Newsworldmarathi Pune : अर्थ आणू जीवनाला, विसरुन जावू मद्यपानाला…मद्य करते बुद्धी भ्रष्ट, का करता जीवन नष्ट…सशक्त भारताचा एकच नारा, मद्यपानाला देऊ नका थारा…अशा घोषणा देत जनजागृतीच्या माध्यमातून सशक्त भारताकरिता दारु सोडा, दूध प्या असा संदेश देण्यात आला. सिंहगड रस्त्यावर पोलीस अधिका-यांसह, महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते यांनी व्यसनाधिनतेच्या विळख्यात अडकत चालेल्या तरुणाईला निरोगी आरोग्याचा मार्ग दाखविण्याकरिता पुढाकार घेत दूध वाटप केले.
सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलाखालील चौकामध्ये जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूट्स, सिंहगड रोड पोलीस स्टेशन तर्फे दारु सोडा, दूध प्या अभियान राबविण्यात आले. यावेळी सिंहगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दायगडे, हवेली पंचायत समिती माजी सभापती प्रभावती भूमकर, निलेश गिरमे, हरिदास चरवड, श्रीकांत सावंत, सारंग नवले, शिवा पासलकर, राणी डफळ, यशवंत मानखेडकर, एकनाथ भूमकर, सुरेश परकड, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर म्हणाले, तरुणांनी नशेच्या आहारी न जाता चांगले संकल्प करून नव्या वर्षाचे स्वागत केले पाहिजे. व्यसनांमुळे अनेक कुटुंबे उध्वस्त झाली आहेत, त्यामुळे याविरोधात जनजागृती करण्यात आली. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक तरुण मद्यधुंद होऊन व्यसनाच्या विळख्यात अडकतात. मद्यपान करून भरधाव वेगाने गाडी चालविल्यामुळे अनेक अपघात देखील होतात. नव्या वर्षाच्या सुरूवातीला असे कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दारू नको दूध घ्या हा उपक्रम आवश्यक आहे.
अॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, देशाची युवा पिढी निरोगी असेल तर देशाचा अधिक विकास होतो. आपल्या देशाला महासत्ता बनवायचे असेल तर तरुणांनी निरोगी असले पाहिजे. तरुणांनी नशेच्या आहारी न जाता चांगले संकल्प करून नव्यावर्षाचे स्वागत केले पाहिजे. नववर्षाचे स्वागत करताना चांगले विचार आणि संकल्प मनात ठेवून प्रत्येकाने व्यसनमुक्त भारताचे स्वप्न रंगवावे, याकरीता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.