Homeपुणेसृजन महोत्सव 13 जानेवारीपासून

सृजन महोत्सव 13 जानेवारीपासून

Newsworldmarathi Pune : सृजन फाऊंडेशनतर्फे दि. 13 ते दि. 15 जानेवारी 2025 या कालावधीत सृजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‌‘दास्तान ए रामजी‌’ हा अभिनव प्रयोग तसेच सिद्धहस्त कवींच्या लेखणीतून साकारलेल्या काव्यांमधून झाडांचे मन जाणून घेणारा ‌‘झाडांच्या मनात जाऊ‌’ या काव्यात्मक कार्यक्रमाची पर्वणी रसिकांना मिळणार आहे. महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी सृजन-कोहिनूर गौरव पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

Advertisements

तीन दिवसीय सृजन महोत्सव दररोज सायंकाळी 5:30 वाजता नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात होणार आहे, अशी माहिती सृजन फाऊंडेशनचे अध्यक्ष अधीश प्रकाश पायगुडे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी (सामेवार, दि. 13) थोर कवींच्या मराठी-हिंदी कवितांची सुरेल आणि हरीतसर्जक ‌‘झाडांच्या मनात जाऊ‌’ ही मैफल अपूर्वा कुलकर्णी, गिरीश दातार, अबोली देशपांडे सादर करणार आहेत. दिग्गज कवींच्या कवितांमधील काही संवाद गद्यात, काही संगीताच्या साथीने तर काही अभिनित करून मराठी आणि हिंदी भाषांमध्ये सादरीकरण होणार आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, कुसुमाग्रज, ग्रेस, बा. भ. बोरकर, वसंत अबाजी डहाके, कैफी आझमी, अखिलेश जयस्वाल, भवानीप्रसाद मिश्र, दासू वैद्य, वैभव जोशी, संदीप खरे, अरविंद जगताप यांच्यासह विख्यात कवींच्या रचना सादर केल्या जाणार आहेत.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (मंगळवार, दि. 14) अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी ‌‘दास्तान ए रामजी‌’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. दि. बा. मोकाशी यांच्या ‌‘आता आमोद सुनासि आले‌’ या कथेवर आधारित ‌‘दास्तान ए रामजी‌’ हा कार्यक्रम आहे. उर्दू परंपरेत दास्तानगोई याचा अर्थ मौखिक कथा सांगणे असा असून ‌‘दास्तान ए रामजी‌’ या कार्यक्रमातून कलाकार कथामांडणीच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतून जन्ममृत्यूचा प्रवास दर्शविणार आहेत.

महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी (बुधवार, दि. 15) सृजन फाऊंडेशन आणि कोहिनूर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणााऱ्या सृजन-कोहिनूर गौरव पुरस्काराने नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे संस्थापक-अध्यक्ष विठ्ठल काटे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ निरुपणकार उल्हास पवार यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर अध्यक्षस्थानी असणार आहेत. प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments