Newsworldmarathi Pune : “आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी ‘जगेल तर देशासाठी आणि मरेल तर देशासाठी’ अशी शपथ घेऊन आयुष्यभर स्वातंत्र्यचळवळीत योगदान दिले. जातीपातीच्या भिंती तोडून देशभक्त क्रांतिकारकांची फळी त्यांनी घडवली. लहुजी साळवे खऱ्या अर्थाने समतेचे पुरस्कर्ते होते. जातीयवादाचे विष पेरणाऱ्या समाजकंटकांना त्यांचे समतेचे विचार कळले नाहीत. लहुजींचा समता-बंधुतेचा विचार समाजाला प्रेरणादायी आहे,” असे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी व्यक्त केले. वस्तादांप्रमाणे शरीर बळकट करून अन्यायाविरुद्ध लढा दिला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
लहुजी समता परिषद आणि गुलमोहर वर्ल्ड फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे युवाप्रेरणा पुरस्कार’ रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण बागवे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महात्मा फुले पगडी, उपरणे, सन्मान चिन्ह आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मुख्य संयोजक अनिल हातागळे, आंबेडकरी नेते अंकल सोनवणे, लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष विष्णू कसबे, लहुजी स्मारक समितीचे अध्यक्ष विजय डाकले, शिव उद्योग सेनेचे अध्यक्ष हर्षद निगिनहाळ, माजी पोलीस अधिकारी मिलिंद गायकवाड, उद्योजक भारत देसडला, राजाभाऊ कदम, संजय अल्हाट आदी उपस्थित होते.
उमेश चव्हाण म्हणाले, “भारतीय संविधानाने प्रत्येक जाती-धर्माच्या व्यक्तीला दर्जेदार उपचार घेण्याचा अधिकार दिलेला आहे. रुग्ण हक्क परिषदेचे काम करताना आम्ही समतेचा विचार अंगीकारून रुग्णांना त्यांचे हक्क मिळवून दिले. आज ८८ टक्के लोकांना वैद्यकीय उपचारांचा खर्च १० लाखाच्या वर येतो, हे दुर्दैवी आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी रुग्ण हक्क परिषद कार्यरत असून, यात माझ्या सर्व सहकाऱ्यांचे योगदान मोलाचे आहे. हा सन्मान सर्व सहकाऱ्यांचा आहे.”
अनिल हातागळे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. जयश्री हातागळे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. दीपक मस्के यांनी सूत्रसंचालन केले. रामभाऊ कसबे यांनी आभार मानले.