Newsworldmarathi Mumbai: राज्यकर्ते महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवायला निघाले आहेत. पण, पाण्यासाठी एका १२ वर्षीय मुलीला जीव गमवावा लागतो, हे आपल्या राज्याचे दुर्दैव आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी सरकारवर केली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील काठोडा पारधी बेड्यावर राहणाऱ्या १२ वर्षीय वेदिका चव्हाणचा पाण्यासाठी दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर रोहिणी खडसे यांनी समाज माध्यमावर व्हिडिओ प्रसारित करीत सरकारवर सडकून टीका केली आहे.
प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे नेमक्या काय म्हणाल्या?
प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे म्हणाल्या की, महाराष्ट्रात अनेक भाग जिथे महिलांची आणि लहान मुलींची पाण्याअभावी फरफट होते. महाराष्ट्र सरकारकडून जलजीवन मिशन योजना राबविण्यात आली, ज्यात प्रचंड पैसा खर्च केला गेला पण या योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात याच्या तक्रारी आल्या आहेत, असा आरोप करत रोहिणी खडसे यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
पुढे म्हणाल्या की, ज्या गावात ही घटना घडली त्या गावातही या जलजीवन मिशन अंतर्गत पाइपलाइन टाकण्यात आली. पण, पाणी साठवून ठेवण्यासाठी टाकीच बांधली नाही. फक्त पैसा कमावण्यासाठी ही कामे झाली आहे, ठेकेदारांना फायदा होण्यासाठी ही कामे केली जात आहे. तसेच ही योजना चांगल्याप्रकारे राबवली असती, तर त्या चिमुकलीला जीव गमवावा लागला नसता, असं रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे.


Recent Comments