Newsworldmarathi Mumbai: पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांनी आपल्या कार्यकाळात विविध गुन्ह्यांची यशस्वी उकल करत गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक बसवला आहे. आता त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तब्बल २७ वर्षांपूर्वी जप्त केलेला मुद्देमाल मूळ मालकाच्या ताब्यात देण्यात आला आहे.
नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलींद भारांबे यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या ‘मुद्देमाल निर्गती मोहिमे’ अंतर्गत १९९७ मध्ये जप्त केलेले १७.५० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने मूळ मालक विनोदकुमार जीव लाल शहा (रा. दादर, मुंबई) यांना परत मिळाले.
धीरज विनोदकुमार शहा व विनोदकुमार जीव लाल शहा यांनी मुद्देमाल परत मिळवण्यासाठी करण्यात आलेले अर्ज, संबंधित व्यक्तींचे निधन आणि न्यायालयीन प्रक्रिया अशा विविध टप्प्यांमुळे प्रकरण रखडले होते. २०१७ मध्ये निर्गतीचे आदेश झाले असतानाही संबंधित व्यक्तींना त्याची माहिती नव्हती.
सहा. पोलीस आयुक्त संजय ऐनुपरे, परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते आणि सहा. पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि नितीन ठाकरे व त्यांच्या पथकातील मपोहवा ज्योती दुधाने व मपोकॉ सुशिला सवार यांनी अथक परिश्रम घेऊन मुंबईतून विनोदकुमार यांचा शोध घेतला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अखेर त्यांच्याकडे हा मौल्यवान मुद्देमाल सुपूर्द करण्यात आला.
आपले वाडवडिलांचे पिढीजात दागिने परत मिळाल्याने विनोदकुमार जीव लाल शहा यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. त्यांनी संपूर्ण पोलीस विभागाचे मनापासून आभार मानले.


Recent Comments