Homeपुणेपं. बबनराव हळदणकर यांना ‌‘स्वरआदरांजली‌’

पं. बबनराव हळदणकर यांना ‌‘स्वरआदरांजली‌’

Newsworldmarathi Pune : राग देसी व राग गौड सारंगमधील कै. पं. बबनराव हळदणकार रचित बंदिशी, राग बहादुर तोडीमधील बडा ख्याल तसेच धमार, तराणा यांनी परिपूर्ण अशा विशेष मैफलीची मेजवानी आज (दि. 29) पुणेकर रसिकांना अनुभवयला मिळाली.

Advertisements

निमित्त होते आग्रा घराण्याचे थोर गायक आणि बंदिशकार कै. पंडित बबनराव हळदणकर स्मृतिप्रित्यर्थ गानवर्धन आणि पंडित बबनराव हळदणकर यांच्या शिष्यवर्गातर्फे आयोजित ‌‘स्वरआदरांजली‌’ या शास्त्रीय गायन मैफलीचे. मैफल लोकमान्य हॉल, केसरी वाडा येथे आयोजित करण्यात आली होती.

मैफलीची सुरुवात मानस विश्वरूप या युवा पिढीतील गायकाने राग बहादुर तोडीमधील बडा ख्यालातील ‌‘महादेव देवन पती पार्वती पती ईश्वरेश‌’ या बंदिशीने केली. यानंतर द्रुत लयीत त्यांनी ‌‘साजन की सावरी‌’ ही बंदिश सादर केली. अलवार आवाज, शुद्ध उच्चार, दमदार ताना आणि भावपूर्ण गायनाने त्यांनी रसिकांना आनंदित केले. धमार या गीत प्रकारातील ‌‘भिजो दयी सारी रंग मे आयो है अनोखे खिलाडी‌’ ही रचना सादर करून त्यांनी गायनाची सांगता केली.

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका कविता खरवंडीकर यांनी आपले गुरू पंडित बबनराव हळदणकर यांचे अस्तित्व आजही प्रत्येक मैफलीत जाणवते, असे सांगून मधुर अशा राग देसीमधील ‌‘अधिक मन आयो है‌’ ही रचना सादर केली. त्याला जोडून द्रुतमध्ये ‌‘म्हारो डेरे आवो‌’ ही बंदिश सादर केली. यानंतर गौड सारंग रागातील ‌‘तोरे कारण जागी हूँ निस दिन‌’ आणि द्रुत लयीत ‌‘मै तो लरूंगी लराई तो से सैय्या‌’ ही रचना ऐकविली. दमदार पण समधुर आवाज, उत्तम रागविस्तार आणि आवाजाची सहज फिरत ही वैशिष्ट्ये रसिकांना खूप भावली. खरवंडीकर यांनी मैफलीची सांगता करताना रसिकांच्या आग्रहास्तव ‌‘दीम्‌‍ तोम्‌‍ तान्न देरेना‌’ या तराण्याने केली. खरवंडीकर यांनी सादर केलेल्या सर्व रचना गुरू पंडित बबनराव हळदणकर यांनी रचलेल्या होत्या.

कलाकारांना धनंजय खरवंडीकर (तबला), उदय कुलकर्णी (संवादिनी), श्रुती खरवंडीकर (तानपुरा, सहगायन), धरित्री जोशी-बापट (सहगायन) यांनी समर्पकपणे साथ केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस गानवर्धन संस्थेतर्फे छत्रपती संभाजीनगर येथील युवा गायिका युगंधरा केचे हिला दहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती पंडित बबनराव हळदणकर यांच्या पत्नी उषा हळदणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. या वेळी बोलताना उषा हळदणकर म्हणाल्या, या माध्यमातून बुवांचे शास्त्रशुद्ध, भावपूर्ण गाणे पुढच्या पिढीत प्रवाहित होते आहे याचा आनंद आहे.

ज्येष्ठ शास्त्रीय गायिक शुभदा दादरकर यांनी शिष्या असलेल्या युगंधरा केचे हिने सुरुवातीस राग नटभैरव मध्ये ‌‘भोर भयी‌’ ही बंदिश सादर करून आपल्या गायन कौशल्याचे सादरीकरण उपस्थितांना दाखविले.

अरुण कशाळकर यांच्या हस्ते पंडित बबनराव हळदणकर लिखित आणि राज्य शासन पुरस्कारप्राप्त ‌‘जुळू पाहणारे दोन तंबोरे‌’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे तसेच ‌‘राग भेद आणि भावदर्शन‌’ या पुस्तकाचे प्रकाशन विद्या गोखले, दयानंद घोटकर, चंद्रशेखर महाजन, उषा हळदणकर, गौतम हळदणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

पंडित बबनराव हळदणकर यांचे ‌‘राग भेद आणि भावदर्शन‌’ हे पुस्तक गायकांना व रसिकजनांना विचार करायला प्रोत्साहित करेल तसेच ते प्रवर्तक बनेल अशी आशा ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित अरुण कशाळकर यांनी व्यक्त केली.

वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी ‌‘राग भेद आणि भावदर्शन‌’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले याचे समाधान आहे. या पुस्तकाच्या निर्मितीसाठी चंद्रशेखर महाजन यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे, असे गौतम हळदणकर म्हणाले.

मला लाभलेल्या गुरुंच्या सहवासामुळे पुस्तक निर्मितीला माझा हातभार लागला असून या पुस्तकाद्वारे गुरुजींचे विचार रसिकांपर्यंत पोहोचवायची इच्छा आहे, असे भाव पंडित बबनराव हळदणकर यांचे ज्येष्ठ शिष्य चंद्रशेखर महाजन यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष दयानंद घोटकर यांनी तर विश्वस्त डॉ. राजश्री महाजनी यांनी सूत्रसंचालन केले. कलाकरांचा सत्कार पंडित अरुण कशाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments