Newsworldmarathi Pune: महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल गेल्या आठवड्यात जाहीर झाला. लाखो विद्यार्थ्यांनी यानंतर सुटकेचा नि:श्वास टाकला. यंदा राज्याचा एकूण निकाल 94 टक्के लागला असून, अनेक विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले आहे.
दहावी हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असून, त्यानंतर आता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची लगबग सुरू झाली आहे. येत्या सोमवारपासून, म्हणजेच 19 मे 2025 पासून इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
अकरावी प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन पोर्टलवर सध्या विविध महाविद्यालयांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. महाविद्यालयांनी आपापली माहिती पोर्टलवर अपलोड करण्यास सुरुवात केली असून, त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
विद्यार्थ्यांनी वेळेत नोंदणी करून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी टप्प्याटप्प्याने वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असून, त्यानुसार विद्यार्थ्यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा पाहायला मिळणार असून, विशेषतः नामांकित कॉलेजांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची धावपळ सुरू होणार आहे. त्यामुळे सर्वांनी अधिकृत पोर्टल आणि सूचना यावर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Recent Comments