी समाज आपल्यापासून काही प्रमाणात वेगळा आहे, ब्रिटिशकालीन अनेक कायदे त्यांच्यापासून त्यांचे जंगल, जल आणि जमीन हिसकावून घेणारे होते, त्यात हळूहळू बदल होत आहे, त्यांना त्यांच्या जंगलात जगण्याची साधने उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न फार उशिरा सुरू झाले असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. आकाश बडवे यांनी आदिवासींच्या पारंपारिक शेतीला आधुनिक रूप देण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे.
सत्काराला उत्तर देताना आकाश बडवे म्हणाले, दंतेवाडा जिल्ह्यात महिला आणि बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण मोठे आहे. खालावलेला आर्थिक स्तर, नक्षलवाद या तिथल्या प्रमुख समस्या आहेत. आम्ही भूमगादी संस्थेच्या माध्यमातून त्यांना सेंद्रिय शेतीला प्रोत्साहित केले, कारण देशाच्या अन्य भागाच्या तुलनेत तिथे शेतीसाठी रासायनिक खतांचा वापर कमी होता. 2018 पासून आम्ही तो शून्यावर आणण्यात यशस्वी झालो आहोत. या उपक्रमासाठी सरकार सुद्धा आम्हाला साथ देत आहे, कारण आज त्या जिल्ह्यात रासायनिक खतांवर सबसिडी किंवा ट्याच्या जाहिराती सुद्धा दिसत नाहीत.
सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला माल, धान्य म्हणजे प्रीमियम प्रॉडक्ट असे वातावरण आपल्याकडे निर्माण झाले आहे. परंतु आम्ही असे काही न जाणवू देता फक्त आदिवासींच्या पारंपारिक शेतीला आधुनिक करण्याचा प्रयत्न करत आहोत, यात आम्हाला स्थानिक तरुणाईची साथ मिळत आहे, शेतकरी आम्ही आमची पुढच्या पिढीला चांगली जमीन देऊ या भावनेतून या चाळवळीशी जोडला जात आहे ही महत्वपूर्ण गोष्ट आहे. आज दंतेवाडा जिल्ह्यात 80 हजार हेक्टर क्षेत्रफळांवर केवळ सेंद्रिय शेती केली जाते, यामुळे आज मला मिळालेला पुरस्कार हा त्या शेतकऱ्यांचा सन्मान आहे.
प्रस्ताविकपर भाषणात वसंत बंग म्हणाले, मनुष्य आपल्या आयुष्यात अनेक प्रकारची संपत्ती गोळा करता असतात. सोशल वेल्थ म्हणजे समाजासाठी म्हणून त्या व्यक्तीने काय निर्माण केले आहे याचा विचार करून या पुरस्कारासाठी व्यक्तीची निवड केली जाते. डॉ. विजय बंग यांनी अमरावती सारख्या शहरात राहून समाजासाठी निर्माण केलेले कार्य मोठे आहे, यामुळे पुरस्कारासाठी निवड करताना समिती अशाच व्यक्तींची निवड करते, त्यातही तरुणांच्या कार्याला प्रोत्साहान देण्याचा आमचा हेतु आहे. सेंद्रिय शेती साठी तीन हजारांहून अधिक शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे ते सुद्धा नक्षालाग्रस्त भागात हे सोपे काम नाही, आकाश बडवे यांनी निवडलेली ही वेगळी वाट सामाजिक संपत्ती आहे यात शंका नाही.
आकाश बडवे यांना दिलेल्या मानपत्रांचे वाचन सागर धारिया यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मोनिका सिंह यांनी केले तर आभार डॉ. आरती बंग यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.