Homeबातम्याRamraje Nimbalkar : रामराजे निंबाळकर यांची पोलिसांकडून साडेचार तास चौकशी; राजकीय वर्तुळात...

Ramraje Nimbalkar : रामराजे निंबाळकर यांची पोलिसांकडून साडेचार तास चौकशी; राजकीय वर्तुळात खळबळ

Newsworldmarathi Kolhapur : Ramraje Nimbalkar : राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी चौकशी प्रकरणात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची वडूज पोलिसांनी तब्बल साडेचार तास चौकशी केली आहे. रामराजेंच्या निवासस्थानीच ही चौकशी केली असून त्यांनी चौकशीला सहकार्य केल्याचे सूत्रांनी सांगितले.

ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी प्रकरणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष काहींचा सहभाग असल्याचे तपासात आढळून आले आहे. यानंतर संबंधितांना नोटिसा बजावून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात रामराजे नाईक-निंबाळकर यांचाही ऑडिओ व्हायरल झाला होता.

शुक्रवारी (दि. १६) वडूज पोलिस फलटणमध्ये सकाळी रामराजे नाईक- निंबाळकर यांच्या ‘लक्ष्मीविलास’ या निवासस्थानी दाखल झाले. या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन ते फौजफाट्यासह पोहोचले होते. मात्र, स्थानिक कार्यकर्त्यांनी चौकशीवेळी कोणताही अडथळा आणला नाही. उलट चौकशी सुरू असल्याने वरिष्ठांच्या सूचनेनुसार ‘लक्ष्मीविलास’ निवासस्थान परिसराकडे कार्यकर्ते फिरकले नाहीत.

चौकशीसाठी पोलिस आत गेल्यानंतर बाहेरचे मुख्य गेट बंद केले होते. आत कोणालाही प्रवेश दिला गेला नाही. चौकशीवेळी रामराजेंसह त्यांचे वकीलही उपस्थित होते. या चौकशीला रामराजेंनी पूर्ण सहकार्य केले. या तपासप्रकरणी आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांची आवश्यकता भासल्यास पुन्हा चौकशी होऊ शकते, असेही सांगण्यात आले.

संबंधित महिलेला 1 कोटी रुपयांची खंडणी स्वीकारताना सातारा पोलिसांनी अटक केली होती. मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी प्रकरणात याआधी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख यांची देखील या प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. त्यांना देखील चौकशीसाठी नोटीस देण्यात आली होती.

रामराजे नाईक निंबाळकर यांना चौकशीला हजर राहण्यासाठी वडूज पोलिसांनी नोटीस दिली होती. मात्र, या नोटीशीनंतर देखील रामराजे हे पोलिस ठाण्यात हजर राहिले नव्हते. त्यामुळे रामराजे यांची चौकशी करण्यात आली. दरम्यान, ही घटना समोर येताच जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले असून, जयकुमार गोरे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील संघर्ष नव्या वळणावर पोहोचला आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments