Newsworldmarathi special: जगातील सर्वात प्रसिद्ध अश्या आपल्या मुंबई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वांना परिचित आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का? याच आपल्या मुंबई शहरात आणखी एक विमानतळ आहे. जुहू विमानतळ. होय. हे देशातील पहिले नागरी विमानतळ आहे आणि १९४० या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत या विमानतळाची भूमिका ही महत्वपूर्ण ठरली आहे. आजही या ठिकाणी काही अतिमहत्वाची (VIP) उड्डाणे, सामान्य विमान वाहतूक (General Aviation) आणि इतर सेवा चालू आहेत.

भारतामध्ये व्यावसायिक हवाई सेवा १५ ऑक्टोबर १९२९ रोजी भारतरत्न जे. आर. डी. टाटा यांच्या ऐतिहासिक विमान उड्डाणाने सुरू झाली. भारतातील पहिले वैध वैमानिक परवाना (पायलट लायसन्स) मिळवलेले व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे जे. आर. डी. टाटा यांनी कराचीहून मुंबईपर्यंत एअरमेल सेवा सुरू केली. त्यांनी चालवलेले ‘de Havilland Puss Moth’ हे विमान जुहू विमानतळावर उतरले आणि तिथूनच टाटा एअर मेल सेवा सुरू झाली. हीच कंपनी पुढे एअर इंडिया म्हणून प्रसिद्ध झाली.

भारतीय राष्ट्रीय ध्वजवाहक विमानसेवेच्या स्थापनेमुळे मुंबईतील गजबजलेल्या परिसरात असलेल्या जुहू विमानतळावरील कार्यप्रवृत्तीला चालना मिळाली. हे विमानतळ मुंबईच्या लोकप्रिय जुहू समुद्रकिनाऱ्याच्या शेजारील वर्दळीच्या भागात होते. १९३६ साली येथे दोन नवीन धावपट्ट्यांचे (०८/२६ आणि १६/३४) बांधकाम करण्यात आले आणि तिसऱ्या धावपट्टीसाठीही योजना आखण्यात आली होती.१९३७ आणि १९३८ मध्ये जुहू विमानतळावर आणखी सुधारणा करण्यात आल्या, ज्यामध्ये धावपट्ट्यांवर काँक्रीटचे आच्छादन तयार केले गेले. या कालखंडातच रात्रीच्या वेळेतही उड्डाण सेवा सुरू करण्यात आली होती, ज्यामुळे जुहू विमानतळावर हळूहळू अधिक आधुनिक सुविधा उपलब्ध होऊ लागल्या.

कालांतराने पावसाळ्यात जुहू विमानतळ परिसरात पाणी साठू लागल्याने ते वापरण्यास असुरक्षित ठरू लागले. त्यामुळे विमानांची वाहतूक तात्पुरती पूना विमानतळावर (सध्याचे पुणे विमानतळ, स्थापना वर्ष १९३९) येथे वळवण्यात येत असे. काँक्रीटी धावपट्ट्यांमुळे ही समस्या काही प्रमाणात दूर झाली, तरीही हळूहळू मुंबईसाठी स्वतंत्र आणि अधिक सक्षम विमानतळाची गरज स्पष्ट होऊ लागली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, जुहू विमानतळाने ब्रिटनच्या आशियातील युद्धप्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी एक रणनीतिक तळ म्हणून काम केले आहे.
मुंबईसाठी नव्या विमानतळाची गरज पाहता सांताक्रूझ विमानतळाची निर्मिती (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ) १९४२ मध्ये करण्यात आली. जे जुहू विमानतळापासून साधारण दोन मैलांवर आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर, १९४८ मध्ये या विमानतळाने अधिकृतपणे प्रवासी विमानसेवा स्विकारली आणि त्याच्या दोन मोठ्या टर्मिनल्सचा वापर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी करण्यात आला. तथापि, याचा अर्थ असा नव्हता की जुहू विमानतळ बंद करण्यात आले होते. हे विमानतळ आपली भूमिका सामान्य विमान वाहतूक, प्रशिक्षण, तसेच काही विशिष्ट VIP सेवा आणि हेलिकॉप्टर उड्डाणांपुरती मर्यादित ठेवून आजही कार्यरत आहे.
लेखक
अक्षय बनकर


Recent Comments