Homeपुणेरमणबागमध्ये विद्यार्थ्यांनी सादर केले समूहनाट्य 'कृष्णायन'

रमणबागमध्ये विद्यार्थ्यांनी सादर केले समूहनाट्य ‘कृष्णायन’

Newsworldmarathi Pune : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या जल्लोषात साजरे करण्यात आले.प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक महेश जोशी यांनी संमेलनाचे कार्याध्यक्ष व राजेंद्र पवार यांनी उपकार्याध्यक्ष म्हणून कार्य पाहिले.

Advertisements

प्रशालेचे माजी विद्यार्थी सुप्रसिद्ध सिनेनाट्य अभिनेते विजय मिश्रा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. शालासमिती अध्यक्ष डॉ.शरद अगरखेडकर व प्रशालेच्या मुख्याध्यापक चारुता प्रभुदेसाई यांच्या संकल्पनेतून कृष्णायन या महानाट्याची निर्मिती करण्यात आली. प्रशालेतील ४०० विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या कृष्णायन महानाट्याचे दिग्दर्शन व संकलन प्रशालेतील रंगकर्मी शिक्षक रवींद्र सातपुते यांनी केले तर अतिभव्य नेपथ्य उपमुख्याध्यापक जयंत टोले यांनी केले.

विद्यार्थ्यांनी भूमिकेशी समरस होऊन कृष्ण,बलराम,सुदामा कंस, पुतना राक्षसी,नंद, यशोदा, देवकी,वसुदेव इत्यादी पात्रे हुबेहूब साकारली.कृष्णजन्म,पुतना वध,कालिया मर्दन, गोवर्धनोदधरण, रासलीला,विश्वरूपदर्शन अशा कृष्ण जीवनातील अनेक रोमहर्षक प्रसंगांचे भव्य नाट्य सादरीकरण पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.अतिभव्य उत्कृष्ट नेपथ्य, रंगभूषा,वेशभूषा,प्रकाश योजना यांचा सर्वोत्तम मेळ नाटकास परमोच्च उंचीवर घेऊन गेला.

या सोहळ्याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाट्य अभिनेते विजय मिश्रा यांनी मी रमणबाग शाळेचा माजी विद्यार्थी असल्याचा मला अभिमान आहे.शाळेतील ४०० बालकराकारांनी सादर केलेला उत्कृष्ट नाट्यविष्कार पाहून अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले. कौतुक करण्यास शब्द अपुरे असून असा नाट्यविष्कार शालेय स्तरावर आजतागायत पाहण्यात आला नसल्याचे गौरव उद्गार काढले.

कृष्णायन या समूह नाट्यातील बालकलाकारांचे कौतुक करण्यासाठी प्रशालेचे वित्त नियंत्रक डॉ.विनयकुमार आचार्य, डॉ. शलाका अगरखेडकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली चौगुले यांनी केले तर पर्यवेक्षक मंजुषा शेलुकर वअंजली गोरे यांनी मानले. शिक्षक-शिक्षकेतर विद्यार्थी व पालक यांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला.

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments