Newsworldmarathi Mumbai : संघर्ष, जिद्द आणि अपार मेहनतीचे प्रतीक ठरलेल्या आयएएस अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी उल्हासनगर महापालिकेच्या इतिहासात प्रथमच महिला आयुक्त म्हणून आपले नाव कोरले आहे. गुरुवारी त्यांच्या नियुक्तीने उल्हासनगर शहरासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या कामकाजाला नवा अध्याय सुरू होईल, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.
उल्हासनगर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त विकास ढाकणे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपसचिवपदी बदली झाल्यानंतर आयुक्तपदाचा तात्पुरता कारभार अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्याकडे होता. त्यानंतर आयुक्तपदासाठी अंबरनाथ नगरपरिषदेचे प्रशासक डॉ. प्रशांत रसाळ आणि जमीर लेंगरेकर यांची नावे प्रबल दावेदार होती.
मात्र, अखेर गुरुवारी पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती झाली. उल्हासनगर महापालिकेच्या स्थापनेपासून प्रथमच एका महिला आयुक्तांची नियुक्ती झाली आहे. मनीषा आव्हाळे यांची उल्हासनगरच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून नोंद झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे शहराच्या प्रशासकीय व्यवस्थापनाला नवी दिशा मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.
प्रेरणादायी प्रवास
मनीषा आव्हाळे यांचे वडील शिक्षणप्रेमी होते. स्वतः उच्चशिक्षित होण्याचे स्वप्न त्यांनी आर्थिक अडचणींमुळे सोडले, मात्र मुलगी कलेक्टर व्हावी, असे स्वप्न पाहिले. त्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. २०१८ मध्ये त्यांनी ३३ वी रॅंक मिळवत देशभरात लौकिक मिळवला. या यशाचे श्रेय त्यांनी वडिलांच्या प्रेरणेला दिले. यूपीएससीच्या तयारी दरम्यान मनीषा यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. वडील गंभीर आजारी पडले, तर आईला कॅन्सर असल्याचे निदर्शनास आले. अशा परिस्थितीत संपूर्ण कुटुंबाने आयुष्याच्या परीक्षेला सामोरे जात त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न केला. मनीषा आव्हाळे यांनी आयुष्यभर संघर्ष करत आपल्या वडिलांचे स्वप्न साकार केले.
आई-वडिलांचे आजारपण आणि यूपीएससीची तयारी
माझ्या वडिलांना स्वत: शिकण्याची खूप इच्छा होती. त्यांच्या भावांना आणि बहिणींना शिकवण्यासाठी त्यांनी स्वतःचे शिक्षण अर्धवट सोडले. उच्चशिक्षित होण्याचे त्यांचे स्वप्न त्यांनी माझ्यात पाहिले. इयत्ता चौथीनंतर माझे शिक्षण धुळे, राहता, पुणे अशा विविध शहरातील बोर्डिंग स्कूलमध्ये झाले. पुण्यातील आयएएलएस लॉ कॉलेजमधून एलएलबीची पदवी घेतल्यानंतर यूपीएससीची तयारी करण्यासाठी वडिलांनी मला दिल्लीला पाठविले.
पहिल्याच प्रयत्नात मला 833 वी रॅंक मिळाली. मात्र, ही परीक्षा देत असताना माझे वडील आजारी पडले. त्यांना उपचारासाठी अकोल्यावरून पुण्यात आणण्यात आले. तब्बल दोन महिने ते आयसीयूमध्ये होते. मुख्य परीक्षेचा निकाल लागला तेव्हा मला माहितीही नव्हते. आठ दिवसांनी मी माझा निकाल बघितला. मुख्य परीक्षेचा अभ्यास एक महिन्यात करून मी परीक्षा दिली. दरम्यानच्या काळात आईलाही कॅन्सर असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अतिशय हलाखीच्या परिस्थितीत संपूर्ण कुटुंबाने यूपीएससी नाही तर आयुष्याच्या परीक्षेला तोंड देऊन रॅंक मिळविला होता. आयुष्यातील हा क्षण आपल्यासाठी अविस्मरणीय असल्याचेही सहाय्यक जिल्हाधिकारी आव्हाळे यांनी सांगितले.