Newsworldmarathi Mumbai: सध्या राज्यभरात ४० हजार स्कूल बस सेवा देत आहेत. मात्र याव्यतिरिक्त अनेक अनधिकृत स्कूल बस विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने वाहतूक करत आहेत. पुढील तीन महिन्यांमध्ये या स्कूल बस चालक-मालकांनी संबंधित प्रादेशिक मोटरवाहन कार्यालयात दंडात्मक रक्कम भरून आपली स्कूल बस अधिकृत करून घ्यावी.
अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. तसेच स्कूल बसमधून शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित होण्यासाठी नियमावलीत सुधारणा केल्या जाणार असल्याचेही सरनाईक यांनी सांगितले.
सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे स्कूल बस असोसिएशन व पालक असोसिएशन यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीस परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्यासह परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी सरनाईक म्हणाले, शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासास परिवहन विभागाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. स्कूल बसमधून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनी नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
नियमावलीत सुधारणा करताना वाहनचालक आणि पालक संघटनांच्या भावना आणि अडचणींचाही विचार केला जाईल. नियमांचे पालन हे फक्त कायद्याच्या भीतीपोटी नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या भावनेतून व्हावे. स्कूल बस वाहतूक नियमावलीत सुधारणा करताना कोणावर अन्याय होणार नाही, पण नियमही शिथिल होणार नाहीत.


Recent Comments