Homeपुणेतांदळाच्या नवीन सीझनमध्ये आंबेमोहोरच्या भावात तेजी

तांदळाच्या नवीन सीझनमध्ये आंबेमोहोरच्या भावात तेजी

Newsworldmarathi Pune : पुणेकरांच्या विशेष पसंतीच्या आंबेमोहोर तांदळाचे भाव नवीन सीझनच्या सुरवातीलाच गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ ते २० % ने वाढून घाऊक बाजार पेठेत ८००० ते ९००० रु. प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत. मागील वर्षी सीझनच्या सुरुवातीला हे दर ७००० ते ७५०० निघाले होते. यावर्षी साधारणतः ५०० ते १००० रुपये प्रति क्विंटलने आंबेमोहोर तांदळाची भाववाढ झाली आहे.

Advertisements

या भाववाढीचे प्रमुख कारण म्हणजे सप्टेंबर मध्ये केंद्र सरकारने नॉन बासमती तांदळा वरची निर्यात बंदी उठवली. तसेच त्यावेळी असणारे २० टक्के निर्यात कर सुद्धा सरकारने कमी केला आहे. त्यामुळे आंबेमोहोर तांदळाला परदेशातून खूप मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. महाराष्ट्रात येणाऱ्या एकूण आंबेमोहोर तांदळापैकी ८०% तांदूळ हा मध्य प्रदेश मधून तर उर्वरित २०% तांदूळ आंध्र प्रदेश या राज्यांमधून येतो. यावर्षी या दोन्ही राज्यांमध्ये आंबेमोहोर तांदळाचे उत्पादन कमी झालेले आहे. त्याच बरोबर अनेक निर्यातदार व्यापाऱ्यांनी यावर्षी जागेवरच अधीक प्रमाणावर तांदळाची खरेदी केली आहे. त्यामुळे वरील भाववाढ झालेली आहे. साधारणतः डिसेंबर महिन्याच्या शेवटी नविन आंबेमोहोर तांदळाची आवक होण्यास सुरवात होते.

सुगंधी आंबेमोहोर तांदळाचा राजा म्हणून ओळखला जातो. हा तांदूळ महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे बारा महिने वापरला जातो. विशेषतः पुण्यात आंबेमोहोर तांदळाला खूप मोठी मागणी आहे. परंतु यावर्षी पुणेकरांना आंबेमोहोर तांदूळ १० ते १५ रु. प्रति किलो महाग खरेदी करावा लागणार आहे. वर्षभर वापरल्या जाणाऱ्या बासमती, आंबेमोहोर, इंद्रायणी व सुरती कोलम या तांदळापैकी आंबेमोहोरला चांगली मागणी आहे. यावर्षी बासमती तांदळाच्या दरांपर्यंत आंबेमोहोर तांदळाचे दर पोहोचतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तसे झाल्यास हा एक विक्रम होईल. त्याचबरोबर आंबेमोहोर तांदळाचे दर हे यावर्षी कमी होण्याची शक्यता खूप कमी आहे असा अंदाज ही व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

आंबेमोहोर तांदळाचे सर्वाधिक उत्पादन मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये होते. महाराष्ट्रात कामशेत, भोर याभागात काही प्रमाणात त्याचे उत्पादन घेतले जाते. काही वर्षांपूर्वी आंबेमोहोरचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात घेतले जात होते. परंतू हा तांदूळ पिकणाऱ्या पुणे, मावळ, भोर, कामशेत या पट्यात झपाट्याने शहरीकरण वाढले व जमिनींना चांगला भाव आला म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी जमीनी विकल्या. हे वर्षातून एकदाच घेतले जाणारे पीक असल्यामुळे आणि पीक येण्यास जास्त वेळ लागत असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याचे उत्पादन घेणे कमी केले. म्हणून आंबेमोहोर महाराष्ट्रातून कमी होत चालला आहे. अशी माहिती जयराज आणि कंपनीचे संचालक व तांदळाचे निर्यातदार धवल शहा यांनी दिली.

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments