Newsworldmarathi Mumbai: आपल्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेससोबत जावे, असा एक मतप्रवाह पक्षात असल्याची कबुली खुद्द शरद पवार यांनीच एका इंग्रजी वृत्तपत्रास दिलेल्या एका मुलाखतीत दिली आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर त्यांच्या पक्षातून यासाठी दबाव येत आहे. यातून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा आहेत. तसे झाल्यास सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद देण्याची तयारी भाजपने दाखवल्याचे समजते.
अजित पवार आणि सुप्रिया यांची विचारधारा एकच आहे. पक्ष वाढला तेव्हा हे सगळे एकत्रच होते. त्यामुळे आता पुन्हा एकत्र येण्याबाबत सुप्रिया आणि अजित यांनी बसून निर्णय घ्यावा, असे पवार म्हणाले. त्यांनी ठरवल्यास भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात.
तसे झाल्यास आपल्याला आश्चर्य वाटणार नाही, असेही पवार यांनी म्हटले आहे. आपण मात्र या निर्णय प्रक्रियेपासून खूप दूर आहोत. पक्षात फेरबदल करण्याचा अधिकार जयंत पाटलांना आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
तुम्हाला कुठे जायचे आहे? इंडिया आघाडीसोबत राहाणार की पर्याय खुले ठेवायचे आहेत? या प्रश्नावर विरोधी पक्षात काम करून भाजपला एक विश्वासार्ह पर्याय निर्माण केला पाहिजे, अशी भूमिका पवार यांनी मांडली.
तुमच्या स्वतःच्या पक्षाचे भविष्य तुम्हाला कसे दिसते? असा प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, आमच्या पक्षात दोन मते आहेत. एक म्हणजे आम्ही अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत पुन्हा एकत्र येऊन भाजपसोबत सत्तेत जावे, असे एका गटाचे म्हणणे आहे.
दुसऱ्या गटाला वाटतं की, आम्ही प्रत्यक्ष वा किंवा अप्रत्यक्षपणे भाजपसोबत न जाता इंडिया आघाडीतच राहून या आघाडीची पुनर्रचना करावी, इंडिया आघाडी आज सक्रिय नाही. आता आम्हाला आमच्या पक्षाची पुनर्रचना करून पुनर्बाधणी करावी लागेल, तरुणांना त्यात सामील करावे लागेल.


Recent Comments