Newsworldmarathi Pune : स्वारगेट ते कात्रजदरम्यानच्या भूमिगत मेट्रो मार्गाची निविदा प्रक्रिया सुरू असून, येत्या दोन महिन्यांत या मार्गाचे काम सुरू होईल. प्रवाशांच्या मागणीनुसार या मार्गावर तीन मेट्रो स्थानकांऐवजी पाच मेट्रो स्टेशन उभारण्यात येणार आहे. यामध्ये बालाजीनगर व सहकारनगर-बिबवेवाडी मेट्रो स्टेशनचा करावा, अशी सूचना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सोमवारी पुणे मेट्रो प्रशासनाला सोमवारी दिल्या. राज्यमंत्री मिसाळ यांनी पुणे मेट्रो कार्यालयास भेट देऊन पुण्यातील मेट्रो कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, संचालक अतुल गाडगीळ, विनोदकुमार अग्रवाल, कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे उपस्थित होते.
मिसाळ म्हणाल्या, पुण्यातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारचे प्राधान्य आहे. पुणे मेट्रो एक महत्त्वपूर्ण प्रकल्प असून, त्याची कामे वेगाने पूर्ण होऊन वाहतूककोंडी दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
मेट्रोकडून सध्या दोन लाख प्रवाशांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यानुसार दीड लाखांपेक्षा जास्त प्रवासी मेट्रोतून प्रवास करत आहेत. प्रवासी वाढविण्यासाठी फीडर सेवा सक्षम करण्यावर फिडरसाठी ५०० बस घेण्याबाबत विचार सुरू आहे, असेही राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या. त्याशिवाय रिक्षास्टॉप, बसस्थानक मेट्रोशी जोडण्याचा विचार सुरु आहे