Newsworldmarathi Pune : चेन्नई येथील ‘प्राईम पॉईंट फौंडेशन’च्या वतीने दिला जाणारा ‘संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार यंदा खासदार सुप्रिया सुळे यांना जाहीर करण्यात आला आहे. संसदेतील सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी तसेच मतदारसंघातील प्रश्नांसाठी स्थानिक प्रशासनापासून केंद्र सरकारपर्यंत सातत्याने प्रयत्नशील राहिल्याबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे श्रीनिवासन यांनी दिली.
खासदार सुळे यांची लोकसभेतील उपस्थिती ९९ टक्के, तर राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील एकत्रित उपस्थिती ८७ टक्के इतकी आहे. त्यांनी संसदेच्या ४७ चर्चासत्रांमध्ये सहभाग घेतला असून ११३ प्रश्न पटलावर मांडले आहेत. त्यांच्या कार्यक्षमतेची दखल घेत त्यांना याआधीही ‘संसद महारत्न’ पुरस्काराने दोन वेळा सन्मानित करण्यात आले आहे. त्याशिवाय, त्यांना ‘संसद विशिष्टरत्न’ आणि आठ वेळा ‘संसदरत्न’ पुरस्कार मिळाला आहे.
१५वी, १६वी आणि १७वी लोकसभा कार्यकाळात त्यांनी अशीच उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार सुळे यांचा हा पुरस्कार संपूर्ण मतदारसंघातील नागरिकांना समर्पित असल्याचे त्यांनी सांगितले.
“राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सेवा करण्याची संधी दिली, मतदारांनी विश्वास टाकला, हाच विश्वास काम करण्याची ऊर्जा आहे. हा पुरस्कार मतदारांना समर्पित करताना आनंद होतो.”
– सुप्रिया सुळे, खासदार


Recent Comments