Newsworldmarathi Nagar : कर्जत तालुक्यातील ताजू गावच्या शिवारात घोड कालव्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन बहिणींचा व त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी (दि. १६) दुपारी बाराच्या सुमारास घडली आहे. दीपाली वनेश साबळे (वय १४), ऐश्वर्या वनेश साबळे (वय १०) आणि कृष्णा रामदास पवळ (वय २६) अशी बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
नेमकं काय घडलं?
याबाबत अधिक माहिती अशी की, कर्जत तालुक्यात घोड कालव्याचे आवर्तन सुरू आहे. वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे कालव्यात पोहण्यासाठी ठिकठिकाणी मुले व तरुण गर्दी करत आहेत. ताजू गावाच्या शिवारात बुधवारी दुपारी दीपाली व ऐश्वर्या साबळे आणि आणखी दोन लहान मुले पोहण्यासाठी कालव्यात उतरले. मात्र, पाण्याला वेग जास्त असल्यामुळे ते चौघेही पाण्यात बुडू लागल्याने जोरजोरात ओरडले.
जवळच्या शेतात ग्रामपंचायत कर्मचारी कृष्णा पवळ काम करत होता. त्याने मुलांचा आवाज ऐकून कालव्याकडे धाव घेतली आणि पाण्यात उडी मारून दोन मुलांना बाहेर काढले. दीपाली व ऐश्वर्याला वाचविण्यासाठी त्याने पुन्हा कालव्यात उडी मारली. मात्र त्या दोघींना वाचवताना कृष्णाचाही बुडून मृत्यू झाला. परिसरातील रहिवाशांनी धाव घेऊन तिघांचे मृतदेह बाहेर काढले. तीनही मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले तेव्हा मुलींच्या आईने हंबरडा फोडला. या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


Recent Comments