Newsworldmartahi Kolhapur: दहावीचे पुस्तक देण्यासाठी घरी आलेल्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना ९ फेब्रुवारी २०१९ मध्ये दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास घडली होती. आरोपी शिक्षक महेश नारायण नाजरे (वय-५८, रा. फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर.) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश (१) पी. एफ. सय्यद यांनी तीन वर्षे सक्तमजुरी तसेच १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी बुधवारी २३ एप्रिल रोजी या खटल्याचा निकाल लागला आहे.
या प्रकरणी सरकारी वकील ॲड. मंजूषा पाटील यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी महेश नाजरे हा शिक्षक आहे. गुन्हा घडलेल्या दिवशी आरोपी पीडित मुलीच्या घरी दहावीचे इतिहासाचे पुस्तक आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी मुलीच्या आईने पुस्तकाच्या झेरॉक्स काढून त्या नाजरे यांच्या घरी पोहोच करण्यास तिच्या मुलीला सांगितले. त्यानुसार ती दुपारी सव्वाबाराच्या सुमारास पुस्तकाच्या झेरॉक्स घेऊन आरोपी नाजरे याच्या घरी गेली.
दरम्यान, त्यावेळी तो त्याच्या घरात मोबाइलवर अश्लील चित्रफिती बघत बसला होता. घरात दुसरे कोणी नसल्याचे पाहून त्याने मुलीशी अश्लील कृत्य केले. तिला आतल्या खोलीत ओढून नेत असतानाच तिने हिसडा देऊन घरी पळून गेली. या प्रकरणी तिच्या आईने करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
न्यायाधीशांनी आरोपी नाजरे याला बाललैंगिक प्रतिबंधक कायदा म्हणजेच पॉक्सोंतर्गत कलम ८ नुसार ३ वर्षे सक्तमजुरी, पाच हजार रुपये दंड आणि कलम १२ नुसार १ वर्ष सक्तमजुरी तसेच पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Recent Comments