Newsworldmarathi pune : कात्रज-हांडेवाडी रस्त्यावर भरधाव ट्रकने धडक दिल्याने डॉक्टर प्रणाली तन्मय दाते (वय ३४) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्या उंड्री येथील व्हीटीपी अर्बन सोसायटीमध्ये राहत होत्या. या प्रकरणात काळेपडळ पोलिसांनी ट्रकचालक पांडुरंग बलभीम भोसले (वय ३५, रा. तुळजापूर, धाराशिव) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. प्रणाली दाते बुधवारी दुपारी त्या दुचाकीवरून हांडेवाडीकडे जाण्यास निघाल्या होत्या.पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. डॉ. दाते दुचाकीवरून खाली पडल्या. ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक पांडुरंग भोसले पसार झाला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या महितीनुसार, डॉ. प्रणाली दाते यांचा उंड्री परिसरात दवाखाना आहे. त्यांचे पती देखील डॉक्टर आहे. डॉ. प्रणाली दाते यांच्या पती आणि मुलगा असा परिवार आहे.
ट्रकचालकाकडून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न!
पसार झालेल्या ट्रक चालकाने गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. अपघातस्थळापासून दूर अंतरावर जाऊन ट्रकचालक ट्रकचे चाक बदलत होता. त्याच वेळी पोलिसांनी त्याला पकडले. ट्रकच्या चाकाला महिलेचे रक्त लागले होते. त्या गोष्टीचा अडथळा नको, म्हणून ट्रक चालकाने टायर बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच वेळी पोलिस तेथे पोहोचले. त्यांनी त्याला ताब्यात घेतले.