Newsworldmartahi Pune : “बहुधर्मीय, बहुजातीय, बहुप्रांतीय, बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक धर्मनिरपेक्षवादी राष्ट्र अशी आपल्या देशाची ओळख आहे, तर समाजसुधारकांच्या पुरोगामी आणि परिवर्तनशील सामाजिक विचारसरणीचा महाराष्ट्र अशी आपल्या राज्याची ओळख आहे. ही ओळख अधिक दृढ करण्यामध्ये विश्वबंधुता लोकचळवळीचे योगदान अधिक मोलाचे आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध कादंबरीकार प्रा. शंकर आथरे यांनी केले.
पिंपळे गुरव येथील बंधुता भवनमध्ये साई प्रिंटर्सचे संचालक विश्वास राजवडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या विश्वबंधुता साहित्य परिषदेच्या प्रेरणाशिल्पाचे लोकार्पण प्रा. शंकर आथरे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी प्रा. चंद्रकांत वानखेडे होते. प्रसंगी बंधुताचार्य प्रकाश रोकडे, मंदाकिनी रोकडे, लेखिका मधुश्री ओव्हाळ, डॉ. बंडोपंत कांबळे, कवयित्री संगीता झिंजूरके, सुरेश पारंगे आदी उपस्थित होते.
प्रा. चंद्रकांत वानखेडे यांनी अध्यक्षीय मनोगतात बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या कार्याची प्रशंसा केली. बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांचे कार्य समाजबांधणीसाठी उल्लेखनीय असून, बंधुता चळवळीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातील हा उपक्रम स्तुत्य आहे, असे ते म्हणाले.
प्रकाश रोकडे यांनी देशहिताच्या या चळवळीमध्ये सातत्याने विधायक साथ देणाऱ्या साहित्यिक, विचारवंत, कलावंत, कवी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. प्रा. प्रशांत रोकडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार मानले.